इचलकरंजीत भटक्या जनावरांवर मोफत औषधोपचार
इचलकरंजी/प्रतिनिधी –
लम्पी आजाराची लागण झालेल्या तसेच भटक्या जनावरांना इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव मंडळ यांच्यावतीने होमिओपॅथिक औषधोपचार करण्यात येत आहेत. त्यानुसार शनिवारी विविध भागातील भटक्या जनावरांना मोफत औषधे देण्यात आली.
सध्या सगळीकडे गोवंशातील जनावरांना लम्पी या आजाराने ग्रासले आहे. त्याची लागण झालेल्या अनेक जनावरांचा मृत्यूही झाला आहे. इचलकरंजी शहरात भटक्या जनावरांची संख्या मोठी असून त्यांच्यामध्येही या आजाराचा शिरकाव झाला आहे. अशा जनावरांना आणि लागण होऊ नये म्हणून गावभागातील शेतकरी आणि इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव कमिटी यांच्या माध्यमातून मोफत औषधोपचार केले जात आहेत. डॉ. अनिरुध्द माने यांच्या मार्गदर्शनाखाली लम्पी आजाराची लागण झालेल्या जनावरांना होमिओपॅथिक औषधे दिली जात असून त्याचा परिणामही जाणवू लागला आहे.
शनिवारी शहरातील महात्मा गांधी पुतळा, कॉ. मलाबादे चौक आणि थोरात चौक परिसरातील खवरे मार्केट येथील गायी व बैलांना औषधे देण्यात आली. या कामी इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी पुढाकार घेत भटक्या जनावरांसाठी औषधोपचाराची सोय करुन दिली आहे. याप्रसंगी प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, नंदू पाटील, दादासाहेब मगदूम, शिवाजी माळी, राजेंद्र बचाटे, तानाजी कोकितकर, राजू माळी, बजरंग कुंभार, राजू दरीबे, बाबुराव रुग्गे, द्वारकाधिश सारडा, राजू दळवी, किशोर पाटील आदी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
इचलकरंजीत भटक्या जनावरांवर मोफत औषधोपचार
