सांगली जिल्ह्यामध्ये 65 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या घरांचे सर्वे युद्धपातळीवर सुरु.
पुणे विभागातील कामगार विभागामध्ये काम करणारे बहुतांश अधिकारी कर्मचारी यांनी सांगली जिल्ह्यात एकाच वेळेस 13 सप्टेंबर पासून घरांचा सर्वे ठिकठिकाणी सर्व तालुक्यांमध्ये करण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये जे बांधकाम (स्त्री किंवा पुरुष )कामगार नोंदणीकृत असतील त्यांचा बांधकाम कामगार मंडळाचा नोंदणी क्रमांक,आधार कार्ड क्रमांक व सध्या राहत असलेल्या घराची परिस्थिती याबाबतची माहिती अधिकाऱ्यांच्या कडून भरून घेतली जात आहे. ज्या ठिकाणी सर्वे करण्यासाठी अधिकारी पोहोचणार नाहीत अशा ठिकाणच्या कामगारांनी स्वतः अधिकाऱ्यांना भेटून आपली माहिती द्यावी असे आवाहन निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
याबाबतची अधिक माहिती देत असताना ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यामध्ये ज्या नोंदीत बांधकाम कामगारांना स्वतःचे पक्के घर नाही त्यांच्यासाठी शासन जमीन उपलब्ध करून देऊन घर प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविणार आहे.
दरम्यान १३ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता सांगली परिसरातील नोंदीत बांधकाम कामगार सांगली निवारा भवन येथे मोठ्या संख्येने जमले असता त्याना घर मागणी नोंदणी अर्ज भरण्याबाबत युनियनचे सचिव कॉ विशाल बडवे यांनी मार्गदर्शन केले. यापुढेही उद्यापासून दररोज सांगली जिल्ह्यातील जे नोंदीत बांधकाम कामगार आहेत त्यांना घर मागणी अर्ज भरायचा असेल त्यांना विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येईल.
उद्यापासून ज्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शक्य असेल त्यांनी सांगली निवारा भवन येथे येऊन फॉर्म भरण्याबाबतची माहिती घ्यावी व फॉर्म भरावे असेही प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. म्हणूनच ज्या ठिकाणी अधिकारी सर्वेसाठी येतील तेथे कामगारांनी आपली माहिती द्यावीच त्याशिवाय काही शंका असल्यास सांगली निवारा भवन येथे संपर्क करावा. असेही आवाहन करणारे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जनरल सेक्रेटरी प्राध्यापिका शरयू बडवे यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.
कामगारांना संघटित करण्यामध्ये कॉ सुमन पुजारी, शुभांगी गावडे ,संतोष बेलदार, सतीश पवार ,विनोद पानबुडे ,बाबासाहेब वाघजादे ,विजय पाटील, अर्चना बेळंके ,राजेंद्र मंगसुळे ,साबिदा शेरेकर ,अमोल माने ,बाळासाहेब कोल्हे व श्री जाधव इत्यादी परिश्रम घेतले.
Posted inसांगली
सांगली जिल्ह्यामध्ये 65 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या घरांचे सर्वे युद्धपातळीवर सुरु.
