राजर्षी शाहू महाराजांचे जीवनकार्य सर्वांगीण समतेसाठी ; ज्येष्ठ इतिहासतज्ञ प्राचार्य डॉ. टी.एस.पाटील





इचलकरंजी ता.२६ राजर्षी शाहू महाराजांचे जीवनकार्य, सर्वांगीण समतेसाठी त्यांनी अंगीकारलेले तत्त्वज्ञान आणि त्यासाठी केलेली कृती आज सव्वाशे वर्षानंतरही आपणा सर्वांना स्वीकारण्यासाठी आदर्शवत स्वरूपाची आहे. संस्कृती, परंपरा ,इतिहास आणि प्रबोधन चळवळीविषयी त्यांना असलेला जिव्हाळा अतिशय महत्त्वाचा होता. आपली सत्ता आणि संपत्ती सर्वसामान्य लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी वापरली. शिक्षणापासून धर्मव्यवस्थेपर्यंत आणि सहकारापासून विविध कलांना प्रोत्साहन देण्याची या राजाची भूमिका आजच्या लोकशाही व्यवस्थेतही स्वीकारण्याची गरज आहे ,असे मत ज्येष्ठ इतिहासतज्ञ प्राचार्य डॉ. टी.एस.पाटील यांनी व्यक्त केले.ते लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त समाजवादी प्रबोधिनी ,प्रबोधन वाचनालय आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘आजच्या संदर्भात शाहू ‘या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी मौसमी चौगुले होत्या. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रास्ताविक पांडुरंग पिसे यांनी केले.प्रसाद कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.प्राचार्य डॉ. टी.एस. पाटील यांनी आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण भाषणात राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची व कार्याची आजच्या काळातील गरज विविध उदाहरणांच्या सहाय्याने अधोरेखित केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रांताधिकारी मोसमी चौगुले म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांकडे समाज सुधारकाला लागणारी क्रियाशीलता होती. लोकांच्या उद्धारासाठी ते सतत कार्यरत राहिले.माणसाचा माणूस म्हणून विचार करून मानवधर्माची प्रस्थापना करण्याचे ,सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले. त्यांच्या विचारांची कास धरून त्यावर आधारीत वाटचाल करणे अतिशय महत्त्वाचे आहेत. विचारांची व प्रबोधनाची परंपरा खंडित होता कामा नये. ती झाली तर येणाऱ्या पिढ्यांना त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. यासाठी शाहू राजांच्या विचारावर आधारित आपण सर्वांनी वाटचाल करण्याची गरज आहे.

यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी प्रबोधिनी व वृत्तपत्र लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘ मी मतदार :माझी जबाबदारी ‘ या पत्रलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रांताधिकारी मौसमी चौगुले, प्राचार्य डॉ.टी. एस.पाटील ,जयकुमार कोले व माजी आमदार राजीव आवळे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेचे परीक्षण पांडुरंग पिसे व दीपक पंडित यांनी केले. पत्रलेखन स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – प्रभाकर शंकर परमणे (प्रथम), गजानन बाळासाहेब खडके (द्वितीय), सायली अनिल पाटील (तृतीय )वंदना पांडुरंग भंडारे ( उत्तेजनार्थ) यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.अन्वर पटेल यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *