शाळेची घंटा वाजली
नव्या पुस्तकांसह नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील विदर्भ वगळता राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला आज पासून सुरुवात झाली. दिड महिन्याच्या सुट्टी नंतर आज विद्यार्थी मोठ्या उत्साहाने व आनंदाने शाळेत आले. शाळेने सुध्दा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. काही ठिकाणी फुले देऊन तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फलक लावण्यात आले होते.
नव्या शैक्षणिक वर्षात नव्या पुस्तकांची ओळख विद्यार्थ्यांना होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी पुस्तकांमध्ये वह्यांची पृष्ठ असलेल्या नव्या क्रमिक पुस्तकांची ओळख करून देण्यात आली आहे. अनेक विषयाचे एक संयुक्त पुस्तक सत्रानुसार तयार करण्यात आले आहे. या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार आहे त्याचबरोबर मनाचेही ओझे कमी होणार आहे अशी प्रतिक्रिया ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केली.
नव्या शैक्षणिक वर्षा बरोबरच लवकरच नव्या शैक्षणिक धोरणच्या अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे.