सेवा हमी कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात कोल्हापूर जिल्हयामधून होणार राज्याचे मुख्यमंत्री करणार 15 ऑगस्ट रोजी शुभारंभ

सेवा हमी कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात कोल्हापूर जिल्हयामधून होणार राज्याचे मुख्यमंत्री करणार 15 ऑगस्ट रोजी शुभारंभ

सेवा हमी कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात कोल्हापूर जिल्हयामधून होणार

राज्याचे मुख्यमंत्री करणार 15 ऑगस्ट रोजी शुभारंभ

पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांना दूरदृश्यप्रणालीद्वारे अभिनव उपक्रमाचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून सादरीकरण

कोल्हापूर, दि.06 : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत सेवा पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असून हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी विविध विभागांच्या सेवा नागरिकांना घरोघरी त्यांनी निवडलेल्या वेळी पोहोचविल्या जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने अभिनव उपक्रमाद्वारे नागरिक आणि प्रशासन यांमधील अंतर दूर करण्याचे नियोजन केले आहे. सेवा हमी कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात कोल्हापूर जिल्हयामधून होणार असून या उपक्रमाचा शुभारंभ येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. यावेळी मंत्री शंभुराज देसाई यांनी हा उपक्रम संपुर्ण राज्याने अंमलबजावणी करावा असा असल्याचे कौतुक केले. मुंबई येथून आमदार प्रकाश आबीटकर यावेळी उपस्थित होते. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरीक्त आयुक्त महापालिका राहूल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव उपस्थित होते.

सेवा हमी अंतर्गत सुरू होत असलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत नागरिकांनी जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन स्वरूपात स्वतः घ्याव्यात या उद्देशाने जिल्हयातील एकुण 100 महाविद्यालये निवडून प्रत्येक ठिकाणी एक सेवा केंद्र चालकाची नियुक्ती होणार आहे. तसेच 300 पटसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थी असणाऱ्या शाळा तिथे प्रमाणपत्र वितरण शिबीरांचे तात्पुरते आयोजन होणार आहे. शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमधून प्रशिक्षणाद्वारे नागरिक तसेच विद्यार्थी यांना आपले सरकार वेब पोर्टल तसेच आरटीएस मोबाईल ॲप्लिकेशन बाबत माहिती दिली जाणार. सेवा वाहिनी व्हॉटस ॲप चॅटबॉट द्वारे एक नंबर सुरू केला जाणार आहे. यातून कोणालाही जवळचे आपले सेवा केंद्र, सेवांबाबतची माहिती व कागदपत्रांची यादी, शासकीय कार्यालय व संबंधित कर्मचारी संपर्क क्रमांक, समस्यांचे निराकारण, टोल फ्री क्रमांक इत्यादी माहिती दिली जाणार आहे. सेवा घेत असताना येणाऱ्या अडचणी, समस्या, अभिप्राय नोंदविण्यासाठी प्रत्येक सेवा केंद्रात व शासकीय कार्यालयाच्या बाहेर नागरिकांना क्यूआर कोड दिला जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर मदत कक्षाची स्थापना करून कॉल सेंटर द्वारे नागरिकांना टोल फ्री नंबरवर संपर्क साधता येईल. प्रत्येक तालुक्यात किमान एक आदर्श आपले सरकार सेवा केंद्र स्थापन होणार आहे. आपले सरकार सेवा केंद्रातील चालकांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्व केंद्रात अभ्यांगत कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय व इतर आवश्यक सुविधाही सुरू करण्यात येणार आहेत.

वेब पोर्टलसह सेवा प्रतिनिधीचा अवलंब होणार

नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पोर्टल विकसित केले जात आहे. यामध्ये प्रत्येक सेवा केंद्र, चालक, ठिकाण अशी माहिती भरली जाणार आहे. यामध्ये सेवा प्रतिनिधी गृहभेटीवेळी त्या त्या नागरिकांच्या आवश्यक सेवांची नोंदणी करतील किंवा नागरिक स्वत: नोंदणी करतील. नागरिकाने सेवा निवडल्यानंतर लागणाऱ्या कागदपत्रंची माहिती उपलब्ध करून देणे व त्यांची गृहभेट दिनांक व वेळ निवडण्याची मुभा त्यांना असेल. नागरिकांकडून सर्व कागदपत्रांची पुर्तता झाल्यावर संबंधित दाखला घरपोच देण्यात येणार आहे.

पुढिल 6 महिन्यांत….

सर्व नागरिकांपर्यंत पोहोचून आवश्यक असणाऱ्या सेवा पुरविणे.

आपले सरकार व सेतु केंद्र आदर्श केंद्र बनविणे.

नागरिकांच्या तक्रारी व सूचना घेण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली कार्यन्वित करणे.

शाळा महाविद्यालयांमध्ये शिबीरांचे आयोजन करणे.

जिल्हास्तरावर टोल फ्री नंबर सुरू करून सेवा वाहिनी व मदत कक्षाद्वारे नागरिकांना चांगली सेवा देणे.

कार्यालयांचे मानांकन करून गतीमान प्रशासन करणे.

घरपोच सेवा देण्यासाठी वेब पोर्टल सुरू करणे व गरजेनुसार मागणीनुसार त्यात अधिकाधिक सुधारणा करणे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *