महाराष्ट्रातील पंधरा लाख बांधकाम कामगारांचे थकीत अर्ज ताबडतोब निकाली काढा.आचारसंहितेच्या नावाखाली अर्ज मंजूर करण्यास नकार देणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विरुद्ध राज्य निवडणूक निर्णय अधिकार्याकडे तक्रार करणार.
*एक महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य कामगार विभागाचे उपसचिव श्री बाळासाहेब खरात यांची आमच्या कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता त्यानी असे नमूद केले होते की. सध्या महाराष्ट्रामध्ये जे सर्व 15 लाख बांधकाम कामगारांचे नवीन नोंदणी,नूतनीकरण, शिष्यवृत्ती व घर मागणी अर्ज इत्यादी सर्व प्रलंबित अर्ज आहेत ते तातडीने मंजूर करण्यात येतील.
परंतु त्यांच्या या आदेशाची कसलीही अंमलबजावणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक कुंभार यांनी अजूनही न करता महाराष्ट्रातील 15 लाख कामगारांच्या वर सातत्याने ते अन्याय करीत आहेत.
आचारसंहितेचा बागुलबुवा उभा करून ज्या आचारसंहितेमध्ये नमूद नाही ते सांगून प्रत्यक्षात बांधकाम कामगारांची कामे करण्यास नकार दिला जात आहे. परंतु काही योजना ज्या वादग्रस्त आहेत त्या मात्र त्यांनी सुरू ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ बांधकाम कामगारांच्या आरोग्याची तपासणी करणे. प्रत्यक्षात बांधकाम कामगारांचे रक्त काढून घेऊन तपासणी केली जाते त्यांच्याकडून आरोग्य तपासणी झाली म्हणून लिहून घेतले जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र तपासणी रिपोर्ट दिला जात नाही. आणि बांधकाम कल्याणकारी मंडळ एका कामगाराकडून त्यासाठी संबंधित कंत्राटदाराला आठ हजार रुपये खर्च देतात.
प्रत्यक्षात तपासणी केल्याबद्दल कसलेही रिपोर्ट्स नोंदीत बांधकाम कामगारांना मिळत नाहीत. ही योजना मात्र सुरू ठेवून बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देणे, मयत विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देणे हे मात्र त्यांनी आचारसंहितेच्या नावाखाली बंद केलेले आहे. याविरुद्ध सर्व बांधकाम कामगारांच्या मध्ये असंतोष वाढत चाललेला आहे.
या अत्यंत महत्त्वाच्या तातडीच्या विषयावर सांगली निवारा भवन येथे प्रमुख बांधकाम कामगारांचा मेळावा घेण्यात आला.
त्यामध्ये असे ठरवून ठरवण्यात आले की आचारसंहितेच्या नावाखाली जर बांधकाम कामगारांची कामे नाकारण्यात येत असतील तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवला जाईल व तक्रार करण्यात येईल.
त्यासाठी मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी ठीक सकाळी 11 वाजता सिविल हॉस्पिटल च्या पाठीमागे मराठा सेवा सभागृहामध्ये महत्त्वाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे .
तरी या मेळाव्यास जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी केलेले आहे. याप्रसंगी कॉ सुमन पुजारी, कॉ विशाल बडवे, कॉम्रेड राजेंद्र मंगसुळे , कॉ रोहिणी खोत, कॉ सनम मुल्ला व स्वलिया सौदागर इत्यादींनी मेळाव्यामध्ये आपले मत मांडले.