आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत -कपिल पाटील यांची घणाघाती टीका

आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत

कपिल पाटील यांची घणाघाती टीका

(मुंबई विशेष प्रतिनिधी) :
शिक्षण सेवक आणि कंत्राटीपद्धत आणून शिक्षकांचे नुकसान करणारे आणि आदर्श सोसायटीत कारगिल शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत, अशी घणाघाती टीका मावळते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.

कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार संघातून सलग तीन टर्म (18 वर्षे) पूर्ण केल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन आपले तरुण सहकारी, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबईत तिरंगी, चौरंगी लढतीमध्ये यावेळी मुंबई बँकेने सुद्धा उमेदवार उतरवला आहे. राष्ट्रीयकृत बँकेतून मुंबईतील शिक्षकांचे पगार झाले पाहिजेत यासाठी शिक्षक भारतीने आंदोलन केलं होतं. सुप्रीम कोर्टापर्यंत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर आणि स्वत: सुभाष मोरे गेले होते आणि मुंबईतील शिक्षकांचे पगार सुरक्षित केले होते. ते पगार पुन्हा मुंबई बँकेत वळवण्यासाठी मुंबई बँकेने आपला उमेदवार उतरवला आहे. पण मुंबईचे शिक्षक कधीही आपला पगार मुंबई बँकेत जाऊ देणार नाहीत, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.


मुंबई शिक्षक मतदार संघात पैशाचं वाटप, कपिल पाटील आणि सुभाष मोरे निवडणूक आयोगाकडे पुराव्यानिशी तक्रार करणार –

मुंबई शिक्षक मतदार प्रथमच धनदांडग्यांकडून प्रचंड प्रमाणात पैशाचं वाटप होत असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला. पाच – दहा हजार देऊन शिक्षक विकत घेण्याची ही पद्धत अत्यंत निषेधार्ह आहे. शिक्षकी पेशाचा अवमान करणारी आहे. याबाबत कपिल पाटील उद्याच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत आणि त्यांना पुराव्यानिशी तक्रार सादर करणार आहेत.


समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यावेळी मुंबई शिक्षक मतदार संघाच्या रिंगणात नसल्यामुळे मोठ्या राजकीय शक्तींनी ताकद लावली असली तरी पेन्शनच्या लढाईत सरकारी कर्मचाऱ्यांसोबत अग्रभागी असलेले सुभाष मोरे सध्या निवडणुकीत आघाडीवर आहेत. अत्यंत सामान्य घरातून आलेले आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले सुभाष मोरे पहिल्या पसंतीची मतं घेऊन प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *