🛑 महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कलाकार येणार महाराष्ट्र मंडळाच्या भेटीला 🛑
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
शनिवार दिनांक १० सप्टेंबर रोजी समीर चौगुले यांच्यासह महाराष्ट्राची हास्य जत्रा या सुप्रसिद्ध कार्यक्रमातील सर्व प्रमुख कलाकारांची टीम महाराष्ट्र मंडळाच्या अमृतमहोत्सवी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहे.
शनिवारी १० सप्टेंबर २०२२
वेळ- रात्री ८.३० वाजता
ठिकाण- महाराष्ट्र मंडळ, सिद्धार्थ नगर, रोड नं ११, गोरेगाव, पश्चिम, मुंबई-४००१०४
महाराष्ट्र मंडळ गणेशोत्सव यंदा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. मुंबई उपनगरातील सर्वात पहिला मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे
“‘सत्कार्याची धरून कास बाप्पाचरणी वाहू चित्र
नको मोदक नको हार यातून शिकतील आपलेच मित्र'” असे आवाहन करणाऱ्या गोरेगावच्या पत्रा चाळीतील महाराष्ट्र मंडळाच्या गणपतीबाप्पाची वेगळी ख्याती सार्या महाराष्ट्रातील जनतेला आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या गणेशोत्सवाचे कार्यकर्ते केवळ गणपती उत्सवात सक्रिय नसून राज्यातील नैसर्गिक आपत्तीत धावणारे कार्यकर्ते आहेत.
75 वे वर्ष असून मूर्ती अडीच फूट उंचीची व माती व लगद्यापासून बनवलेली आहे. या मूर्तीचे मंडपातच विसर्जन होते. या मातीला मोदकाचा आकार देऊन त्यात बिया घालून झाडे लावली जातात. पर्यावरण पुरक गणेशमूर्ती व सजावटीतील नाविन्यपूर्णता यामुळे अनेक गणेशभक्त या ठिकाणी येतात. समाज माध्यमातून सतत दिसणारे मान्यवर पत्रकार व कार्यकर्ते या उत्सवाचे मानकरी असल्याने राज्यातील मुख्यमंत्री महोदयांसह सर्वच पक्षांच्या नेत्याची भेट या महाराष्ट्र मंडळ गणेशोत्सव आवर्जून असते.
जवळपास अठराशे चित्रांचे प्रदर्शन मंडपात लावले आहे. शाळेतील मुलांना कॅनव्हास व रंग देऊन त्यांनी काढलेली चित्रे यात आहेत. गणेशोत्सवाच्या आधी काही महिने दर रविवारी कलाकार, नागरिक एकत्र येऊन एका भल्या मोठ्या कॅनव्हासचा आपल्या वाट्याला आलेला एकेक भाग अमूर्त शैलीत रंगवत होते, त्या कॅनव्हासचे फ्रेम केलेले भाग देखील या प्रदर्शनात आहेत. 400 ते 600 रुपये किंमतीच्या या फ्रेम्स येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यातून जमा झालेला निधी आदिवासी भागातील शाळांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
येथे भरलेले रांगोळी प्रदर्शन म्हणजे आपल्या कुंचल्यातून सादर केलेली अप्रतिम कला. जीवंतपणा इतका की चित्र आहे का? पोस्टर आहे? की फ्रेम आहे? हे रांगोळी प्रदर्शन पाहिले की लक्षात येते.
पत्रा चाळीतील लोक घरासाठीच्या अथक संघर्षात आहेत. अशावेळी अनेक कारणांनी उत्सवातील विवेक सुटण्याची व त्याचे समर्थन घडण्याची अधिक शक्यता असू शकते. ते टाळल्याचे विशेष महत्त्व. अध्यक्ष रमाकांत थोरवे, सचिव अजय सावंत, पंकज दळवी व इतर सर्व कार्यकर्ते तुमच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळू दे. आदर्श व प्रेरणादायी गणेशोत्सव असलेल्या या महाराष्ट्र मंडळ गणपती बाप्पाच्या चरणी लीन होत असताना लोकमान्य टिळकांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्र मंडळाच्या अमृतमहोत्सवी बाप्पाचे विसर्जन मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी अंगारीकेच्या मंगल दिवशी होणार आहे.