पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे 80व्या वर्षी निधन! ज्येष्ठ कम्युनिस्ट नेता हरपला

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे 80व्या वर्षी निधन! ज्येष्ठ कम्युनिस्ट नेता हरपला

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज (गुरुवार, दि. ८ ऑगस्ट) सकाळी ८.२० मिनिटांनी निधन झाले. कोलकातामधील पाम एव्हेन्यू येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ८० वर्षीय भट्टाचार्य गेल्या काही वर्षांपासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते.*

भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना असा परिवार आहे. बुधवारी रात्री बुद्धदेव यांची प्रकृती खालावली.

त्यामुळे डॉक्टरांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांची प्रकृती तपासून रुग्णालयात दाखल करावे की नाही? हा निर्णय घेण्याचे ठरविले होते. मात्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

ज्योती बसू यांच्यानंतर मुख्यमंत्री

पश्चिम बंगाल आणि एकूणच देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू हे आरोग्याच्या कारणास्तव २००० साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. मुख्यमंत्री असताना भट्टाचार्य यांनी डाव्या पक्षांची आघाडी करून २००१ आणि २००६ च्या निवडणुकीत विजय मिळविला होता.

पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक आणण्यात पुढाकार

कम्युनिस्ट पक्षांच्या डाव्या विचारसरणीतील परिवर्तनकारी नेते म्हणून भट्टाचार्य यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये कारखानदारी सुरू केली. सिंगूर येथे टाटा नॅनो प्रकल्प उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नंदीग्राम येथे विशेष आर्थिक क्षेत्र उभारले. भट्टाचार्य यांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये आयटी आणि आयटी क्षेत्राशी निगडित मोठी गुंतवणूक आणण्यात त्यांना यश आले.

बुद्धदेव भट्टाचार्य २०१९ साली शेवटचे सार्वजनिक मंचावर दिसले होते. सीपीआय (एम) ने काडलेल्या एका मोर्चात ते सहभागी झाले. मात्र धूळीचा त्रास होऊ लागल्यामुळे काही वेळेतच ते घरी परतले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने भट्टाचार्य यांचा एआय तंत्रज्ञान वापरून तयार केलेले व्हिडीओ मतदारांना दाखविला होता.

या व्हिडीओमध्ये भट्टाचार्य डाव्या विचारांच्या आणि धर्मनिरपेक्ष पक्षांच्या आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करत होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *