जयसिंगपूर/प्रतिनिधी
माजी खासदार राजू शेट्टी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जयसिंगपुरात उभाच राहू नये, असे षडयंत्र रचण्यास सुरुवात केली आहे, अशी शंका बौध्द समाज व आंबेडकरी जनतेच्या मनात येत आहे. त्यांनी यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणीसाठी कधीच काहीच प्रयत्न केले नाहीत. पण, आज पुतळा उभारणीच्या आडून राजकारण करण्याचा जो प्रकार शेट्टी यांनी सुरु केला आहे तो खोडसाळ आणि विकृत मनोवृत्तीचा आहे. त्यांच्या या प्रवृत्तीला सडेतोड उत्तर आंबेडकरी जनता देणार, असा खणखणीत इशारा शनिवारी दुपारनंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे जेष्ठ नेते जयपाल कांबळे, संतोष आठवले, संजय शिंदे, विश्वास कांबळे, डॉ. सुभाष सामंत, सुरेश कांबळे, बाळासाहेब कांबळे, संदीप बिरणगे आदी प्रमुखांनी दिला आहे.
उभय प्रमुख बोलताना म्हणाले, माजी खासदार राजू शेट्टी हे साडेचार वर्षे जिल्हा परिषदचे सदस्य होते, 5 वर्षे आमदार होते, 10 वर्षे खासदार होते. त्यांनी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांनी जयसिंगपूर शहरात नगराध्यक्ष ताराराणी आघाडीचा केला, या पाच वर्षाच्या कालावधीत पुतळा उभा करणे, जागा मिळवणे यासाठी राजू शेट्टी यांनी काय प्रयत्न केले? कोणत्या मंत्र्यांना त्यावेळी ते भेटले? मुंबईत कितीवेळा बैठका त्यांनी घेतल्या? राजू शेट्टी यांच्याकडे निमशिरगाव पाणी पुरवठा, नांदणी औद्योगिक वसाहत आहे, भरत अर्बन बँक आहे, जयसिंगपूर महाविद्यालय आहे, 100 ते 150 कोटी रुपयाची उलाढाल असणारी स्वाभिमानी दूध संस्था आहे. या ठिकाणी कुठेच पुतळा उभारला नाही, जागा दिलेली नाही. आज पुतळा उभार करण्यासाठी आंबेडकरी जनता आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे गेली, त्यांना निवेदन दिले, त्यांनी पुढाकार घेतला, एस.टी. महामंडळाची जयसिंगपुरात जागा आहे ती जागा मिळू शकते याची खात्री शेट्टी यांना झाल्यानंतर त्यांनी पुतळ्याच्या आडून राजकारण सुरु केले आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
गेली अनेक वर्षे आमच्या मागणीनंतर बौध्द विहारात पुतळा उभा केला जाणार होता ती जागा बदलण्यास का भाग पाडले? बसस्थानकाच्या जागेबाबत राजू शेट्टी राजकारण करीत आहेत. मुतारीचा संदर्भ देत आहेत, ही त्यांची खोटारडी आणि लबाड भूमिका आहे. यातूनच राजू शेट्टी यांचा खरा चेहरा पुढे येत आहे. बसस्थानकाच्या कंपाऊंडच्या बाहेर मुतारी आहे, ती मुतारी काढून टाकण्यात येणार आहे, हे माहित असूनही ते चुकीचे बोलत आहेत. राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जावून बसस्थानकातील जागा कशी योग्य आहे याची माहिती दिली होती. तरीही राजू शेट्टी हे राजकीय द्वेषाने बसस्थानकातील जागा पुतळ्यासाठी मिळू नये यासाठी षडयंत्र रचत आहेत. आंबेडकरी जनता राजू शेट्टी यांच्या या विचाराला सडेतोड उत्तर देईल. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून बसस्थानकातील जागा मिळाली पाहिजे म्हणून मागणी केली. यात कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही.
आमच्यातील काही बांधवांची दिशाभूल करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही नेतेमंडळी करीत आहेत. त्यांना आम्ही पुढच्या काळात सडेतोड उत्तर देणार. तेव्हां कावीळ झालेल्या राजकीय नेत्यांनी पुतळ्याच्या आडून राजकारण न करता आपली लुडबूड तात्काळ थांबवावी व बसस्थानकाच्या आवारातील जागेस विरोध करणे, पुतळा उभा राहील या भितीपोटी षडयंत्र रचायचे काम थांबवावे अन्यथा आंबेडकरी जनता संघर्षासाठी रसत्यावर उतरेल. कोणत्याही परिस्थितीत क्रांती चौकात बसस्थानकाच्या आवारात येत्या 14 तारखेला पुतळा उभारणीसाठी आम्ही भूमीपूजनाला तिथे जातोय. आंबेडकरी जनतेच्या आडवे येऊ नका. महापुराच्या काळात, कोरोनाच्या संकटात दलित जनतेबरोबर, आंबेडकरी लेकरांच्याबरोबर कोण होते हे आम्ही जाणतोय. राजू शेट्टी यांच्या निवासस्थानात त्यांच्या सोबत आमच्या शिष्टमंडळाची जी चर्चा झाली होती आणि त्यांनी जी विधाने केली होती, ती बाहेर काढायला आम्हाला लावू नका, असा इशारा दिला आहे.
Posted inकोल्हापूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जयसिंगपुरात उभाच राहू नये याकरिता माजी खासदार राजू शेट्टी यांचे षडयंत्र – पुतळा समितीचा आरोप
