प्रा.डॉ.धनंजयराव गाडगीळ : क्रियाशील विचारवंत

प्रा.डॉ.धनंजयराव गाडगीळ : क्रियाशील विचारवंत

प्रा.डॉ.धनंजयराव गाडगीळ : क्रियाशील विचारवंत

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी

(९८५०८ ३०२९०)

भारतातील थोर अर्थशास्त्रज्ञ ,क्रियाशील सहकाराचे प्रणेते ,भारताच्या नियोजन मंडळाचे माजी उपाध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू ,थोर विचारवंत प्रा.डॉ. धनंजयराव रामचंद्र गाडगीळ यांचा १० एप्रिल हा जन्मदिन. १० एप्रिल १९०१ रोजी जन्मलेले धनंजयराव ३ मे १९७१ रोजी कालवश झाले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होऊन गेला आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेचाही हिरक महोत्सव होऊन गेला आहे. या काळामध्ये महाराष्ट्राची आणि भारताची उभारणी झाली त्यात अनेक नामवंतांचा सहभाग आहे. त्यामध्ये प्रा. डॉ.धनंजयराव गाडगीळ या क्रियाशील विचारवंताची भागीदारी फार मोठी आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय ,सांस्कृतिक ,शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये मूलभूत असे वैचारिक योगदान प्रा.धनंजयराव गाडगीळ यांनी दिले. त्यांनी उभारलेले प्रकल्प, त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यांनी दिलेली व्याख्याने यामधून त्यांच्यातील क्रियाशील विचारवंताचा आणि साक्षेपी द्रष्ट्या दृष्टिकोनाचा परिचय होतो.

डॉ.धनंजयराव गाडगीळ यांचे २३ वर्षांपूर्वी म्हणजे २००० साली जन्मशताब्दी वर्ष होते. त्यावेळी त्यांच्या कार्याची व विचारांची नव्या पिढीला ओळख व्हावी म्हणून राज्य स्तरावर ‘ प्रा.धनंजयराव गाडगीळ जन्मशताब्दी समिती ‘ स्थापन केली होती. त्या समितीद्वारे वर्षभर विविध कार्यक्रम राबवले गेले. डॉ. सुलभा ब्रम्हे यांच्या पुणे येथील निवासस्थानी १६ फेब्रुवारी २००० रोजी झालेल्या या बैठकीत
या समितीचे प्रा.डॉ. एन. डी. पाटील(अध्यक्ष) प्रा. डॉ.श्रीनिवास खांदेवाले ( उपाध्यक्ष) तर डॉ. सुलभा ब्रम्हे आणि प्रसाद कुलकर्णी ( मी ) यांची कार्यवाह म्हणून निवड झाली होती. प्रा.धनंजयराव गाडगीळ यांनी भारतीय जीवनातील अंगप्रत्यंगातील बहुविध प्रश्नांचा पाहणीद्वारे प्रत्यक्ष अभ्यास करून ,विविध समस्यांचे स्वरूप लक्षात घेऊन उपाययोजना सुचवल्या होत्या. आणि त्यांच्या कार्यवाहीचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण, सिंचन विकास ,शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा, विक्री व्यवस्था ,सहकारी कारखानदारी, ग्रामोद्योग, संयुक्त महाराष्ट्र, शिक्षण विस्तार याविषयी त्यांनी मांडलेल्या विचारांना आजही उजाळा देण्याची गरज आहे. कारण दुष्काळ ,सिंचन, कर्ज पुरवठा ,साखर कारखाने या सर्वा बाबत अनेक हितसंबंधी शक्तीप्रभावामुळे आजची परिस्थिती मूळ उद्दिष्टांपासून दूर गेलेली दिसते.गाडगीळांच्या विचारांची पुन्हा चर्चा घडवून आज उपस्थित झालेल्या समस्यांमधून मार्ग काढणे ही आजची गरज आहे. ही भूमिका त्यांच्या जन्मशताब्दी वेळीही आम्ही मांडली होती. आणि आणखी दोन वर्षांनी त्यांचे १२५ वे जन्मवर्ष सुरू होईल त्या पार्श्वभूमीवरही हीच भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या भूमिकेतले द्रष्टेपण आहे. समाजवादी प्रबोधिनीच्या ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचा ऑगस्ट २००० चा अंक प्रा. डॉ. धनंजय राव गाडगीळ जन्मशताब्दी विशेषांक ‘ म्हणून प्रकाशित केला होता.

प्रा.गाडगीळ यांचा जन्म १० एप्रिल १९०१ रोजी नाशिक येथे झाला .त्यांचे बालपण नागपूर येथे गेले .शालेय शिक्षण संपवुन ते १९१८ साली पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे १९२१ साली त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची एम. ए.पदवी मिळवली.पुढे त्याच विद्यापीठात त्यांनी ‘ ‘भारतातील औद्योगिक उत्क्रांती ‘या विषयावर प्रबंध लिहिला आणि एम.लीट ही उच्च पदवी प्राप्त केली.१९२४ ला भारतात परतल्यावर ते मुंबई प्रांताच्या वित्त विभागात अधिकारी म्हणून रुजू झाले. पण अल्पावधीतच सुरत येथे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने ते सुरतला गेले. त्यावेळी पासून सुरू असलेला त्यांचा परिवर्तनवादी विचारांचा प्रवास अखेरपर्यंत सुरू राहिला.

प्रा. गाडगीळ हे पुण्याच्या ‘ गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे ‘ संस्थापक संचालक होते. १९३० साली स्थापलेल्या या संस्थेला नावारूपाला आणण्यामध्ये प्रा. गाडगीळ यांचे योगदान अनन्यसाधारण स्वरूपाचे होते. हे योगदान त्यांनी अखेर पर्यंत दिले. पुढे गाडगीळ पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे १८६९ साली ते भारताच्या नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष झाले. प्रा.गाडगीळ यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये विपुल स्वरूपाचे लेखन केले. तसेच भारत व भारताबाहेरील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी अनेक व्याख्याने दिली. अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय समित्यांवर तज्ञ म्हणून काम केले. त्यांची विचार परंपरा लोकशाहीवादी व उदारमतवादी होती. त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडे यांच्या भूमिकेचा प्रभाव होता असे दिसून येते.

महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सहकाराचा वाटा मोठा आहे .किंबहुना सहकाराच्या विणलेल्या जाळ्यामुळेच भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र संपन्न आणि विकसित झालेला आहे.सहकार चळवळीच्या यशस्वीतेवर प्रा. गाडगीळ यांची निष्ठा होती. सहकाराचा अतिशय गांभीर्याने आणि बारकाईने विचार त्यांनी केलेला होता. सहकाराच्या विविध अंगोपांगांचा नेमका विचार करून सहकाराला परिपूर्ण चळवळ करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला होता. म्हणूनच सहकाराबाबत ते केवळ विचार मांडून थांबले नाहीत तर सहकारी साखर कारखाने उभे करण्यावरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. १९४९ मध्ये नगर जिल्ह्यातील प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवण्यामध्ये प्रा.गाडगीळ आग्रभागी होते. पुढे महाराष्ट्रात अनेक सहकारी साखर कारखाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहि ले.सहकारी कारखानदारीचे हे लोण महाराष्ट्रा बाहेर भारतभर पोचवण्याचेही मोठे काम त्यांनी केले. तसेच बँकिंगचे क्षेत्रातही मोठे काम केले. रिझर्व बँकेच्या संचालक मंडळाचे ते अनेक वर्ष सदस्य होते. त्यामधून त्यांनी भारतातील निरनिराळ्या बँकांच्या उभारणीस सक्रिय सहकार्य केले. सहकाराच्या अनेक क्षेत्रांना त्यांचा परिसस्पर्श लाभला. संपत्तीचे केंद्रीकरण आणि संपत्तीचे विषम वाटप यावर टीका करण्याबरोबरच त्यांनी सत्ताधारी वर्गाचे अग्रक्रम कोणते असले पाहिजे हेही सांगितले होते.

संयुक्त महाराष्ट्रा बाबत प्रा. गाडगीळ यांचे मत असे होते की, मराठी बोलणारे सर्व प्रदेश महाराष्ट्रात आले पाहिजे.१९४६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाल्यानंतर ते तिचे सदस्य झाले. या परिषदेने संयुक्त महाराष्ट्राचा आराखडा तयार करण्यासाठी १९५४ साली नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य समाजवादाच्या दिशेने वाटचाल करू शकेल असा त्यांना विश्वास वाटत होता.१९५९ साली साधना अंकातील मुलाखतीत ते म्हणाले होते की,’ सामाजिक, आर्थिक,भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या लोकसमूहातून काही विशिष्ट गुण निर्माण होतात. त्या लोकसमूहाच्या सर्वसामान्य आकांक्षा या गुणांचे प्रतिबिंब आपल्याला पहावयास मिळते. हळूहळू त्यातूनच त्या त्या लोकसमूहाचा स्वभाव बनत जातो. मराठी भाषा समूहाचाही असा काही सर्वसामान्य स्वभाव आहे. त्यामुळे समाजवादी समाज निर्मितीचे काम येथे लवकर मूळ धरू शकेल.तशी अनुकूलता येथे अधिक आहे.’

पुढे एके ठिकाणी ते म्हणतात,’ समाजवादी नियोजनामुळे उत्पादन घटणार तर नाहीच उलट ते वाढेल. त्यातूनच नवे भांडवल उभारले जाईल.धंदा नियोजित पद्धतीने चालला आणि त्याला आवश्यक ते आर्थिक तंत्रिक सहाय्य योग्यवेळी मिळाले तर त्यातून अधिक भांडवल निर्माण होते. सुरुवातीला लागणारे आर्थिक सहाय्य वेळेवर मिळाले पाहिजे.जर समाजवादी दृष्टी असेल तर असे सहाय्य मिळू शकेल. भांडवल उभारणी समाजवादी नियोजनाने अधिक विस्तृत प्रमाणावर होऊ शकेल. आमच्या प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याचे सुधारण घेऊ. दहा वर्षांपूर्वी आमच्या साखर कारखान्याच्या हजार शेतकरी सभासदांचे दहा लाख रुपये भाग भांडवल होते. आज त्याच सहकारी कारखान्याची मालमत्ता सव्वा कोटीची आहे.२५-३० लाखांचे देणे वजा केले तर बाकीची भांडवल उभारणी कारखान्याचे उत्पादनातून सभासदांच्या मालकीची झाली आहे. याविषयी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही की, जे भांडवलदार आज मराठी प्रदेशात आहेत तेही येताना काही भांडवल घेऊन आले नव्हते. त्यांनी जमवलेले भांडवल येथल्या उत्पादनातूनच मिळालेले आहे. समाजवादी नियोजनात उलट शोषण कमी होईल.आणि उभारलेले भांडवल एका व्यक्तीचे न होता सामूहिक होईल. व त्याचा अधिक नियोजित पद्धतीने उपयोग होऊ शकेल. उत्पादन वाढते तसतसे भांडवलही अधिकाधिक उभारले जाते.सहकारी पद्धतीच्या उत्पादनात कोणाचेही शोषण न करता ते उभारले जाते हे विशेष.”

प्रा.गाडगीळ यांनी आपल्या पन्नासावर वर्षाच्या सार्वजनिक जीवनात विविध क्षेत्रात दैदिप्यमान स्वरूपाची कामगिरी केली. शेतीपासून समाजवादापर्यंत आणि संस्कृती पासून शिक्षणापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले. त्यांचे मराठी व इंग्रजी लेखन हे मुळातून वाचण्यासारखे आहे.एखाद्या लेखात त्यांनी ज्या ज्या विषयांना हात घातला ते विषयही न मावणारे असल्याने त्यांचे सार सांगणे तर त्याहून अवघड आहे. विघटित समाजाचे एकसंधीकरण, राजसत्तेचे विकेंद्रीकरण आणि लोकाभिमुख आर्थिक विकास यात्रिसूत्री मध्ये प्रा. गाडगीळ यांची वैचारिक भूमिका दिसून येते.

आज आपल्या एकतेचा व अखंडतेचा प्रश्न महत्त्वाचा बनलेला आहे. भारतीय एकतेबद्दल ‘भारत व महाराष्ट्र ‘या आपल्या लेखात प्रा.गाडगीळ म्हणतात ,’भारतीय एकात्मतेची भावना टिकून राहिली याचा संबंध विशिष्ट राज्यसत्ता व राज्यकारभार यांच्याशी मुळीच नव्हता.तसेच तिचा संबंध विशिष्ट धर्म अगर पंथ यांच्याशी नव्हता. शैव,वैष्णव ,बौद्ध , जैन किंवा महानुभाव, लिंगायत,शीख या सर्व परंपरेचे वारसदार यांच्या एकमेकांतील मतभेदांमुळे मूळ परंपरेला कोणत्याच प्रकारे धक्का बसला नाही.कोणताही ग्रंथ, इतिहास, अगर भाषा यांच्याशी ही परंपरा चिकटलेली नाही. भारतीय एकतेचे विविधतापूर्ण कोणत्याही एकाच विषयाबद्दल अनाग्रही असे स्वरूप आहे. “
प्रा.गाडगीळ यांनी सातत्याने सामान्य माणसाच्या हितासाठी विकेंद्रीकरण, प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्य यांचा आग्रह धरला.त्यांचेअखंड जीवन एखाद्या तपस्वी ऋषी प्रमाणे ज्ञानसाधनेत गेले.आपल्या ज्ञानाचा वापर त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सामान्यासाठी केला. भारतीय नियोजनाला त्यांनी आकार दिला. सहकार क्षेत्राला समाजनिष्ठतेचा आशय त्यांनी मिळवून दिला. आचार्य शांताराम गरुड यांनी म्हटले आहे,’भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे तत्वज्ञान साकार करण्यासाठी आर्थिक ,राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपली वाटचाल कशी असली पाहिजे याची विश्वमानवाच्या गतिशीलितेशी सम साधून आपले भौतिक वास्तव आणि लोकमानसिकतेचे स्पंदन यांचे भान ठेवणारी आपली विचार आचारांची संहिता सांगणारे आणि तिची पायाभरणी करण्यासाठी आपली सारी बौद्धिक शक्ती व संघटनाचातुर्य वेचणारे आणि संयुक्त महाराष्ट्र ही आपली कार्यशाळा नावारूपाला आणणारे एक शिल्पकार म्हणून डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या व्यक्तित्वाची व कार्यकर्तृत्वाची ओळख होऊ शकते.’

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेली अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *