सामाजिक न्याय हा शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचा केंद्रबिंदू – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

सामाजिक न्याय हा शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचा केंद्रबिंदू – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

सामाजिक न्याय हा शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचा केंद्रबिंदू

प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

जयसिंगपूर ता.२१,हे राज्य रयतेला आपल्यासाठी असलेले अर्थात स्वराज्य वाटले पाहिजे.रयतेची काळजी घेत रयतेच्या भाषेत राज्यकारभार केला पाहिजे. रयतेप्रती कणव, ममत्वभाव जपणे आणि तिच्या उद्धाराच्या बांधिलकीला प्राधान्यक्रम देणे. धर्मश्रद्धा बाळगायची पण परधर्म द्वेष करायचा नाही. या बाबींना छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय महत्त्वाचे मानले. त्यांची स्वराज्याची संकल्पना यावरच आधारित होती.तसाच राज्यकारभारही त्यांनी केला. म्हणूनच छत्रपती शिवराय हे आज चारशे वर्षानंतरही जगातले एक आगळे वेगळे व सार्वकालिक श्रेष्ठ मार्गदर्शक राजे ठरतात. या महान राजाची स्वराज्य संकल्पना आजच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेतही महत्वाची आहे.सामाजिक न्यायाची प्रस्थापना हा शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचा केंद्रबिंदू होता,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल फाउंडेशन आणि संभाजी ब्रिगेड (जयसिंगपूर )यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ‘छत्रपती शिवरायांची स्वराज्य संकल्पना ‘या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर माजी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, शिवसेनेच्या महिला आघाडी संघटक साजीदा घोरी,ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ.चिदानंद अवळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिवछत्रपतींच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रा.अमर पाटील यांनी प्रास्ताविक केले.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले,भारत स्वतंत्र झाल्यावर राष्ट्राला दिशादर्शक ठरणारी भारतीय राज्यघटनेत जी सर्वांगीण समतेची मूल्ये आहेत ती मूल्ये शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यकारभारात साडेतीनशे वर्षे आधीच स्वीकारली होती. यावरूनच त्यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे द्रष्टेपण आणि महानता अधोरेखित होते. जात-पात धर्म यापेक्षा माणूस हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. शेतकऱ्यांचे सैन्य उभे केले. उत्तम पद्धतीची जनतेला सुसह्य होईल व तिचे रक्षण करेल अशी कर पद्धती आणि दुष्काळात अडचणीच्या काळात रयतेला मदत करणारी अर्थनीती त्यांनी अवलंबली. स्त्रियांना सन्मानाचा दर्जा दिला. अर्थकारण ,राजकारण ,समाजकारण, धर्मकारण या सर्व क्षेत्रात उदात्त अशी मानवी मूल्ये त्यांनी आपल्या स्वराज्यातून रुजवली. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणातून शिवछत्रपतींची स्वराज्य संकल्पना विविध उदाहरणे देत स्पष्ट केली.डॉ.नीता माने यांनी आभार मानले. सूत्रसंचलन प्राजक्ता. पाटील,स्वाती भापकर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत धनाजीराव जाधव (घुणकिकर) आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने केले होते.जयसिंगपूर नगरपालिके समोरील विक्रमसिंह क्रीडांगणात झालेल्या या व्याख्यानास जयसिंगपुरातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *