डॉ.एस.के.माने यांची इतिहास व क्रांतीची मांडणी

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,
समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com

‘भारताचा सत्य इतिहास व संपूर्ण क्रांतीचा राजमार्ग ‘ हे डॉ.एस.के.माने
यांचे लेखन इतिहासाची एक नवी मांडणी करण्याचा प्रयत्न आहे. अनेक ठिकाणी जगभरातील विविध प्राचीन नावाची ग्रंथांचा व विचारवंतांचा दाखला या लेखनात दिसून येतो. त्यामुळे ते पुराव्यासह हा इतिहास मांडण्याचा जो दावा करतात तो दुर्लक्षित करता येत नाही.
डॉ.माने यांच्या मते, स्त्रियांच्या नेतृत्वाखाली समतेची मातृप्रणाली व्यवस्था शेकडो वर्षे सुरू होती .समूहाचा कारभार हा समता बंधुता व लोकशाही या तत्त्वावर होत होता. पशुपालन ,व्यापार आदिना या काळात चालना दिली गेली. त्या काळात पंजाब ,राजस्थान ,सरस्वती, सिंधूचे दुतर्फा राजपुतान्यापर्यंत ते अफगाणिस्तान ,सीरिया, सुमेर ,चीन, मंगोलियापर्यंत अशाच प्रकारच्या मातृप्रणालीच्या शेकडो संस्कृती नांदत होत्या.त्यांचा एकमेकांशी व्यापार उदीमासाठी परस्पर देवाण घेवाणीचा विनिमय होता. ही मातृप्रणालीची राज्यव्यवस्था असलेली कृषी प्रधान तंत्रज्ञानावर आधारलेली तंत्र व माया संस्कृती होती.संघर्षापेक्षा सहकार्यावर या संस्कृतीचा भर होता.नवनिर्मितीची अंगभूत शक्ती तिच्यामध्ये होती.त्यांनी शेती तंत्रज्ञान विकसित केले होते . आदिमातांनी आपल्या लोकसमूहाचे पालन पोषण केले. सिंधू संस्कृतीने शेती, पशुपालन ,व्यापार, स्थापत्य ,पाणीपुरवठा याबाबत चांगली प्रगती केलेली होती.

जवळजवळ तीनशे पृष्ठांच्या या पुस्तकात त्यांनी सत्य इतिहासाचे स्त्रोत, सिंधू संस्कृती, आर्यांचा भारतातला इतिहास, गणांचा उदय, बिंबिसार ,सिकंदर, चंद्रगुप्त मौर्य ,सम्राट अशोक ,बुद्ध,महावीर, चार्वाक, बसवेश्वर, पुष्यमित्र शुंग , युनानी राज्य, कण्व, कनिष्क, पाल ,सातवाहन, भाषेचा इतिहास, जातीचा उगम, मनुस्मृती ,शंकराचार्य, वेद, रामायण, महाभारत, गीता, पुराणे,वेदांत, प्राचीन व मध्यकालीन साम्राज्य प्रतीहार साम्राज्य मध्ययुगीन मोगल राजवटी ,मराठी साम्राज्य, पेशवाई ,शिंदे ,होळकर, टिपू सुलतान ,इंग्रज, छत्रसाल बुंदेला ,शीख धर्म , पोर्तुगीज-डच -फ्रेंच वसाहतवाद, भारतीय स्वातंत्र्य चळवळ,टिळक ,आगरकर ,गांधी,आंबेडकर, प्रतिसरकार, मुस्लिम स्वातंत्र्यसैनिक, भारतातील सामाजिक चळवळी, मातृप्रणाली समतावादी लोकशाही क्रांती, अखिल भारतीय मदर्स पार्टीचा जाहीरनामा अशा अनेक विषयांवर प्रकरणातून प्रकाश टाकलेला आहे. प्रत्येक प्रकरणात अनेक प्रकारची छायाचित्रेही दिलेली आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने राज्यघटना स्वीकारली. त्या राज्यघटनेतील लोकशाही सहीत सर्व मूल्ये चिरंतन रहावीत ही या लेखनामागील लेखकाची ठाम भूमिका आहे. त्यासाठी हे माझे सत्य इतिहास लेखन आहे हे त्यांचे मत आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ.माने प्रारंभिच म्हणतात, ‘भारतीय इतिहासाचा आरंभबिंदू मातृप्रणालीच्या सिंधू संस्कृती पासून सुरू होतो. सिंधू संस्कृतीनंतरच्या ३५०० वर्षाच्या इतिहासांपैकी १५०० वर्षे बुद्धमय इतिहास आहे.बुद्धमय भारताचा सर्व इतिहास साधनांसह सनातनी आणि मनुवादीनी दहाव्या शतकानंतर संपूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.इ.स.पू.१७५० मध्ये सिंधू संस्कृती लोप पावली. त्यानंतरचा जमिनीखाली पुरलेला इतिहास शोधून तर्कशुद्ध रीतीने प्रस्तुत केलेला आहे.बौद्ध धम्म परागंदा करताना बौद्धांनी निर्मिलेल्या खऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसून त्या अदृश्य करण्याचा प्रयत्न मनुवादी सनातनीनी केलेला आहे.त्याजागी खोटा व न घडलेला कपोल कल्पित इतिहास लिहिलेला आहे. ‘ तसेच ते अखेरीस स्त्री मुक्ती हाच क्रांतीचा राज मार्ग आहे. त्यातूनच मानवमुक्ती आणि समतावादी लोकशाही येऊन सारे जग सुखाने संपन्न होईल , मातृप्रणाली क्रांती चिरायू होईल असे म्हणतात.

हे एकूण लिखाण प्रचलित इतिहासात मग्न असणाऱ्यांच्या पचनी पडेल असे नाही. कारण ही एक वेगळी ऐतिहासिक मांडणी आहे. ती वेगळा दृष्टिकोन देते. ती विचार करायला लावते. या एकूण लेखनातून अनेक प्रकारची नवी माहिती वाचकाला मिळते. अर्थात अनेक काही ठिकाणी काही मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे.ती टाळता येणे शक्य आहे.आपल्या राष्ट्राचा इतिहास विविध अंगानी समजून घेणे व सत्यशोधन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसाच एक अभ्यासपूर्ण प्रयत्न या लेखनाद्वारे डॉ.एस.के. माने यांनी केला आहे. समग्रतेचे आणि विविधतेचे भान असलेल्या प्रत्येकाने तो समजून घेण्याची गरज आहे. वेगळा विचार ,वेगळी मांडणी ,वेगळे संशोधन हे असत्य मानण्याची गरज नाही तर ते सत्याकडे जाण्याचे साधन म्हणून पाहिले पाहिजे. डॉ.माने यांनी तर पुस्तकाचे नावच भारताचा सत्य इतिहास ठेवले आहे म्हणून तो समजून घेणे गरजेचे आहे. अनेकांनी अभ्यासाच्या सोयीसाठी इतिहासाचे सामाजिक, राजकीय,आर्थिक, धार्मिक असे विविध विभाग केले असले तरी त्याची एकमेकातर सर मिसळ होतच असते. त्यामुळे इतिहासाकडे समग्रतेच्या दृष्टीने पहावे लागते. डॉ. माने यांच्या या पुस्तकात हे विभाग एकत्रीतपणे आलेले
दिसतात.

या निमित्ताने इतिहासाचा अभ्यास कसा करावा आणि शोध कसा असावा याचाही विचार करण्याची नितांत गरज आहे. ‘इतिहास हे राष्ट्राचे आत्मचरित्र असते ‘असे न्यायमूर्ती रानडे यांनी म्हटले होते. आपल्या भारतालाही प्राचीन असा मोठा गौरवशाली इतिहास आहे.पण या गौरवशाली इतिहासाची समर्थपणे मांडली होऊन ती आम जनतेपर्यंत पोहोचू शकली नाही हेही वास्तव आहे. याचे कारण दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्रजांनी भारताचा इतिहास मोठ्या प्रमाणात लिहिलेला आहे .इंग्रजांनी आपल्या देशाचा आणि जगाचा इतिहास लिहिताना जी पद्धत वापरली आहे त्या पद्धतीने त्यांनी भारताचा इतिहास लिहिलेला नाही. कारण इंग्रजांच्या कुटील नीतीचा तो भाग होता. भारताचा इतिहास लिहिताना इंग्रजांनी जाणीवपूर्वक इतिहासातील मांडणी जात ,धर्म,पंथ या पद्धतीने केलेली दिसून येते. मराठा इतिहास , मुघलांचा इतिहास अशा नावाने त्यांनी इतिहास लेखन केले. तसेच हिंदूंचा इतिहास ,मुस्लिमांचा इतिहास ,शिखांचा इतिहास असे करत करत त्यांनी भारताचा इतिहास म्हणजे हिंदू मुस्लिम संघर्षाचा इतिहास आहे असा समज बळकट करणारा इतिहास पद्धतशीरपणे लिहिलेला आहे.

वास्तविक सरंजामशाही व्यवस्थेत राजा प्रमुख असतो. आपले राज्य वाढवण्यासाठी सर्वच राजांनी लढाया केलेल्या आहेत. हिंदू-हिंदू राजे व मुस्लिम-मुस्लिम राजेही एकमेकांशी लढलेले आहेत .असे असूनही इंग्रजांनी भारतीय इतिहास हिंदू मुस्लिम संघर्षाचा इतिहास आहे असे बिंबवण्याचा प्रयत्न केला. अर्थात हिंदू-मुस्लिम लोकांमध्ये कधीही ऐक्य निर्माण होऊ नये, आपल्या सत्तेला धोका निर्माण होऊ नये , भारतातील विविध धर्मीय जनतेने स्वातंत्र्याची मागणी करू नये ,जर आपल्याला स्वातंत्र्य द्यावेच लागले तर या महान खंडप्राय देशाचे धर्माच्या आधारे तुकडे व्हावेत हा इंग्रजी राज्यकर्त्यांचा हेतू होता.भारताची फाळणी हे इंग्रजांच्या कूट नितीचेच कटू फळ आहे.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात अनेक भारतीय इतिहासकारांनी इतिहास लेखनाची आणि विश्लेषणाची पद्धत बदलून खरा इतिहास सांगण्याचा मोठा प्रयत्न केला. तो इतिहास भारत भूमीच्या उज्वल समतेची परंपरा बंधुतेची ग्वाही देणारा असा आहे. पण स्वातंत्र्यपूर्व काळातील इंग्रजांच्या कुटील कारस्थानाला बळी पडलेल्या व धर्मराष्ट्राची भूमिका घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीशी फटकून वागणाऱ्या धर्मांध शक्तींनी गेल्या काही वर्षात उचल खाल्ली. राज्यव्यवस्था त्यांच्या ताब्यात आली. परिणामी इतिहासाला पुन्हा जातीवादी-धर्मावादी करण्याचा परिणाम प्रयत्न सुरू झाला. परिणामी मनुष्य म्हणजे मनुचा पुत्र, कुतुब मिनार राजा समुद्रगुप्ताने बांधला, ताजमहाल हा तेजो महाल आहे, राजा अशोकाचा अहिंसा सिद्धांत भित्रेपणातून आला होता, मुस्लिम राजे क्रूर होते, महात्मा गांधी दुष्टात्मा होते यासारख्या अनेक प्रकारचे वाह्यात संशोधन होऊ लागले.ते पुस्तक रूपाने अभ्यासक्रमातून समाजातून मांडले जाऊ लागले. भगतसिंग यापासून गांधींपर्यंतचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळण्यात येऊ लागला. ज्योतिष शास्त्र अभ्यासक्रमात घुसडले जाऊ लागले. सोयीचे ते घ्यायचे आणि गैरसोयीचे टाळायचे अशी इतिहासाची नवी व्याख्या या मंडळांनी तयार केली. इतिहासाचे विकृतीकरण सुरू केले.शहरांची नावे बदलण्याचे अनेक प्रयत्न झाले, होत आहेत.इतिहासाचे पुनर्लेखन करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. हे सगळे समतेच्या इतिहासाचा गळा दाबून विषमतेला प्रोत्साहन देण्यासाठी होताना दिसत आहे.

वर्तमानात सोयीचा ठरेल आणि भविष्यात फायदेशीर ठरेल असा इतिहास लिहिण्याचा, तो सादर करण्याचा म्हणजेच भूतकाळ बदलण्याचा जोराने प्रयत्न होतो आहे .कसेही वापरता येईल असे साधन म्हणून इतिहासाकडे संकुचित जातीवादी-धर्मवादी दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. अभ्यासक्रमात हवेतील धडे घालणे व नको ते गाळणे, इतिहासाला जातीय व विकृत रंग देणे, महात्म्यांना हीन ठरवणे आणि पळकुट्यांना बहादूर ठरवणे, धादांत खोटे दाखले देणे, डार्विनचा उत्क्रांतीवाद नाकारणे असे प्रकार सुरू झाले .वास्तविक इतिहासाचे काम निष्पक्षपाती पद्धतीने होणे आवश्यक असते.

काही वर्षांपूर्वी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ डॉ. अमर्त्य सेन एका भाषणात म्हणाले होते, भारताच्या भूतकाळाची ,संकुचित समाज रचनेचा दृष्टिकोन समोर ठेवून भावनेवर आधारित मांडणी केली जात आहे. त्याचबरोबर त्याचा वाखाणण्यासारखा बहुधर्मीय व पुरोगामी इतिहास दाबून टाकण्याचे ही प्रयत्न सुरू आहेत असल्या अनेक प्रयत्नांमध्ये इतिहास आणि पुराण यांची व्यवस्थित सांगड घालण्याचे कामही सुरू आहे. रामायणाची मांडणी एक महाकाव्य म्हणून नाही तर दाखल्यावर आधारित इतिहास अशी जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. ज्यामुळे या देशातील दुसऱ्यांच्या अधिकारातील वेगवेगळ्या जागांवर आणि स्थळांवर, मालमत्तांवर अधिकार सांगता येईल.त्याचबरोबर धार्मिक स्थळेही उध्वस्त करता येतील .रवींद्रनाथ टागोर यांनी रामायणाकडे कल्पकतेच्या साम्राज्यातील एक सुंदर महाकाव्य म्हणूनच पाहिले होते . नवीन शोध, नव्या कल्पना प्रस्थापित गोष्टींच्या विरोधात पुढे येतात.आपण गॅलिलिओ, न्यूटन किंवा डार्विन यांच्या विज्ञानातील योगदानाचा अभ्यास करतो. म्हणजेच विज्ञानाच्या इतिहासात पुरोगामी विचारसरणीशी संबंधित आहे. भारतातील विज्ञान आणि गणिताच्या बहराचा काळ हा गुप्तकाळ आणि त्यानंतरचा होता.खरं तर संस्कृत आणि पालीमध्ये जास्तीत जास्त साहित्य हे धर्म संकल्पनेबद्दल संशय व्यक्त करणारे .आणि नास्तिकवादाबद्दलचे आहे.इतर कोणत्याही अभिजात भाषेमध्ये या विषयावरील एवढे साहित्य नाही.या काळातील विज्ञान आणि गणितातील विकासाचा ऐतिहासिक शोध घेणे जरुरीचे आहे. इतिहासाचा अभ्यास असा करावा लागतो ते आपण ध्यानात घेण्याची गरज आहे.’

वीस वर्षांपूर्वी जर्मन संशोधक रेनर हॅसनेप्लग यांनी ‘ द इंक्रीसप्शन ऑफ द इंडस सिव्हिलायझेशन ‘या नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यात त्यानी सिंधू संस्कृतीचा सखोल अभ्यास करून काही मांडणी केली होती. त्यांच्या मते, या संस्कृतीतील साहित्यात धर्म, पर्यावरण, राज्यकारभार ,समाज ,विज्ञान आणि अध्यात्म यांची माहिती मिळते. शिवाय त्यात केलेला प्रतिकांचा आणि भाषेचा वापर आजही करण्यात येतो. उदाहरणार्थ बलवान पुरुषांसाठी बैलाचे प्रतीक आजही वापरले जाते. सात दिवसाचा आठवडा त्यातील सहा दिवस कामाने एक दिवसाची सुट्टी ही त्या काळातही होती. राम हा सिंधू संस्कृतीतील एका राज्याचा आदरणीय संस्थापक होता. दक्षिणेत मोहेंजोदडो शहरा भोवती त्याने आपल्या जमातीच्या लोकांबरोबर संघर्ष केला आणि राज्य स्थापन केले. इंद्र जमातीने उत्तरेत हडप्पा भोवती आपले राज्य उभे केले.अनेक हिंदू व बौद्ध पुराणकथांचा उगम सिंधू संस्कृतीत आढळतो.भारतात चालत आलेल्या अनेक परंपरा, प्रथांचा उगमही या संस्कृतीत आहे. जागतिक संस्कृतीच्या अभ्यासात सिंधू संस्कृतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.’

थोर स्वातंत्र्य सेनानी आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हे जगप्रसिद्ध पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनीही सिंधू संस्कृती बद्दल अनेक इतिहासकारांचे दाखले देत उत्तम विवेचन केलेले आहे.नेहरू म्हणतात, भारताच्या भूतकाळाचे अतिप्राचीन चित्र सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृतित आढळते. सिंधूच्या खोऱ्यातील ही संस्कृती आणि आजचा भारत यांच्या मधल्या काळात अशी अज्ञात शतके,कितीतरी कालखंड होऊन गेले आहेत की ज्यांची आपणास माहिती नाही. एका कालखंडाला दुसऱ्या कालखंडाशी जोडणारे दुवे नेहमीच नीट सापडतात असे नाही. कितीतरी घडामोडी झाल्या असतील. किती तरी बदल झाले असतील. या सर्वांचे दुवे नीट सापडले नसले तरी या सर्व घटकातून एकच एक तीच ती परंपरा आढळते व आजचा भारत व सहा सात हजार वर्षांपूर्वी उगम पावलेली सिंधू संस्कृती यांना जोडणारी अखंड साखळी लक्षात येते.’

नेहरू पुढे म्हणतात, भारतीय इतिहासाच्या त्या उष:काळातसुद्धा भारताचे रूप कोवळ्या अर्भकाचे आढळत नाही. उलट कितीतरी गोष्टीत हा राष्ट्रपुरुष वयात आलेला दिसतो.तो संसारविन्मुख होऊन जडसृष्टीच्या पलीकडच्या अस्पष्ट व अगम्य अशा गुढ तत्त्वांच्या स्वप्नसृष्टीत गुरफटलेला नसून उलट संसारातल्या कला व सुख साधने या कामात त्यांनी बरीच प्रगती केलेली आढळते. त्याने केलेली निर्मिती नुसत्या सुंदर वस्तूंचीच नव्हती तर उपयुक्ततेकडेही त्याचे लक्ष होते. हल्लीच्या आधुनिक सुधारणेची ठळक चिन्हे म्हणजे उत्तम स्नानगृहे ,सांडपाण्याचा निकाल करण्याची योजना त्यांनी निर्माण केलेली आढळते. सिंधू संस्कृतीचा अंत कसा झाला ?याबाबत अभ्यासकात एकमत नाही.पण बहुतांश अभ्यासकांच्या मते काही अज्ञात अशा उत्पातांमुळे या संस्कृतीचा नाश झाला.सिंधू नदीला नेहमीच महापूर येत असे त्यामुळे तसे काही झाले असेल .अथवा बदलत्या हवामानामुळे काही ठिकाणी जमिनीचा कस व ओलावा कमी होत गेला व जमीन कोरडी बनली रखरगीत झाली असावी. शेवटी अशा लागवडीखालील जमिनीचे उजाड वाळवंट बनले असेल.प्राचीन काळी सिंध प्रांत श्रीमंत व सुपीक होता हे आपल्याला माहित आहे. पण मध्ययुगापासून तो पुढे जो वाळवंट बनलेला दिसतो.’

अर्थात इतिहासाबद्दल लिहावे तितके थोडे आहे. पण सत्य कथन हा इतिहासाचा प्रमुख आधार असावा लागतो.डॉ.एस.के. माने यांच्या या पुस्तकामध्ये आलेली ही नवी मांडणी वाचकाला निश्चितच विचार प्रवृत्त करेल यात शंका नाही. या लेखनासाठी त्यांनी केलेला अभ्यास आणि घेतलेले परिश्रम निश्चितपणे कौतुकास्पद आहेत.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *