संत गाडगेबाबा:महान प्रबोधनकार

संत गाडगेबाबा:महान प्रबोधनकार

संत गाडगेबाबा:महान प्रबोधनकार

,प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८ ५०८ ३० २९०)

“भुकेलेल्याना पाणी उघड्या, तहानलेल्याना पाणी, नागव्याना वस्त्र, बेघरांना आसरा, बेरोजगारांना रोजगार , दुःखीताना व निराशा ग्रस्तांना हिमत, गरीब मुला-मुलींना शिक्षण, रोग्याला औषध आणि मुक्या प्राण्यांना अभय देणे हाच आजचा रोकडा धर्म आहे, हीच खरी देवपूजा आहे” असा शोषणमुक्तीचा महान संदेश संत गाडगेबाबांनी व्यक्तिगत जीवन व्यवहारासाठी दिला.या कृतिशील विचारवंत संताचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. आणि २० डिसेंबर १९५६ रोजी ते कालवश झाले. या लोकोत्तर महामानवाने जन्मभर केलेल्या विचार जागरणाची ,मनाच्या स्वच्छते पासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतची, श्रमसंस्काराची व श्रमप्रतिष्ठेची शिकवण आज समाजात नव्याने रुजवण्याची वेळ आलेली आहे.अर्थात त्यासाठी संत गाडगेबाबा आपल्याला समजून घ्यावे लागतील. गेल्या शतकाभरातील महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेत गाडगेबाबांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अखेरचा कृतिशील संत म्हणून गाडगेबाबांचा उल्लेख करावा लागेल. सर्व संतांनी माणुसकीची शिकवण दिली. जागतिक साहित्याचे लेणे ठरावी अशी साहित्य निर्मिती केली. सर्वच संतांवर तत्कालीन सामाजिक -राजकीय घडामोडींचा प्रभाव होता. सर्वच संतांनी योगायोगाना, चमत्काराला विरोध केला. व्यक्तीच्या जीवनात चित्तशुद्धी आणि आत्मविकास अतिशय महत्वाचे आहे.ज्ञानाशिवाय जीवन समृद्ध होत नाही.ही शिकवण दिली. ही शिकवण देण्यासाठी त्यांनी लोक माध्यमांचा वापर केला. संत गाडगेबाबा हाच संस्कार आयुष्यभर रुजवत राहिले.

संत गाडगेबाबा लौकिकार्थाने शाळेत गेलेले नव्हते.पण बुद्धिवादाची भूमिका त्यांनी सतत प्राणप्रणाने मांडली. शिकलेली अनेक मंडळी बुद्धीवादाशी असलेली नाळ तोडून समाजशरण ,परंपराशरण होताना दिसतात. पण गाडगे महाराज हे कठोर व कडवे बुद्धीवादी होते.रूढ समाज व्यवस्थेला, कर्मकांडाला, पूजाअर्चाना विरोध करूनही गाडगेबाबा समाजाला पाखंडी न वाटता आपले वाटले. याचे एक महत्त्वाचे कारण त्यांच्या प्रबोधनाच्या पद्धतीत, संवाद संभाषणाच्या पद्धतीत लपलेले आहे. ऐकणाऱ्याच्या मनाच्या ठाव घेईल असे ते बोलत. आपले मत साध्या साध्या उदाहरणातून स्पष्ट करत .त्यामुळे या शतकातील ते मुलखावेगळे प्रबोधनकार ठरतात. गाडगेबाबांनी अनेक शाळा ,धर्मशाळा, नदीचे घाट यांची बांधणी केली.’ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ‘म्हणणाऱ्या गाडगेबाबांनी मी कुणाचा गुरू नाही मला कोणी शिष्य नाही हेही आवर्जून सांगितले होते.

संत गाडगेबाबांनी समाज प्रबोधनासाठी कीर्तन हे माध्यम अतिशय प्रभावीपणे वापरले. चुकीच्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, यात्रा-जत्रा, पशुबळी, दारू वगैरेंवर त्यांनी कोरडे ओढले. नव्या समाज जाणीवांचा, नव्या सामाजिक मूल्यांचा ,पुरोगामी जीवन पद्धतीचा, समाजवादी समाज रचनेचा त्यांनी पुरस्कार केला. गाडगेबाबांनी दिन दलितांकडे रंजल्या गांजल्याकडे भूतदयाने केवळ पाहिले नाही तर त्यांना त्यांच्या समान सामाजिक अधिकारांसाठी लढायला प्रवृत्त केले. सर्व प्रकारच्या विषमतेला झाडून काढत ,काठीचा प्रहार हाणत त्यांनी समतेचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला शिक्षण नाही म्हणून आपण गरीब आहोत हे त्यांनी मांडले.ते म्हणायचे’ इवाया ला पाहुणचार करू नका ,पण मुलाला शाळेत घातल्याशिवाय राहू नका.’

सावकाराच्या बेडीतआणि जमीनदारांच्या दाढेत अडकलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ,शेतमजुरांना मुक्त करण्याचे काम त्यांनी केले.भांडवलशाहीला विरोध करून त्यांनी आर्थिक समतेचा पुरस्कार केला.याबाबत आचार्य अत्रे त्यांच्या शैलीत एक ठिकाणी म्हणतात, ‘मार्क्स नावाचा माकड आहे की माणूस हे ठाऊक नसणाऱ्या या माणसाने समतावादी विचार झोपडी झोपडी पर्यंत पोहोचवला.’

गाडगेबाबा सश्रद्ध होते.तसेच पराकोटीचे बुद्धीवादी होते. म्हणूनच त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांडांना विरोध केला.माणसातच त्यांनी परमेश्वर पाहिला. म्हणूनच पंढरपुरात असूनही त्यांनी विठ्ठल दर्शन न घेता महारोग्यांची, अपंगांची सेवा करण्याला प्राधान्य दिले .समाजाचे प्रबोधन करणारे सर्व विचार संत गाडगेबाबांनी कीर्तन या परंपरागत साधनाद्वारे मांडले.वास्तविक ईश्वरभक्ती करण्याचे ते साधन पण त्याचाच वापर करून गाडगेबाबांनी ईश्वराच्या नावाने केल्या जाणाऱ्या दलालीला, लबाडीला कठोर विरोध केला .कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैचारिक, धार्मिक,ऐहिक अशा सर्व प्रश्नांची चर्चा ते कीर्तनातून सहजगत्या करत. सत्यनारायणाच्या पोथी पासून ते पितरांना अर्ध्य देण्याऱ्यापर्यंत त्यांनी बुद्धीप्रामाण्यवादी भाष्य केले. हे भाष्य पुरोगामी व प्रबोधनाच्या चळवळीची बोधवाक्य ठराविक असे आहे.

संत गाडगे महाराज हे अलीकडचे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या ऐन भराच्या काळात वैचारिक प्रबोधनात गाडगेबाबा अग्रेसर होते. त्यांचे विचार पुढे आणणे हे पुरोगामी चळवळीचे कर्तव्य आहे. कारण काळाच्या ओघात मूर्ति पूजेला विरोध करणाऱ्यांचीच मंदिरे बांधणे, त्यांचे दृष्टांत चमत्कार वगैरे दाबून सांगत राहणे ,ते लिखित स्वरूपात मांडून ठेवणे आणि महामानवांचे दैवतीकरण करणे अशी एक विकृत परंपरा आपल्याकडे तेजीत आहे. त्यापासून संत गाडगेबाबांच्या विचारांना जपणे आणि पुढील पिढ्यांना वाचवणे ही आजच्या प्रबोधन चळवळीची मोठी जबाबदारी आहे. गाडगेबाबांच्या स्मृतीला अभिवादन करत असतानाच त्यांचे विचार सातत्याने समाजापुढे मांडत राहण्याची नितांत गरज आहे.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेले अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)
———++++——————————-

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *