एकुंडीचे अशोक महाराज यांची कठोर भक्ती : चंद्रभागा नदी पंढरपूर ते इंद्रायणी नदी आळंदी साष्टांग दंडवत उपक्रम.
एकुंडी ता. जत जि. सांगली येथील किर्तनकार, प्रवचनकार ह. भ. प. अशोक आण्णाप्पा नाईक (महाराज), गुरुवर्य कै. ह. भ. प. विवेकानंद वासकर महाराज पंढरपूर यांचे शिष्य हे नेहमी भगवद्भक्तीत असतात. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी हल्याळ ता. अथणी येथून कृष्णा नदी ते चंद्रभागा नदी पंढरपूर हे अंतर सुमारे दोन महिन्यात साष्टांग दंडवत वारी करत पुर्ण केले होते. आत्ता ६० व्या वर्षी त्यांनी जवळ-जवळ जागतिक विक्रम म्हणावा अशी पंढरपूर चंद्रभागा नदी ते आळंदी इंद्रायणी नदी अशी दंडवत वारी चालू केलेली आहे. दि. २९/०५/२०२४ पासून त्यांनी ही वारी चालू केलेली आहे. रोज ४ ते ५ किमी दंडवत घालतात. सोबत पत्नींना सुद्धा पायी वारी घडावी म्हणून सोबत ठेवलेले आहे. ते स्वयंपाक पाणी इ. व्यवस्था पाहतात. अतिशय कठोर व अनोखी भक्ती व श्रद्धेच्या जोरावर ते मार्गक्रमण करत आहेत. कलीयुगात हा भक्तीचा दुर्मिळ योग आहे. गावकरी त्यांना भेटायला जातात व गुजगोष्टी करुन परत येतात. आत्ता ते फलटण पर्यंत पोहोचलेले आहेत. अजून एक दिड महिना तरी आळंदीला पोहोचायला लागेल असे वाटते. त्यांच्या या भक्तीचा जागतिक पराक्रमच म्हणावा लागेल. गिनीज बुक व लिमका बुक ॲाफ रेकॅार्ड्स वाल्यांनी येथे भेट देवून खात्री करावी व त्यांच्या या भक्तीची नोंद कुठेतरी व्हावी अशी एकुंडी येथील ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या कार्यास सर्व महान संत कृपेने यश प्राप्त होवो हीच श्री. पांडुरंग चरणी व श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना!
॥ जय जय राम कृष्ण हरी ॥
Posted inकोल्हापूर