जयसिंगपूर/प्रतिनिधी :
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा क्रांती चौक बसस्थानक आवार जयसिंगपूर येथे उभा करण्याची आम्ही मागणी केल्यांनतर माजी खासदार राजू शेट्टी व अन्य नेत्यांनी हा पुतळाच उभारू नये यासाठी षडयंत्र रचताना बसस्थानकाच्या कंपाऊंडच्या बाहेर असणार्या एका मुतारीचे राजकीय भांडवल केले आहे. आणि जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या जागेचा हट्ट धरला आहे. राजू शेट्टी आणि लोकांच्यात मतभिन्नता निर्माण करणार्या नेत्यांनी न्यायालयाच्या इमारतीत चार संडास, तीन मुतारी आहेत. हे कधी पाहिलं का? त्या वर्षानुवर्षे सुरू आहेत. असे असताना केवळ पुतळाच होवू नये यासाठी सुरू केलेलं राजकीय ढोंग त्यांनी तात्काळ थांबवावे, अन्यथा आंबेडकरी जनता राजू शेट्टी आणि पुतळा होवू नये यासाठी झटणार्यांचा समाचार घेतील, असा खणखणीत इशारा रविवारी शिरोळ तालुका आरपीआयचे सरचिटणीस संजय शिंदे, प्रमोद कांबळे, किरण भोसले, सुरेश कांबळे (गौरवाडकर), बी.आर. कांबळे, अभिजीत आलासकर, अब्दुल बागवान आदी प्रमुखांनी केला आहे.
उभय प्रमुख बोलताना म्हणाले, २०१६ च्या ठरावाचं भांडवल करणार्या राजू शेट्टींनी ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्ष कोणाचे होते याचे उत्तर द्यावे, त्या काळात तुम्ही काय केलंत? खासदार, आमदार ही पदं भोगला. एकदा तर बैठक या प्रश्नावर लावली का? आज आंबेडकरी जनतेने बसस्थानकाच्या आवारात पुतळा होवू शकतो हे गृहीत धरून मागणी केली. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवेदन दिले. संबंधित विभागांना निवेदन दिली. ती जागा मिळणार म्हटल्यांनतर केवळ राजकारण डोकीत ठेवून राजू शेट्टी आणि काही नेत्यांनी आंबेडकरी जनतेत विचारात विष कालवायचे काम सुरू केले आहे. नेहमीच्या लबाड, ढोंगी, दुटप्पी स्वभावातून पुतळा होवू नये असे ते षडयंत्र रचताहेत. जी न्यायालयाची इमारत आहे तिथे सध्या न्यायालय सुरू झाल्यापासून आजअखेर सुस्थितीत तीन मुतारी, चार संडास आहेत, शिवाय बाथरुम वेगळे. हे दिसत नाही? राजू शेट्टी यांनी जावे आणि आढावा बैठक घ्यायच्या अगोदर खात्री करावी. बसस्थानकाच्या आवारात पुतळा उभारला पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. आणि १४ एप्रिलला भूमीपूजन करणारच आहोत. असे सांगत संजय शिंदे म्हणाले, जयसिंगपुरात ज्या बौध्द परिषदा झाल्या त्यातल्या एका तरी बौध्द परिषदेला निमंत्रण देवूनही राजू शेट्टी हजर होते का? कोथळीच्या दलित बांधवाच्या मृत्यू प्रकरणात त्यांची भूमिका काय होती? दलित भगिनी सरपंच झाली. साडीच्या कारणावरून किती बदनाम केलात? शिरटीत तुम्ही काय गुण उधळलेत? हे तुम्ही तोंड उघडायला आम्हाला लावू नका. इतर नेत्यांनाही याच माध्यमातून आम्ही इशारा देतोय. तुमच्याही सहकारी संस्था आहेत. लोकांची माथी भडकवून समाजात विष कालवण्यापेक्षा सेंद्रिय चहा जिथे घेता तिथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावा आणि सहकारी कार्यालयाच्या आवारात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करावा. असा इशारा देत ते म्हणाले, खूप काही बोलता येईल. आम्ही भिमसैनिक आहोत. रस्त्यावर उतरणे आमच्यासाठी काही नवं नाही. जी जागा आम्हाला मिळणार आहे, पुतळा उभारणार आहे, या कार्यात आडवं येवू नका. पुतळा बांधण्यासाठी कोण पुढाकार घेतलंय. आमचं प्रेरणा आणि श्वास उभा राहणार आहे हे महत्वाचं आहे. हे आम्ही पुन्हा एकदा सांगतोय. अन्यथा संघर्ष अटळ. एकमेकांच्या राजकीय कुरघोडीतून पुतळ्याच्या आडून जे राजकारण कराल आणि तो आमच्या प्रेरणास्तोत्राचा अवमान होणार असेल तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. असेही उभय प्रमुख म्हणाले.
Posted inकोल्हापूर
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे क्रांती चौक बसस्थानक आवार जयसिंगपूर येथे 14 एप्रिल रोजी भूमिपूजन : संजय शिंदे
