
इचलकरंजी ता. हातकणंगले या ठिकाणी श्री. तांबे सर यांची श्रद्धा अकॅडमी सुरू आहे. सदर अकॅडमी मध्ये परिसरातील तसेच आसपासच्या काही जिल्ह्यातील मुले व मुली शिक्षण घेत आहेत.लाखो रुपये फी या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. दोन दिवसापूर्वी बाहेर रूम घेऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्याच वस्तीगृहात राहण्याची सक्ती करण्यात आली. यावेळी नकार देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून बेदम मारहाण करण्यात आली व त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी त्यांचे शालेय साहित्य विस्कटून देण्यात आले. ही घटना पालकांना समजल्यानंतर काही पालकांनी याचा जाब विचारला असता अकॅडमीच्या शिक्षकांनी त्यांना अरेरावीची भाषा करून दमदाटी केली. या शिक्षकांची कृती ही शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी असून काही महिला पालकांना सुद्धा शिक्षकांकडून उद्धट भाषेत शिवीगाळ करण्यात आलेली आहे. ही घटना निषेधार्ह व निंदनीय आहे.एवढी मोठी घटना घडून सुद्धा शिक्षण विभागाने या घटनेकडे अक्षम्यपणे दुर्लक्ष केले आहे ही बाब गंभीर आहे. प्रशासनाने अकॅडमी व अकॅडमीच्या संचालकांना तसेच शिक्षकांना पाठीशी घातल्याचे दिसून येत आहे. या अकॅडमीत फसव्या जाहिराती विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी आकारली जाते. या फी चा विनियोग कशा पद्धतीने केला जातो यासाठी संस्थेच्या आर्थिक हिशोबाची तपासणी करून संचालकांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी. दोषी आढळल्यास संचालकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी दलित महासंघाचे(वायदंडे गट) पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. हुसेन मुजावर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. या निवेदनात पोलीस प्रशासनाकडून गुंड प्रवृत्तीच्या शिक्षकांवर योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करावेत तसेच श्रद्धा अकॅडमी या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशा मागण्या केलेल्या आहेत.सदर मागण्या १५ दिवसात पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात हुसेन मुजावर यांनी म्हटले आहे.