डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाड (रायगड) येथील चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला. मानवी प्रतिष्ठा आणि मानवी सन्मान यासाठीच्या या लढ्याला २० मार्च २०२६ रोजी ९९ वर्षे पूर्ण होऊन या ऐतिहासिक लढ्याचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने………
चवदार सत्याग्रहाची शताब्दी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,थोर प्रज्ञावंत, तत्वचिंतक ,अर्थतज्ञ ,जलतज्ञ, कायदेतज्ञ, इतिहासतज्ञ, चिकित्सक लेखक, ख्यातनाम संपादक, मानवी शृंखलामुक्तीचे बुजुर्ग नेते असे विविध पैलूंनी युक्त महामानव होते. त्यांचे आयुष्य म्हणजे गतिमान संघर्ष होता.अमेरिका व इंग्लंड येथे त्यांनी आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर पदव्या मिळवल्या. कोलंबिया विद्यापीठातून ते अर्थशास्त्रात एम.ए. पीएच.डी करून जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यांनी बडोदे संस्थानात नोकरी सुरू केली.
बडोद्यात या महापंडिताला अस्पृश्य म्हणून अतिशय कटू अनुभव आले. परिणामी त्यांनी बडोदा संस्थानातील नोकरी सोडून मुंबईला सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली.आपण एवढे उत्तम शिकलेसवरलेले असूनही अस्पृश्य म्हणून होणारी मानहानी त्यांना अस्वस्थ करू लागली. तसेच आपल्यासारख्या उच्चविद्याविभूषिताला अशी वागणूक मिळते तर आपल्या समाजातील सर्वसामान्य माणसांना किती यातना सहन कराव्या लागत असतील हा प्रश्न त्यांना छळू लागला. त्यातूनच त्यांनी अस्पृश्यांमध्ये जागृती करण्याचे ठरवले. कार्यकर्त्यांची संघटना ऊभी केली. ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांची माणगाव येथे परिषद घेतली.तर नागपूरला छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय परिषदही घेतली.
त्यानंतर त्यांनी लंडन विद्यापीठातून डी.एससी पदवी घेतली. बॅरिस्टर झाले आणि भारतात परत येऊन त्यांनी वकिली सुरू केली. सरकारच्या विधी महाविद्यालयात काही काळ प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणूनही काम केले. २० जुलै १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा या नावाची संस्था स्थापन केली. अस्पृश्यांच्या जनजागरणासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवत अखंड मेहनत घेतली. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे १९२६ साली झालेल्या महार परिषदेत त्यांनी अस्पृश्यांना वतनदार आणि गावकीचे हक्क सोडून द्यायला सांगितले. परिणामी अनेक अस्पृश्यानी गावकीची कामे सोडून इतर कामे करायला सुरुवात केली. त्यामुळे समाजात बदल होऊ लागला.
याच दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाड (रायगड) येथील चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला. मानवी प्रतिष्ठा आणि मानवी सन्मान यासाठीच्या या लढ्याला २० मार्च २०२६ रोजी ९९ वर्षे पूर्ण होऊन या ऐतिहासिक लढ्याचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. गावातील सार्वजनिक तळ्याचे पाणी वापरण्याचा हक्क अस्पृश्यांना मिळालाच पाहिजे यासाठीचा लढा होता. गावातील कुत्री , मांजरे त्या तळ्याचे पाणी पीत होती. पण माणसांना पाणी नाकारले जात होते या अमानुष वास्तवाकडे भेदकपणे त्यांनी लक्ष वेधले. हा मानवी हक्काचा लढा होता. बाबासाहेबांनी सामाजिक समतेसाठी संपूर्ण आयुष्य खर्च केले. त्याचा हा महत्त्वाचा टप्पा होता.२० मार्च १९२७ या दिवशी बाबासाहेब आपल्या हजारो अनुयायांसह महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन पाणी प्याले आणि ही मनुवादी विकृत व्यवस्था मोडीत काढली.
सिताराम केशव बोले यांनी मुंबई विधिमंडळात एक ठराव संमत करून घेतलेला होता. त्या ठरावानुसार महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. मात्र हिंदू समाजातील वरिष्ठ वर्गीयांच्या भीतीमुळे तेथील अस्पृश्यानी त्या तलावाचे पाणी घेतलेले नव्हते. ही जातीय उतरंडीची सामाजिक दहशत मोडून काढून अस्पृश्यांना माणूस म्हणून असलेले हक्क सार्वजनिक ठिकाणी म्हणजे तळी, शाळा, मंदिरे आदी ठिकाणी बजावता आले पाहिजेत ही आग्रही भूमिका बाबासाहेबांनी मांडली. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे दलित समाजामध्ये आत्मसन्मान जागृत झाला. आणि सामाजिक समतेचा विचार गती घेऊ लागला. अनेक अर्थानी दलित समाजाच्या सबलीकरणाचा हा दिवस होता. हा सत्याग्रह म्हणजे एक महत्त्वाचा एल्गार होता.
महाडच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने चवदार तळ्यापासून काही अंतरावर जी परिषद भरली होती त्याला मुंबई, कोकण, नागपूर या विभागातून पाच हजाराहून अधिक तरुण ,वृद्ध आपापल्या भाकऱ्या फडक्यात गुंडाळून सहभागी झालेले होते. या परिषदेसाठी स्पृश्य वर्गाकडून पाणी मिळणार नाही हे जाणल्यामुळे कार्यकर्त्यांनी चाळीस रुपये खर्च करून पाणी विकत घेतले होते. यावरूनच चवदार तळ्याच्या पाण्याच्या सत्याग्रह किती महत्त्वाचा होता हे दिसून येते. अर्थात या परिषदेत बापूराव जोशी, गंगाधर सहस्त्रबुद्धे, अनंतराव चित्रे, धारिया, टिपणीस, भिडे असे अनेकजण सहभागी झाले होते हेही खरे. या परिषदेत सामाजिक समतेच्या दिशेने नेणारे दहा ठराव संमत झालेले होते. पण ठराव कृतीत आणण्याच्या वेळी काही स्पृश्य पुढार्यांची गोची झाली. या बदलासाठी अजून समाजमन तयार नाही, हा उतावळेपणा आहे, आम्हाला गावात राहायचे आहे असे ते म्हणू लागले. तेव्हा बाबासाहेबांनी आमचे विचार आहेत तसेच आचार आहेत, आमच्या उक्ती व कृतीत अंतर नाही.तुम्ही तुमच्या मार्ग सुधारा असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर चार चार लोकांच्या तुकड्या करून लोक चवदार तळ्याकडे निघाले आणि हा ऐतिहासिक सत्याग्रह यशस्वी झाला.
ज्येष्ठ चरित्रकार धनंजय कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १९६६ साली चरित्र लिहिलेले आहे. साडेपाचशे हून अधिक पृष्ठांचे हे चरित्र अतिशय महत्त्वाचे आहे. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाविषयी धनंजय कीर यांनी जे लिहिले आहे ते त्या परिस्थितीचे समग्र चित्र उभे करणारे आहे. म्हणून ते त्यांच्याच शब्दात जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. धनंजय कीर लिहितात, ” आंबेडकर आता चवदार तळ्याच्या काठावर उभे होते. जगातील पंडितांमधील एक विख्यात पंडितवर्य, उदात्त ध्येयाने प्रेरित झालेले एक थोर हिंदू पुढारी, दलितांचे स्वातंत्र्यसूर्य डॉ. आंबेडकर हे कृतीक्षेत्रात उतरले. स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात. ते स्वसामर्थ्याने संपादावयाचे असतात. देणगी म्हणून ते लाभत नसतात हे त्रिकालाबाधित महानुभावाचे प्रत्यक्ष पाठ आंबेडकर दलितांना देत होते. आत्मोद्धार हा दुसऱ्याच्या कृपेने होत नसतो. तो ज्याचा त्याने करावयाचा असतो. बाबासाहेब आंबेडकर स्वतः कृतीवीर बनून अनुयायांना श्रीगणेशाचा पाठ देत होते. त्यांना सुसंघटीत आणि प्रतिकारक्षम बनवत होते. कृतिशीलपणा हा इतिहास घडवणाऱ्या थोर पुरुषांचा देहस्वभाव असतो.”
धनंजय कीर पुढे म्हणतात,”ध्येयाविषयी श्रद्धा बाळगून डॉ.आंबेडकर दलितांत निष्ठा निर्माण करत होते. ज्या ध्येयाचा ते उद्घोष करत राहिले ते ध्येय आता झगड्याच्या अग्नीदिव्यातून तावून सुलाखून निघत होते. आंबेडकर आता स्वतः तळ्याच्या काठावर उभे राहिले. ज्या पाणवठ्यावर पशु, पक्षी आपली तहान भागवीत, त्यातले पाणी पिऊन आपली तहान भागवण्यास ज्याला आपल्या पुण्यभूमीत नी मायभूमीत मज्जाव होता, ज्याला सार्वजनिक स्थळे नि देवळे यांची द्वारे बंद होती असा तो महापुरुष हिंदू धर्म मार्तंडांचा आणि हिंदू धर्ममतांचा ढोंगीपणा भारताच्या वेशीवर टांगत होता. सर्वांभूती परमेश्वर आहे असा धर्मप्रणित उद्घोष उच्चारवाने करणाऱ्या आणि कुत्र्या मांजरांना जवळ करीत असताही स्वधर्मियांना पशुहून नीच मानणाऱ्या त्या थोर पातक्यांचे अघोर पातक तो क्रांतीपुरुष जगाला उघड करून दाखवत होता. आंबेडकर चवदार तळ्याच्या पायऱ्या उतरून खाली गेले. ते खाली वाकले आणि त्यांनी तळ्यातील एक ओंजळभर पाणी प्राशन केले .त्या प्रचंड जनसमुदायाने आपल्या नेत्याचे अनुकरण केले. त्यांनी आपला नागरिक त्याचप्रमाणे मानवी हक्क बजावला.लागलीच परिषदेच्या ठिकाणी मोर्चा शांतपणे परतला. आणि विसर्जन पावला. नेत्यांनी योग्य वेळी कृतीपूर्ण पाऊल टाकले पाहिजे. जे काम शेकडो ठरावांनी होत नाही ते अशा एका कृतीने सफल होते. कार्लाईलने म्हटलेच आहे की, कृती हे मानवाचे खरे उद्दिष्ट होय.अशा प्रकारे प्रचंड कार्य करून परिषद समाप्त झाली. जो तो घरी परतण्याच्या तयारीला लागला. भारताच्या तीन सहस्त्र वर्षाच्या इतिहासातील परममंगल असा तो भाग्याचा दिवस. माणुसकीचा आणि समानतेचा संदेश भारतास देणारा तो सोन्याचा दिन २० मार्च १९२७ होय .आंबेडकरांच्या जीवनातील परभाग्याचा तो दिवस. त्या दिवसापासून आंबेडकरांच्या कीर्तीच्या लाटा एकामागून एक सर्व देशभर पसरत गेल्या.”
अर्थात या प्रकरणामुळे मनुवादी विकृती हाडामासात भिनलेल्या काहींची माथी भडकली. त्यांनी अस्पृश्य आता मंदिरे बाटवणार अशी आवई उठवून दंगल सुरू केली. पुढे यातील आठ स्पृश्य गुंडांना ६ जून १९२७ रोजी न्यायालयाने चार महिने सश्रम कारावासाची शिक्षाही केली. मात्र अस्पृश्यांनी बाटवलेले तळे शुद्ध कसे करून घ्यायचे यावर मनुवाद्यात चर्चा सुरू झाली. त्यातून तळ्यातून १०८ घागरी पाणी काढले गेले. त्यात पंचगव्य मिसळले. वेदमंत्रांच्या उद्घोषात ते पाणी पुन्हा तळ्यात ओतले आणि तळे शुद्ध झाल्याचे जाहीर करण्यात आले. अर्थात याला सर्वच स्पृश्यांचा पाठिंबा नव्हता हेही खरे. तळे शुद्ध करण्यापूर्वी बापूराव जोशी यांनी तळ्यात उडी मारून स्नान केले. त्यामुळे त्यांना समाजाने वाळीतही टाकले.
चवदार तळे शुद्ध करण्याच्या प्रकारावर आंबेडकरांनी हे धर्मरक्षण नवे धर्मद्रोह आहे असे भाष्य केले. ते म्हणाले ,” अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक नसून तो आमच्या देहावरील कलंक आहे. तो हिंदूधर्मावर आहे असे आम्ही मानित होतो,तोपर्यंत ते काम तुमच्यावर सोपवले होते. आता तो आमच्यावरील आहे. यासाठी तो धुवून काढण्याचे पवित्र कार्य आमचे आम्हीच स्वीकारले आहे. त्या कार्याच्या सिद्धीसाठी आमच्यापैकी काही जणांना आत्मयज्ञ करावा लागला तरी हरकत नाही. ईश्वरी नेमानेम असा असेल तर आम्ही स्वतःच भाग्यवान समजतो. तुम्ही तळे शुद्ध करून आमची अपवित्रता सिद्ध करण्याचा जो निचतम प्रयत्न महाड येथे केला आहात तसा आणखी हवा तर करा.पण आम्ही पवित्र आहोत हे तुमच्यामुखे वदवून घेतल्याखेरीज आमची शांती होणार नाही.”
नंतरच्या काळात ४ ऑगस्ट १९२७ रोजी महाड नगरपालिकेने चवदार तळे खुले केल्याचा आपला पूर्वीचा ठराव मागे घेतला. परिणामी आंबेडकरांचा लढा अधिक धारदार होऊ लागला. याच दरम्यान लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक आंबेडकरांशी परिचित झाले. ते आंबेडकरांचे चाहते बनले. ब्रिटिश नोकरशाही आणि भिक्षुकशाही हे क्षुद्र वृत्तीची आहेत असे श्रीधरपंत म्हणत. दरम्यान अनेक घडामोडी घडल्या. २५ व २६ डिसेंबर १९२७ हे दोन दिवस पुन्हा सत्याग्रहासाठी निश्चित करण्यात आले. अनेक संकटांना सामोरे जात ही परिषद सुरू झाली. विषमतेची पाठराखण करणाऱ्या प्राचीन आणि अर्वाचीन ग्रंथांचा तीव्र निषेध या परिषदेत करण्यात आला.तसेच ज्या गोष्टीला कायद्याने मनाई केलेली नसेल ती करायला सर्वांना मोकळीक पाहिजे ,रस्ते पाणवठे, देवालाये वगैरे ठिकाणी कोणालाही प्रतिबंध नसावा असे काही ठराव करण्यात आले.
या परिषदेत २५ डिसेंबर १९२७ रोजी रात्री ९ वाजता परिषदेसमोर खणलेल्या खड्ड्यामध्ये एका अस्पृश्य बैराग्याची हस्ते मनुस्मृतीची होळी करण्यात आली.
भारताच्या इतिहासात ग्रंथावर आणि ग्रंथप्रामाण्यावर झालेला हा ऐतिहासिक हल्ला होता.” मनुस्मृती ही त्रिवर्णिकांच्या हक्काचा जाहीरनामा होता. मनुस्मृती शुद्रादीशूद्रांच्या गुलामगिरीची गीता होती.म्हणूनच तिची होळी केली. अस्पृश्यांच्या गाऱ्हाण्यांकडे, दारिद्र्याकडे, दुःखाकडे हालअपेष्ठांकडे स्पृश्य हिंदूंचे लक्ष वेधावे म्हणून आम्ही हातावर शीर घेऊन हे दिव्य केले ” असे आंबेडकरांनी पुढे म्हटले होते.
चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मानवनिर्मित आहे.ती प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील एक रचना आहे.त्यात ब्राह्म, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार प्रमुख वर्ण समाविष्ट आहेत. ही व्यवस्था श्रमविभागणीवर आधारित असून समाजातील व्यक्तींची कर्तव्ये आणि भूमिका ठरवते. ब्राह्मणांनी ज्ञान, क्षत्रियांनी संरक्षण, वैश्यांनी व्यापार आणि शूद्रांनी सेवा करावी, अशी ती संकल्पना आहे. अर्थातच ही शोषणावर आधारलेली व्यवस्था आहे. तिचे समर्थन मनुस्मृती करते. जातिभेद पालन, अस्पृश्यता ,महिलांवरील अन्याय वाढवणारी ही विकृत मानसिकता आहे. त्या मनुवादी विकृतीचा निषेध म्हणून ही कृती केली गेली. चवदार तळ्याच्या सत्याग्रहा बरोबरच मनुस्मृती दहन हेही मानवी प्रतिष्ठासाठी व सामाजिक क्षमतेसाठी एक अत्यंत महत्त्वाचे प्रतीकात्मक पाऊल होते. कारण इतर समाज सुधारक ज्यावेळी विधवांचा पुनर्विवाह ,स्त्रीशिक्षण, प्रौढविवाह, स्त्रियांचा वारसाहक्क आधी विषय मांडत होते. त्यांच्या आंदोलनात जातिभेद आणि अस्पृश्यता निर्मूलन हे अग्रक्रमावर नव्हते. त्यावेळी बाबासाहेब हिंदू समाजाची सामाजिक समतेच्या पायावर पुनर्बांधणी केल्याशिवाय प्रगती होणार नाही ही भूमिका मांडत होते. त्याला मोठा अर्थही होता. कारण जातीय उतरंडीची व्यवस्था आहे तशी ठेवून समाज सुधारणा करणे हे अर्थहीन होते. गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली तरच तो बंड करून उठेल असे त्यांचे मत होते. आत्माभिमान, स्वावलंबन, आणि आत्मोध्दार हा त्यांच्या चळवळीचा प्राण होता. त्या काळात सहा कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या दलित समाजाचा उद्धार त्यांना करायचा होता. पुढची तीस वर्षे म्हणजे ६ डिसेंबर १९५६ रोजी झालेल्या महानिर्वाणापर्यंत बाबासाहेब केवळ त्यासाठी लढत राहिले. दलित समाजाचे जिणे चवदार करण्याचा मोठा प्रयत्न करणाऱ्या महाडच्या तळ्याचा
सत्याग्रह मोठी ऐतिहासिक घटना होती. आजही जातीयवादी विकृतीचे थैमान सुरूच आहे. मनुचे पुतळे उभारून त्याला वंदन केले जाते.अशावेळी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे शताब्दीवर्ष सामाजिक समतेसाठी मोठ्या प्रमाणात साजरे करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली सदतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.)
