उषाताई पत्की : विचारांची बांधिलकी जपणारं व्यक्तित्व

उषाताई पत्की : विचारांची बांधिलकी जपणारं व्यक्तित्व

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)

५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट
समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी
ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर
पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)
prasad.kulkarni65@gmail.com

बुधवार ता.२८ जून २०२३ रोजी कालवश उषाताई यशवंतराव पत्की यांचा आज दुसरा स्मृतिदिन होता. वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी सोमवार ता. २८ जून २०२१ रोजी त्या कालवश झाल्या. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ
समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आणि श्रीमती आ.रा.पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी यांच्या सहकार्याने जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे.’ शोध स्वतःचा ‘ या विषयावर ख्यातनाम राजकीय विश्लेषक आणि स्त्री प्रश्नांच्या अभ्यासक प्रा.डॉ.भारती पाटील (कोल्हापूर ) मांडणी करणार आहेत.यावेळी लोकसाहित्य आणि रंगभूमीच्या ख्यातनाम संशोधक प्रा.डॉ. तारा भवाळकर (सांगली ) या प्रमुख उपस्थित असणार आहेत.अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. त्रिशला कदम आहेत.हे व्याख्यान शनिवार ता.८ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता श्रीमती आ.रा.पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे होणार आहे.

                   अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या उषाताई निवृत्त मुख्याध्यापिका होत्या. सांगली येथील राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा या विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत मराठी,भूगोल व हस्तकला या विषयांच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या.त्यांच्या पश्चात दोन भाऊ व त्यांची मुले असा परिवार आहे. उषाताई समाजवादी प्रबोधिनीच्या हितचिंतक होत्या. ख्यातनाम विचारवंत लेखिका आणि प्रबोधिनीच्या स्थापनेपासूनच्या ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक प्रा.डॉ. तारा भवाळकर आणि उषाताई या भगिनी गेले अर्धशतकाहून अधिक वर्षे सहनिवासीनी होत्या .मूळच्या नाशिककर असलेल्या ताराबाई नोकरीच्या निमित्ताने १९६७ च्या दरम्यान सांगलीला आल्या.त्यापाठोपाठ नाशिककर उषाताईही सांगलीला आल्या.डॉ.तारा भवाळकर या मराठी साहित्य,लोकसाहित्य,लोकसंस्कृती,लोकचळवळ, नाटक,ललितकला या विविध क्षेत्रातील दिग्गज विदुषी आहेत .त्यांच्या समग्र वाटचालीच्या सर्वात जवळच्या साक्षीदार,सहकारी उषाताई होत्या.उषाताईच एक स्वतंत्र व्यक्तीमत्व होत.त्यांचाही लोकसंग्रह मोठा होता. अतिशय लोभस असं त्यांच व्यक्तिमत्त्व होतं.आदर्श शिक्षिका,मुख्याध्यापिका म्हणून काम करत असतानाच त्यांनी भरतकाम, विणकाम , पाककला, वाचन असे विविध छंद जोपासले होते.गेल्या काही वर्षात पायाच्या झालेल्या ऑपरेशनमुळे हातात काठी आली तरी उषाताईंचा उत्सह कमी झाला नव्हता.टापटीप व व्यवस्थितपणा हा त्यांच्या व्यक्तित्वाचा अविभाज्य भाग होता.
                   उषाताईनी २०१५ च्या ऑक्टोबरमध्ये वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केल्यावर समाजवादी प्रबोधिनीला एक लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यातून दरवर्षी एक महिला विषयक कार्यक्रम आयोजित केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.एका निवृत्त शिक्षिकेने एक लाख रुपयांची देणगी प्रबोधन कार्याला देणे ही दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट होती.ती समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यावरील विश्वास व वैचारिक बांधिलकीची पोचपावती होती. समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. एन डी पाटील यांच्या हस्ते उषाताईंचा सत्कारही इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात केला होता. प्रारंभी त्या सत्काराला तयार नव्हत्या पण अशी बांधिलकी जपणारी माणसे समाजासमोर आली पाहिजेत या माझ्या आग्रहामुळे त्या तयार झाल्या.त्यांच्या देणगीतून इचलकरंजी ,सांगली, जयसिंगपूर आदी ठिकाणी गेली सात वर्षे आपण कार्यक्रम घेतले. त्यातील काही  कार्यक्रमांना उषाताईंची उपस्थिती होती. उषाताईच्या दुसऱ्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *