मुंबई : सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध कामगार संघटनांचे नेत्यांचे शिष्टमंडळ बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांना भेटून त्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील मागण्या संबंधी सचिवांनी स्पष्ट केले की नोंदीत बांधकाम कामगारांच्या मृत्यू बद्दलचे कोणतेही अर्ज प्रलंबित ठेवण्यात येणार नाहीत नातेवाईकांनी प्रत्यक्ष मंडळाशी संपर्क केल्यास त्यांचे अर्ज पाहून मंजूर करण्यात येतील.
सध्या महाराष्ट्रामध्ये दहा लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांना भांड्याचे साहित्य व सुरक्षा संच वाटप करण्यात आलेले आहेत परंतु ते सर्वच कामकाज ऑनलाइन नसल्यामुळे बांधकाम कामगारांना हे लाभ मिळवून घेण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. म्हणूनच भांड्याचे साहित्य व संच पेटी मिळण्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज बांधकाम कामगारांना करता येतील आणि क्रमवारीनुसार त्यांना त्वरित साहित्य मिळेल.
सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या मध्ये बांधकाम कामगारांचे कल्याणकारी लाभ देण्याचे कामकाज थांबलेले आहे तरी ते सर्व कामकाज त्वरित सुरू करण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी दिले.
बांधकाम कामगारांना कामाच्या अनुभवाचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येतात म्हणूनच नाका कामगार यांना विविध मालकांच्याकडून काम केल्याचे दाखले घेण्यासाठी मंडळाकडून पुस्तिका प्रत्येक जिल्ह्यास पुरवण्यात येईल या पुस्तके शिवाय 90 दिवसाचे प्रमाणपत्र इतर कोणाकडूनही घेण्याची आवश्यकता बांधकाम कामगारांना राहणार नाही.
सध्या जे सर्व प्रलंबित अर्ज आहेत त्या अर्जातली संख्या लवकरच कमी होईल. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये 240 पेक्षा जास्त तालुक्यांच्या मध्ये स्वतंत्रपणे बांधकाम कामगारांचे नोंदणी करणे नुतणीकरण व लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे सर्व प्रलंबित अर्ज लवकरच निकालात निघतील.
बांधकाम कामगारांच्या आधार कार्ड मध्ये चूक झाल्यास किंवा मोबाईल क्रमांक मध्ये चूक झाल्यास प्रत्येक कल्याणकारी केंद्रामध्ये त्वरित दुरुस्ती करण्याची व्यवस्था करण्यात येईल.
या सर्व निर्णयाचे बांधकाम कामगार संघटनांच्या वतीने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सचिव श्री विवेक कुंभार यांचे आभार मानण्यात आले.
शिष्यमंडलमध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे नेते कॉ शंकर पुजारी, साथी सागर तावडे,आयुष्यमान शंकर माने, उस्मान शेख इत्यादी नेते प्रतिनिधींचा समावेश होता.
