आमची गझलसाद’:एक अनोखा उपक्रम

आमची गझलसाद’:एक अनोखा उपक्रम

‘ आमची गझलसाद’:एक अनोखा उपक्रम


बदीऊज्जमा बिराजदार(साबिर सोलापुरी)
sabirsolapuri@gmail.com
भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३

 अलीकडच्या काळात गझलेच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग होताहेत. वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. गझलगोष्टी, गझल कार्यशाळा, गझल मार्गदर्शन शिबिर, गझल मुशायरे, स्वतंत्र गझलसंग्रह व प्रातिनिधिक गझलसंग्रहाचे प्रकाशन सोहळे दिमाखात पार पडत आहेत. अशा प्रयोगशीलतेमुळे, उपक्रमशीलतेमुळे गावपातळीपासून ते महानगरापर्यंत गझलेचा प्रचार, प्रसार होत आहे. ही गझलेला बळ देणारी बाब आहे. म्हणून अशा उपक्रमांचे स्वागत केले पाहिजे.सुरेश भट यांच्या नव्वदाव्या  जन्मदिनी आणि गझलसादच्या पाचव्या वर्धापनदिनी अर्थात १५ एप्रिल २०२२ रोजी हा गझलसंग्रह प्रकाशित झाला आहे. ज्येष्ठ गझलकारा प्रा.सुनंदा पाटील (गझलनंदा )यांची 'गझल वाटेवरील मैलाचा दगड ' ही संग्रहाचे अंतरंग उकलणारी प्रस्तावना या संग्रहाला आहे. संपादक व प्रकाशक प्रा. नरहर कुलकर्णी यांचे दोन शब्द हे मनोगत आहे. संग्रहाचे मुखपृष्ठ व आतील रचना निखिल कुलकर्णी यांनी उत्तम केली आहे. भारती मुद्रणालयाने उत्तम छपाई केली आहे.

कोल्हापूरच्या ‘गझलसाद’ समूहातर्फे सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील बारा उत्कृष्ट गझलकारां च्या ‘आमची गझलसाद’या संग्रहात चार महिला गझलकारांचा समावेश आहे. बारा गझलकारांच्या परिचयासह त्यांच्या प्रत्येकी अकरा गझला छापण्यात आल्यात. गझलकारांच्या वांग्मयीन माहितीसह त्यांच्या गझलेची जातकुळी, शब्दकळा, प्रकृती, गझललेखनातील तांत्रिकदृष्ट्या सफाईदारपणा समजण्यासही गझलसाद समूहाचा हा आगळावेगळा प्रयोग अतिशय महत्त्वाचा ठरतो. एरव्ही गझलकाराची एखाद दुसरी गझल वाचून त्याच्याविषयीचं समग्र मत नोंदवणं कठीण काम असतं. प्रत्येकी अकरा गझलांवरून गझलकाराच्या गझल लेखनाची धाटणी लक्षात येते. यातील बरेच गझलकार प्रथितयश आहेत. त्यांचे अनेक स्वतंत्र गझलसंग्रहही प्रकाशीत झालेत. तसेच काही नवोदितांचाही यात समावेश करण्यात आलाय्. प्रथितयश गझलकारांच्या सकस गझल निर्मितीबरोबरच उभरत्या गझलकारांचा वेगळा रंगही पाहावयास मिळतो.

 जातिधर्माच्या संकुचित फेऱ्यातून पूर्णपणे माणूस बाहेर पडल्याशिवाय समाजात एकोपा निर्माण नाही होणार. त्यासाठी बाबासाहेबांनी संविधानात प्रत्येकानं माणुसकीनं वागण्याची शिकवण दिलीय. नुसतीच धर्मग्रंथांची पानं चाळून उपयोगाचे नाही ठरत. त्याकरिता संविधानाचं सामूहिक वाचन केलं पाहिजे. इथंच खरं माणुसकीचं उजळ रूप दिसून येतं. माणुसकीचा शोध अन्यत्र घेण्याची बिलकुल गरज नाही भासत. असं सूचित करणारा शेर डॉ. दयानंद काळे (सावर्डे जि. कोल्हापूर) यांनी लिहिलाय्.

किती चाळले धर्मग्रंथ अन् पानपान मी
माणुसकी मी खरी संविधानात शोधली!

 गावागावात अन् भावाभावात जमीन जुमल्यावरून, पैशा अडक्यावरून मायबापा समोरच जीवघेणे तंटे-खेबडे होत राहतात. संपतीच सख्ख्या भावा-भावात वैमानस्य निर्माण करते. मायबापांनी घाम गाळून कमावलेल्या संपत्तीच्या वाटण्या करण्याचा ते चंग बांधतात. भाऊच भावाच्या जीवावर उठतो तेव्हा मायबापाच्या हृदयास किती वेदना होत असतील याचीही त्यांना पर्वा नसते. एखादाच भाऊ समजूतदार असू शकतो. डॉ. दिलीप कुलकर्णी (कुरुंदवाड जि. कोल्हापूर) यांनी नात्यातील फोलपणावर त्यांच्या शेरातून प्रकाशझोत टाकलाय्.

‘मी मायबाप नेतो, घे सर्व तूच बाकी
भावा, अता तरी तू घे खालती कुऱ्हाडी!’

 गझलेचा वेदनेशी अनोन्य संबंध आहे. गझल कोरडे राहून लिहिता नाही येत. ती आतमध्ये मुरवावी लागते. त्यात दुःख मिसळावे लागते. वेदनाच जेव्हा आतून गायला लागते तेव्हाच गझल बाहेर पडते. इतकं त्यात खोलवर बुडून जावं लागतं. केवळ दोन ओळीतून ही परिणामकारकता साधावी लागते. प्रा. नरहर कुलकर्णी (कोल्हापूर) म्हणतात.

वेदना आतून जेव्हा गावयाला लागते
लेखणीमधुनी गझल उतरवायला लागते

 टपोऱ्या दाण्याचं भरदार कणस आपण जेव्हा पाहतो. तेव्हा मोहवून जातो. त्याची कुणासही भुरळ पडतेच. परंतु या बियाणांचीही वेदना असते. उगवण्यापूर्वी त्यांना स्वतःला जमिनीत खोलवर गाडून घ्यावं लागतं. आतून तडकावं लागतं मग त्याची उगवण होते. संवेदनशील मनच बियाणांची ही सल जाणू शकतं. बियाणाचं दुःख प्रसाद कुलकर्णी (इचलकरंजी जि. कोल्हापूर) यांनी तरलतेनं मांडलंय्.

कणसात टपोरे दाणे आपसात बोलत होते
बी आतून तडकत असते जमिनीत उगवण्यापूर्वी

 आजकाल फेसबुकवर वैचारिक, वांग्मयीन दिवाळखोरी स्पष्टपणे दिसून येते. तकलादू प्रतिसादासाठी ऊठसुट लेखक-कवी प्रदर्शन मांडत बसतात. कुणाचं श्रेय कोण लाटतो मूळ लिहिणारा राहतो नामानिराळा त्याचं श्रेय मात्र कुणी उपटसुंभा लाटून जातो. यावर आवर घालणं. ही आवाक्या बाहेरची गोष्ट झालीय्. तोंडाला फेस आणणाऱ्या वास्तवाकडं श्रीराम पचिंद्रे (कोल्हापूर) यांनी आवर्जून लक्ष वेधलंय्.

कवी लेखक मांडत बसले रोज प्रदर्शन
श्रेय कुणाचे कोण लाटतो फेसबुकवर…

 हृदयास गझलेचा ध्यास लागला की शब्दांनाही गझलेचा छंद जडतो. कल्पनांनी शब्द बेचैन होतात. रात्रंदिन गझलेचा भास होत राहतो. गझल लिहून एकदाची कधी हातावेगळी होते. हृदयातून लिहिणाऱ्यांची हीच अवस्था होवून जाते. गझलेचं छंद वेड लावणारं असतं हे काय खोटं नाहीये. मनीषा जयजादे-पाटील (मिरज जि. सांगली) यांनी नेमकी हीच भावना आविष्कृत केलीय्.

लागला हृदयास माझ्या ध्यास गझलेचा
छंद हा शब्दांस आता खास गझलेचा

 आयुष्य हे जुगारासारखे असते ते कधी कोणता डाव खेळेल याचा थांग नाही लागत. त्याचं खरंखुरं रूप पाहण्यासाठी त्याला जन्मभर शोधलं तरी ते नाही गवसत. याचा प्रत्यय देणारा सारिका पाटील (कोल्हापूर) यांचा शेर पाहा.

शोधले आजन्म तुज मी भवताली पण
लागला नाही तुझा का थांग आयुष्या!

 गझलेचे काटेकोर नियम आधी जाणून घ्यावे लागतात. शब्दांशब्दांवर बंधनाचे पहारे असतात. म्हणून गझल अवघड वाटते. पण ती तंत्रामुळे कधीच कृत्रिम नाही वाटत. तंत्रमंत्र अन् लगावलीनं ती अधिकच सजत फुलत राहते. तिच्यात अंगभूत सौंदर्य असतेच. नियमात राहूनसुद्धा ती सुंदर दिसते. हीच तिची खासियत आहे प्रवीण पुजारी (कोल्हापूर) म्हणतात त्याप्रमाणेच.

व्याकरण, यती, शब्द योजना अचूक मागते गझल
नियमांमध्ये राहूनसुद्धा सुंदर दिसते गझल

 गझल हा इतका सशक्त काव्यप्रकार आहे की तो काळपटलावर आपली पदचिन्हे सोडून जातो. गझलकार असो वा गझलकारा. त्यांच्या हयातीनंतरही त्यांना गझल जिवंत ठेवते. त्यांच्या आठवणींचा जागर गझला करत असतात. गझलेला कधीच मरण नसतं यावर डॉ. सुनंदा शेळके (जयसिंगपूर जि. सांगली) यांचा अढळ विश्वास आहे. तो त्यांनी शेरातून व्यक्त केलाय्.

मी नसल्यावर करतील माझ्या
आठवणींचा जागर गझला!

 या व्यतिरिक्त अरुण सुनगार-सूर्य (कोल्हापूर) यांचा

तिला मिळविण्यासाठी पुष्कळ हुशार व्यक्ती आले गेले
पण हळवी ही गझल सुंदरी लपून बसली वेड्यासाठी

डॉ.संजीवनी तोफखाने (कोल्हापूर) यांनी लिहिलेला.

काळात वेग आहे हबकू नकोस जीवा
गुंतून मोहजाली बहकू नकोस जीवा

 अन् गझलेचं वैशिष्ट्य प्रकट करणारा अशोक वाडकर-पवार (कोल्हापूर) लिखित शेर.

भिन्नभिन्न अनुभूतींतून साजते गझल
रसीकांच्या अंतरंगात डोलते गझल

 हे शेरही रसिकाचं लक्ष वेधून घेणारे आहेत

 गझलसाद समूहाचे प्रमुख प्रा. नरहर कुलकर्णी यांनी हा प्रातिनिधीक गझलसंग्रह संपादन करून रसिकांना अनोखी पर्वणी दिलीय एका गझल समूहाची ही साद आहे. तिला खचितच प्रतिसाद मिळेल यात शंका बाळगण्याचं मुळीच कारण नाही.

आमची गझलसाद: प्रातिनिधीक गझलसंग्रह
संपादन व प्रकाशक: प्रा. नरहर कुलकर्णी (९४०३८ ४४१९० )

पृष्ठे:१६४ मूल्य:२००₹

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *