सुप्रीम कोर्टाचा अपेक्षित निर्णय जाहीर
सरकारवर ताशेरे, पण सरकार तेच
राजकीय विश्लेषक उदय नरे याचे विशेष बातमीपत्र
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर असलेला सुप्रीम कोर्टाच्या निकालावर साऱ्या देशाचे लक्ष लागले होते या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र समोर आले आहे. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेवरती ताशेरे उडत असतानाच दुसरीकडे मात्र हे सरकार कायम राहील याबद्दल दिलासा दिला.
16 आमदाराच्या अपात्रतेचा निर्णय विषयीचा निर्णय हा महाराष्ट्रातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देतील असे स्पष्ट संकेत दिल्यामुळे निदान तूर्तास एकनाथ शिंदे सरकार हे बचावले. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रामधील राजकीय अस्थिरता काही काळा पुरती तरी शांत झालेली आहे. निकाल आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला राजीनामा या निर्णयाला कारणीभूत ठरत आहे ही बाब सुप्रीम कोर्टाने नमुद केली. उध्दव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले. गद्दारांनी आणलेला अविश्वास हा मला पचणारा नव्हता यामुळेच मी राजीनामा दिला असे स्पष्ट व मत माजी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले मुंबईतील बांद्रा या मातोश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषद पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भेटीसाठी आले होते. या पत्रकार परिषदेत काही काळ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कौश्यांरींची भूमिका संशयास्पद आणि अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. या निकालामुळे राज्यपालांची संशयास्पद भूमिका स्पष्ट झाली हे अधोरेखित झाले. आजपर्यंत राज्यपाल पद हे आदराचं होतं, पण भाजपने या यंत्रणेचे धिंडवडे काढले आहे. त्यामुळे भविष्यात राज्यपाल पद हे अस्तित्त्वात असावे की नाही, याचाही विचार आपण केला पाहिजे. राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. पण पक्षादेश (व्हिप) हा माझ्याच शिवसेनेचा असेल. त्यामुळे आता आम्ही लवकर लवकर विधानसभा अध्यक्षांकडे तशी मागणी करु, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सगळे चुकले पण एकनाथ शिंदे सरकार वाचले अशी अवस्था निर्माण झाली.
शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यातील सत्तांतरानंतर गेले १० महिने सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा न्यायालयीन निर्णय आज, गुरुवारी देण्यात आला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याअध्यक्षतेखालील घटनापीठाने यावरील ऐतिहासिक व दूरगामी निकाल दिला. नऊ दिवसांच्या सलग सुनावणीनंतर १६ मार्च रोजी यासंदर्भातील निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता माजी सरन्यायाधीश अहमदी यांची शोकसभा झाली. त्यानंतर पावणे बाराच्या सुमारास सत्तासंघर्षाच्या निकालाचं वाचन सरन्याधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं. शिवसेना नेमकी कोणाची, राज्यातील बंडखोरी व सत्ताबद कायदेशीर की घटनाबाह्य अशा प्रश्नांभोवती फिरणारी सत्तासंघर्षाची सुनावणी गेल्या महिन्यात संपली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. काहीजण पराभवाचेही फटाके फोडतात अशी खिल्ली एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत उडवली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही अशी भूमिका पत्रकार परिषदेत देवेंद्र फडवणीस यांनी मांडली. लोकशाही आणि लोक मताचा हा विजय असे मत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मी पूर्णपणे समाधानी आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले . आमदार अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिल्याने लवकरच 16 आमदाराचा प्रश्न निकालात लागेल. भाजपला दगा दिला होता त्यावेळी उध्दव ठाकरे यांची नैतिकता कुठे गेली होती? असा खोचक प्रश्न उध्दव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नैतिकतेच्या राजीनामा देण्याची मागणी उध्दव ठाकरे यांनी केली होती त्यास देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले.लाज आणि भीतीने उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता असे उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे सर्व शंका, कुशंका मिटल्या. व आमच्या सरकारवर शिक्कामोर्तब केले आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अपेक्षित निर्णय आल्याने मी समाधानी आहे यामुळे आमच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांनी आता सावध व्हा असा सल्ला दिला. अखेर सत्याचा विजय झाला. सुप्रिम कोर्टाचा निकाल लोकशाहीला धरूनच आहे.जनमताचा आदर ठेऊन आणि बाळासाहेबांच्या विचारांना घेऊनच आमचे सरकार पुढे जाणार आहे अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.