कोलहापुर :महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापूरात (Kolhapur) मुस्लिम समाज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकवटला होता. महाराजांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यार गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी जमलेल्या हजारो मुस्लिम आंदोलकांनी केली.
यावेळी त्यांच्या हातातील फलक लक्षवेधी ठरले. ‘रामगिरी महाराजांना अटक करा’, ‘धर्मनिंदा करणाऱ्या महाराजाला अटक करा’, ‘शांतता भंग करणाऱ्या भोंदू बाबाला बेड्या ठोका’, ‘पैगंबरांचा अपमान करणाऱ्या महाराजांना अटक करा’; अशी मागणी करत रामगिरी महाराजांविरुद्ध तीव्र घोषणाबाजी केली.
पैगंबर हे सर्व मुस्लिम (Muslim) बांधवांचे श्रद्धास्थान असून 2018 पर्यंत हेच रामगिरी महाराज पैगंबराचे गुणगान गात होते. पण आता पैगंबरांबद्दल अपशब्द काढत आहेत. त्यामुळे समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावले आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार असून असे वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी मौलाना इरफान यांनी केली आहे.
तसेच गेल्या काही वर्षांपासून दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य वारंवार घडत आहेत. त्या मागील कारणांचा शोध घेऊन त्यांच्यावर ही कारवाई करावी अशी मागणी मौलाना इरफान यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांना देण्यात आले.