आंबा घाटात खोल दरीत आढळले दोन तरूणांचे मृतदेह;
एक सांगलीचा तर दुसरा निपाणीचा;
दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश
देवरूख:—मिऱ्या-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात सड्याचा कडा याठिकाणी खोल दरीत दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना काल शनिवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या तरूणांचे मृतदेह खोल दरीत असल्यामुळे ते बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या.
अखेर रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यु टीमला यश आले.
हे दोघेही तरूण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील एका मठात राहत होते. ते येथील महाराजांचे शिष्य होते. मात्र मठातील महाराजांचा एक महिन्यापुर्वी मृत्यू झाला होता.
यानंतर हे दोघेही नैराश्यात होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे देवरूखचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.*
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, स्वरूप दिनकर माने (रा. कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली) व सुशांत श्रीरंग सातवेकर (रा. निपाणी) अशी या दोन मृत तरूणांची नावे आहेत.
वनविभागाचे कर्मचारी आंबा जंगल परिसरात गस्तीसाठी गेले असता त्यांना ‘सड्याचा कडा’ या ठिकाणी मोटारसायकल (एमएच १०, डी. जे.२०२३) उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मोटारसायकल शेजारी कोणीही आढळले नाही.
वन कर्मचाऱ्यांनी ही माहिती शाहूवाडी पोलीस व साखरपा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच दोन्ही पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलीस पथकांनी शोध घेतला असता खोल दरीत दोन मृतदेह निदर्शनास आले.*
यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. मात्र पाऊस, धुके यामुळे अडथळा निर्माण झाल्याने शनिवारी ही मोहीम थांबवण्यात आली.
रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी देवरूख पोलीस, साखरपा पोलीस, देवरूख येथील राजू काकडे हेल्प अँकँडमीची रेस्क्यु टीम व आंबा येथील रेस्क्यु टीमने खोल दरीत उतरत मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर दु. ३ वाजण्याच्या दरम्यान दोन्ही तरूणांचे मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यु टीमला यश आले.
यानंतर शवविच्छेदनासाठी हे मृतदेह साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याठिकाणी डाँक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
घटनेचा अधिक तपास देवरूख पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.*