खड्ड्यांच्या तक्रार निराकरणासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित- अधीक्षक अभियंता तुषार बुरुड

खड्ड्यांच्या तक्रार निराकरणासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित- अधीक्षक अभियंता तुषार बुरुड

खड्ड्यांच्या तक्रार निराकरणासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित
– अधीक्षक अभियंता तुषार बुरुड

कोल्हापूर दि. 20 (): सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 लाख 18 हजार किमी पेक्षा जास्त रस्त्यांचे जाळे तयार केले आहे. या विभागामार्फत राज्यातील तीन प्रकारचे रस्ते उदा. प्रमुख राज्य महामार्ग (MSH), राज्य महामार्ग (SH) व प्रमुख जिल्हा रस्ते (MDR) इ. सर्व रस्त्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. सर्वसाधारणपणे पावसाळ्यानंतर रस्त्यांवर खड्डे पडतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींचे निराकरण करुन नागरिकांमध्ये विभागाची प्रतिमा उंचाविण्यासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली (PCRS) विकसित करण्यात आली आहे. हे अँड्रॉइड अॅप सर्व नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधीच्या तक्रारी नोंदवण्याची सुविधा देईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांनी दिली आहे.

PCRS अॅप http://mahapwd.gov.in/PMIS/PWPCRS_CITIZEN.apk या लिंकचा वापर करून PWD वेबसाइटवरुन आणि https://apps.mgov.gov.in/details?appid=१८४७ या डाउनलोड लिंकसह भारत सरकारच्या mSEVA अॅप स्टोअरवरुन डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच गुगल प्ले स्टोअरवर खालील लिंकसह कोणत्याही अँड्रॉईड मोबाईल मध्ये स्थापित (Install) करता येईल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.cdac.pwd.citizen&hl=en-IN
PCRS अँड्रॉइड अॅपद्वारे खड्ड्यांसंबंधीच्या तक्रारी नोंदविण्याची प्रक्रियाः
नागरिकांनी त्यांच्या अँड्रॉईड फोनवर PCRS अॅप स्थापित (Install) करावे. एकदा अॅप स्थापित झाल्यानंतर PCRS अॅप करिता आवश्यक जीपीएस आणि स्टोरेजकरिता परवानगी द्यावी.
या अॅपमध्ये मोबाईल नंबर टाकल्यावर एसएमएसद्वारे वन-टाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल. लॉग इन करण्यासाठी कृपया हा OTP प्रविष्ट करायचा आहे.
खड्ड्यांची तक्रार नोंदवण्यासाठी रजिस्टर फिडबॅक (Register Feedback) बटणावर क्लिक केल्यावर आपला मोबाईल जीपीएसच्या सहाय्याने आपले वर्तमान स्थान दर्शवेल, त्यानंतर कॅमेरा आयकॉनवर क्लिक केल्यावर, PCRS अॅप आपला मोबाइल कॅमेरा उघडेल, त्यानंतर खड्ड्याचे छायाचित्र काढून आपली तक्रार मोबाइल मार्फत टिप्पणीसह सबमिट करायची आहे.
तक्रार नोंदवल्यानंतर PCRS अॅप या रस्त्याचे नाव, तालुका, साखळी क्रमांक इ. माहिती वरुन संबंधित सा. बां. विभागाचे क्षेत्रीय अधिकारी ओळखेल व खड्ड्याबाबत तक्रार प्राप्त झालेला रस्ता हा सा. बां. विभागाच्या अखत्यारितील असल्यास सिस्टमद्वारे तक्रार क्रमांक तयार होईल व तसे नागरिक आणि संबंधित कार्यालयातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना एसएमएस द्वारे कळविले जाईल.
क्षेत्रीय कार्यालय कनिष्ठ अभियंता हे खड्डे दुरुस्त करतील आणि 72 तासांच्या आत अँड्रॉईड अॅपद्वारे उत्तर देईल. त्यानंतर क्षेत्रीय उपअभियंता कनिष्ठ अभियंत्याच्या उत्तराची पडताळणी करतील आणि शेवटी 1 दिवसाच्या आत नागरिकास अनुपालन सादर करतील व नागरिकास एसएमएसद्वारे सूचित केले जाईल. नागरीक वेळोवेळी PCRS अॅपवरुन त्यांच्या तक्राराची स्थिती पाहु शकतात,
7 दिवसांपर्यंतच्या विलंबावर उपअभियंता स्तरावर देखरेख ठेवली जाईल. 7 ते 15 दिवसांच्या विलंबाची प्रकरणे संबंधित कार्यकारी अभियंत्याद्वारे पुर्नविलोकन केले जाईल. 15 ते 30 दिवसांच्या विलंबाचे निरीक्षण संबंधित अधीक्षक अभियंत्याद्वारे केले जाईल व 30 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास संबंधित प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंताद्वारे पुनर्विलोकन आणि निरीक्षण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आली आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *