उच-निच, गरीब-श्रीमंत, जातीभेद, वर्णभेद झुगारून सर्वांना समान अधिकार संविधानामुळे प्राप्त झाले – आमदार प्रकाश आवाडे

उच-निच, गरीब-श्रीमंत, जातीभेद, वर्णभेद झुगारून सर्वांना समान अधिकार संविधानामुळे प्राप्त झाले – आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजी, प्रतिनिधी –

देशाला पुढे घेऊन जाण्याची ताकद भारताच्या संविधानामध्ये आहे. उच-निच, गरीब-श्रीमंत, जातीभेद, वर्णभेद झुगारून सर्वांना समान अधिकार याच संविधानामुळे प्राप्त झाले. आपला लोकप्रतिनिधी कोण पाहिजे यासाठी मतदानाचा अधिकारही याच संविधानाने दिला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या माणगाव परिषदेच्या निमीत्ताने माणगावला विशेष महत्व आहे. म्हणूनच माणगाव परिषदेेचे शताब्दीवर्ष धुमधडाक्यात साजरे करुया. यासाठी सरकारकडून प्राथमिक टप्प्यात 2 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.

माणगाव (ता. हातकणंगले) या ठिकाणी शनिवारी संविधानदिनानिमीत्त आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाचे पूजन आणि घरोघरी संविधानाच्या प्रतिचे वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी  आमदार आवाडे बोलत होते. ते म्हणाले, नुकताच देशाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. हर घर तिरंगा उपक्रम राबवून देशवासीयांचा राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेतले. इचलकरंजीत देखील तिरंगा ध्वजाची रॅली काढण्यात आली. माणगावला ऐतिहासीक महत्व आहे. माणगाव येथे झालेल्या परिषदेत राजर्षी शाहु महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जे वक्तव्य केले होते त्याचीच प्रचिती डॉ. आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन दाखवून दिली आहे. वंचित, पिडीत, दुर्लक्षीत माणसाचे नेतृत्व करताना देशाला समतेचा, राष्ट्रीय एकोप्याचा विचार या संविधानातून डॉ. आंबेडकरांनी दिला. शिक्षण, संघटन आणि संघर्ष ही त्रिसुत्री डॉ. आंबेडकर यांनी वंचित माणसाला शिकवली. आज संविधानदिनाबरोबरच दहशतवादी विरोधी दिनही साजरा करत आहोत. पाकिस्तान हे दहशतवादाचे मुळ आहे. दहशतवाद मोडून काढण्याचे काम यापूर्वीच्या सरकारना देखील करता आले असते मात्र सध्याचे मोदी-शहा यांचे सरकार जशास तसे उत्तर देऊन दहशतवाद मोडून काढत आहेत. काश्मिरमधील 370 कलम हटवून एक देश एक कायदा हे केंद्र सरकारने दाखवून दिले आहे. एक देश एक कायदा या दिशेने आता आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. देशाला पुढे घेऊन जाण्याची ताकद फक्त संविधानामध्येच आहे. शाहु-फुले-आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. त्यासाठी माणगाव येथे झालेल्या परिषदेचे शताब्दीवर्ष साजरे करण्यासाठी आपण सज्ज होऊया. माणगाव नव्हे तर माझं गाव अशी भावना या गावात आल्यानंतर निर्माण होते. संविधानाची पुजा करण्यासाठी मला संधी मिळाली त्यातूनच बंधुभाव, एकात्मता जपत जातीभेद, वर्णभेद विसरून राष्ट्राप्रती कर्तव्य समजून सर्वस्व अर्पण करुया असे आवाहन देखील आमदार आवाडे यांनी केले. यावेळी संविधान उद्देशीकेचे सामुहिक वाचक नितीन गवळी यांनी केले. यावेळी नंदकुमार शिंगे, सरपंच राजु मगदुम यांनी मनोगत व्यक्त केले. ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, महेश पाटील, अविनाश कांबळे, अख्तरहुसेन भालदार, माजी सरपंच अनिल पाटील, जवाहर कारखान्याचे संचालक जिनगोंडा पाटील, आय.वाय. मुल्ला, संतोष महाजन, मुरलीधर कांबळे, अशोक कांबळे, राजु सनदी यांच्यासह माणगावचे ग्रामस्थ, ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *