इचलकरंजी/प्रतिनिधी –
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांना दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया या तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन करणार्या देश पातळीवरील नामांकित तंत्रज्ञानांच्या संस्थेकडून साखरेच्या प्रक्रियेमध्ये संशोधनात्मक उपक्रम राबविल्याबद्दल ‘एस. सी. शर्मा गोल्ड मेडल’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली ही संस्था सन 1925 साली स्थापन झाल्यापासून तांत्रिक सल्ला आणि सहभागी प्रक्रियेद्वारे देश-विदेशातील साखर आणि उपपदार्थ उद्योगांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी प्रयत्न करत असते. भारत सरकारने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था म्हणून या संस्थेस मान्यता दिली आहे. साखर आणि संबंधित उत्पादनांची गुणवत्ता, उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी किफायतशीर आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणण्यासाठी ही संस्था सतत प्रयत्नशील असते. मनोहर जोशी यांनी साखर कारखान्याच्या तंत्रज्ञानामध्ये नवनवीन उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार राजस्थानातील जयपूर येथे 30 जुलै 2024 रोजी संस्थेच्या 82 व्या वार्षिक परिषदेमध्ये साखर उद्योगातील प्रतिष्ठीत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
Posted inकोल्हापूर
मनोहर जोशी यांना ‘एस. सी. शर्मा गोल्ड मेडल’ पुरस्कार जाहीर
