युनूस यांचा आज शपथविधी; बांगलादेशमध्ये हंगामी सरकार, हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन!

युनूस यांचा आज शपथविधी; बांगलादेशमध्ये हंगामी सरकार, हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन!

ढाका :— नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ प्रा. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमधील हंगामी सरकार गुरुवारी शपथ घेणार आहे. लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-जमान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हंगामी सरकारचा शपथविधी गुरुवारी रात्री ८ वाजता होण्याची शक्यता आहे.

सरकारच्या सल्लागार समितीत १५ सदस्यांचा समावेश असल्याचे लष्करप्रमुख जमान यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी युनूस गुरुवारी पॅरिसहून बांगलादेशमध्ये परतणार आहेत.*

सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण प्रणालीवरून सरकारविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला. त्यांनी देशातून काढता पाय घेतल्याच्या एका दिवसानंतर, मंगळवारी ८४ वर्षीय अर्थतज्ज्ञ युनूस यांची राष्ट्रपती महम्मद शहाबुद्दिन यांनी हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, बुधवारी मोहम्मद युनूस यांनी सर्वांना शांत राहण्याचे आणि सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

शेख हसिना यांचे सरकार पाडल्यानंतर बांगलादेशमध्ये सुरक्षा व्यवस्थेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सुरक्षा कर्मचारी आणि त्यांच्या कार्यालयांवर झालेल्या हल्ल्यांच्या वृत्तांदरम्यान एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याला हळूहळू कर्तव्ये पुन्हा बजावण्याचे आणि हिंसाचारग्रस्त भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले होते.

याचा संदर्भ देत युनूस यांनी ‘सध्याच्या परिस्थितीत शांत राहा, सर्व प्रकारच्या हिंसाचार आणि विनाशापासून दूर राहा,’ असे आवाहन केले. ‘आपण या संधीचा सर्वोत्कृष्ट उपयोग करू, याची खात्री बाळगू. आपल्या कोणत्याही चुकीमुळे ही संधी गमावता कामा नये, असे युनूस म्हणाले.

विद्यार्थ्यांकडून वाहतूक व्यवस्थापन

हसीना सरकार पाडल्यानंतर बांगलादेशमध्ये अराजकता सुरू आहे.

बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी स्वयंसेवक म्हणून विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे व्यवस्थापन केले. ‘बांगलादेश स्काउट्स’च्या सदस्यांसह विद्यार्थी अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रण करत होते, असे एका स्थानिक वृत्तपत्राने सांगितले. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिस अनुपस्थित होते, असे स्थानिक माध्यमांनी अहवालात म्हटले होते.

याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना हळूहळू कर्तव्ये पुन्हा बजावण्यास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.

हसीनांचा मुक्काम दिल्लीतच!

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा मुक्काम काहीकाळ दिल्लीतच असेल, अशी माहिती त्यांचा मुलगा सजीब वाझेद जॉय यांनी बुधवारी दिली. जर्मनीतील एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत जॉय यांना हसीना यांच्या आश्रयाच्या योजनांबद्दल विचारण्यात आले.

त्यावर उत्तर देताना जॉय म्हणाले की, सध्या खूप अफवा पसरवल्या जात आहेत. हसीना यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्या काहीकाळ दिल्लीतच राहतील, माझी बहीण त्यांच्याबरोबर आहे, असे त्यांनी सांगितले.

प्राध्यापक ते हंगामी सरकार प्रमुख

राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दिन यांनी मंगळवारी बांगलादेशची संसद विसर्जित केली आणि अर्थतज्ज्ञ असलेल्या मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली.

आंदोलक विद्यार्थी चळवळीने त्यांना सरकारचे प्रमुख बनविण्याची मागणी रेटून धरली होती. यामुळे त्यांना हंगामी सरकारचे नेतृत्व सोपवण्यात आले. मोहम्मद युनूस जागतिक पातळीवर ‘द फादर ऑफ मायक्रोफायनान्स’ म्हणून ओळखले जातात.

त्यांना २००६ मध्ये त्यांना गरीबी निर्मूलनाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *