वादळ, सोसाट्याचा वारा… हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा!
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. पण ऑगस्ट महिना सुरु होताच राज्यात पावसाने काही भागांत विश्रांती घेतली.
सध्या काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. अशातच राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.*
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा पुढील आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन होणार आहे. अशावेळी आज (18 ऑगस्ट) रविवारी महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असणार याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्याचबरोबर मुंबईसह ठाण्यात पुढील आठवड्यात हलक्या पावसाला सुरवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे.
दरम्यान, पाऊस ओसरल्यानं मुंबईत पुन्हा एकदा उकाडा जाणवू लागला आहे.
तर, पुण्यातील पुरंदर, भोर आणि बारामती सारख्या भागांमध्येही आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. येथेही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असणार आहे.
मागील 24 तासात मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.