शिक्षक आमदार निवडणूक : शिक्षण क्षेत्राच्या अधोगतीची फुटपट्टी ठरते आहे (हेरंब कुलकर्णी)
साने गुरुजी आज उमेदवार असते तर आज त्यांचे डिपॉझिट गेले असते …
(मागील निवडणुकीत पैठणी या निवडणुकीत नथ आणि सफारी)
६ वर्षापूर्वी झालेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षकांना पैठणी वाटली गेली होती..एके ठिकाणी काही ध्येयवादी शिक्षकांनी ती पैठणी जाळून निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी मी स्वतः निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. Abp maja वर चर्चा घडली होती. त्यात आक्रमक विरोध नोंदवला होता.त्यावेळी आमिष देणाऱ्या उमेदवारांची आणि घेणाऱ्या शिक्षकांची समाजात खूप नाचक्की झाली होती
पण आज ६ वर्षानंतर पुन्हा तेच घडते आहे. काही उमेदवार पुन्हा शिक्षकांना वस्तू वाटप करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी शिक्षक असेल तर रेमंड कंपनीचे सफारी चे कापड आणि महिला शिक्षक असेल तर नथ दिली जात आहे. त्या भेट वस्तूंचे फोटो सोशल मिडीयात फिरत आहेत. जळगाव जिल्ह्यात तर थेट शाळेवर जाऊन असे वाटप करण्याची हिम्मत झाल्याची बातमी येते आहे..
हा अध:पात पुन्हा या निवडणुकीतही होतो आहे. शिक्षक मेळावा नावाखाली जेवणावळी सुरू झाल्या आहेत..
मागील निवडणुकीत शिक्षण क्षेत्राची आणि शिक्षकांची इतकी बदनामी होऊनही काहीच परिणाम नाही …यातून समाजात शिक्षक अजून बदनाम होत आहेत ,हे वाटणारे आणि घेणारे यांना कळत नाही का ? सोसायटीची निवडणूक,ग्राम पंचायत निवडणूक इतर निवडणूक आणि ही निवडणूक वेगळी असते या निवडणुकीत जे धनदांडगे उतरले आहेत त्यांना हे कळत नाही का ?
पुन्हा हे वाटप करणाऱ्यांना ही शरम वाटायला हवी की नाशिक शिक्षक मतदारसंघ हा साने गुरुजी जेथे शिक्षक होते (अंमळनेर) तो मतदारसंघ आहे. २०२४ या वर्षी साने गुरुजी शिक्षक झाले त्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. गुरुजींचे १२५ वे जयंती वर्ष सर्व राज्यात सध्या साजरे होत आहे…अशा शिक्षणाच्या पुण्यभूमीत
आपण शिक्षकांना अधोगत करतो आहोत…साने गुरुजी याच मतदार संघात शिक्षक होते आज साने गुरुजी इथे उमेदवार असते तरी या धन दांडग्यानी त्यांना ही पैशाच्या जोरावर पराभूत केले असते …
मला जास्त वाईट शिक्षक समुदायाचे वाटते की मान्य आहे की ते वस्तू देतात. ते विकायलाच बसले आहेत पण आपल्याला आपल्या शिक्षकी पेशाचा काही स्वाभिमान आहे की नाही..? आपण असे विकले जाण्यासाठी महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख आणि अनेक महापुरुषांनी शाळा काढल्या का ? साने गुरुजींचे आम्ही वारसदार असू तर असे घेताना आमचे हात थरथरत नाही का ? असे वाटप करणारे दारात आल्यावर आपली शिक्षक असण्याची किंमत इतक्या स्वस्तात होताना संताप होत नाही का ? पायातील चप्पल काढून अशा दलालांना आम्ही झोडपत का नाही ? असे घेणारे कदाचित संख्येने कमी असतील पण घेणारे आहेत म्हणून देणारे आहेत हे लक्षात घेऊ या…
या अशा आमिषाला बळी पडून आपण समाजात शिक्षकी पेशाला बदनाम करतो आहोत हे लक्षात घेवू या..समाज शिक्षकांवर जी टीका करतो त्याला अशा घटनेने बळ मिळते हे समजून घेवू या..
म्हणून असे वाटप करणारे दलाल शिक्षकांनी पकडुन द्यावेत..अशा वस्तूंची होळी करावी किंवा असे एजंट पकडुन द्यावेत. फोन रेकॉर्डिंग व्हायरल करावेत …
मला तर वाटते की शिक्षक मतदार संघ आता रद्द करावेत. एकेकाळी समाजात शिक्षक हाच शिकलेला घटक होता पण आज समाजात सगळेच शिकलेले आहेत तेव्हा या मतदारसंघाची गरज काय ? आणि धनदांडगे जर शिक्षकांचे नेतृत्व करणार असतील तर विनाअनुदानित गरीब शिक्षकांचे हे काय प्रश्न मांडतील ? यांना ते दुःख तरी कळेल का ? या मतदारसंघाचा शिक्षकांना काहीच उपयोग होत नाही…आमचे प्राथमिक शिक्षक तर या मतदार संघात साधे मतदार ही नाहीत…मग उपयोग काय ?
आणि जर हे मतदारसंघ ठेवायचे असतील तर शिक्षक हेच येथे उमेदवारी करतील असा नियम करायला हवा..शिक्षक च शिक्षकांचे प्रश्न समजू शकतो, राजकीय नेते किंवा धनदांडगे ते समजू शकणार नाहीत…
बरे झाले साने गुरुजी आज तुम्ही जिवंत नाहीत…आम्ही तुम्हाला निवडणुकीत उभे केले असते आणि या पैठणी आणि नथीने तुमचे डिपॉझिट घालवले असते गुरुजी….तुम्ही शिक्षक होण्याला १०० वर्षे झाली…
साने गुरुजी ते नाणे गुरुजी ही १०० वर्षाची घसरण आहे गुरुजी. …वेदना होतात गुरुजी…
हेरंब कुलकर्णी
मुख्याध्यापक
मॉडर्न हायस्कूल अकोले.जिल्हा अहमदनगर