दानवाडच्या पुरातन संस्कृतीला उजाळा; राधाकृष्ण मंदिरासमोरील मातीखाली दबलेला ऐतिहासिक घाट पुन्हा प्रकाशझोतात

दानवाडच्या पुरातन संस्कृतीला उजाळा; राधाकृष्ण मंदिरासमोरील मातीखाली दबलेला ऐतिहासिक घाट पुन्हा प्रकाशझोतात

दानवाडच्या पुरातन संस्कृतीला उजाळा; राधाकृष्ण मंदिरासमोरील मातीखाली दबलेला ऐतिहासिक घाट पुन्हा प्रकाशझोतात

दानवाड (प्रतिनिधी):

कृष्णा आणि दूधगंगा या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेल्या दानवाड (ता . शिरोळ) गावातील ऐतिहासिक वैभवाचा एक सुवर्णकाळ पुन्हा एकदा उजेडात आला आहे. येथील श्री राधाकृष्ण मंदिरासमोर अनेक वर्षांपासून मातीखाली गाडला गेलेला पुरातन घाट तरुण कार्यकर्त्यांच्या जिद्दीमुळे आणि अथक परिश्रमामुळे पुन्हा मोकळा करण्यात आला असून, यामुळे गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवात मोलाची भर पडली आहे.

असा लागला शोध

​दानवाडमधील ऐतिहासिक श्री राधाकृष्ण मंदिरासमोर रस्त्याच्या कामासाठी खुदाई सुरू असताना अचानक काही दगडी बांधकामाचे अवशेष निदर्शनास आले जुन्या पिढीतील लोक या भागात मोठा घाट असल्याचे सांगत असत, परंतु काळाच्या ओघात आणि गाळा साचल्यामुळे हा घाट पूर्णपणे मातीखाली दबला गेला होता. खुदाईमध्ये घाटाचे अस्तित्व स्पष्ट होताच ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले.

तरुणांचा पुढाकार आणि लोकसहभाग

​हा पुरातन वारसा पुन्हा जतन करण्याचा निर्धार गावातील काही तरुणांनी केला. संतोष धनगर, वीरू धनगर, सचिन सांगलीकर, सतीश बेरड यांच्यासह अनेक युवकांनी एकत्र येऊन, ग्रामस्थांच्या मदतीने आणि लोकसहभागातून हा घाट मोकळा करण्याचे काम हाती घेतले . चिकाटीने आणि परिश्रमाने माती उपसल्यानंतर, मंदिरापासून थेट नदीपात्रापर्यंत असलेला हा भव्य घाट आता सर्वांना स्पष्टपणे दिसू लागला आहे

धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व

​प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या संगम क्षेत्राचा उल्लेख ‘यडूर महात्म्य’ आणि इतर धार्मिक ग्रंथांमध्येही आढळतो . सुमारे एक एकर परिसरात पसरलेले हे मंदिर आणि आता उजेडात आलेला घाट, या परिसराच्या प्राचीन वास्तुशैलीची आणि समृद्ध इतिहासाची साक्ष देत आहेत.

जीर्णोद्धाराची मागणी

​सध्या हा मंदिर परिसर काहीसा दुर्लक्षित अवस्थेत आहे. युवकांनी केलेल्या या कार्यामुळे मंदिराच्या गतवैभवाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या प्राचीन घाटाची डागडुजी करून आणि मंदिराचा जीर्णोद्धार केल्यास हे क्षेत्र पर्यटनाच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीने एक मोठे केंद्र ठरू शकते, अशी भावना भाविक आणि ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे

​मातीखाली दबलेला हा वारसा पुन्हा समोर आणून दानवाडच्या युवकांनी आपल्या संस्कृतीला एक प्रकारे नवसंजीवनीच दिली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *