शेवटच्या घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा- न्यायमूर्ती श्याम चांडक

शेवटच्या घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा- न्यायमूर्ती श्याम चांडक

कोल्हापूर दि. 29. : समाजात ‘आहे रे’ व ‘नाही रे’ असे दोन वर्ग असून समाजातील या विषमतेवर अंकुश ठेवण्यासाठी शासकीय योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. असे आपले वैयक्तिक मत असून ‘नाही रे’ वर्गातील शेवटच्या घटकाला या योजनांचा लाभ मिळायला हवा असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे (मुंबई) न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका कोल्हापूर व इचलकरंजी, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय व पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर तथा शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे आयोजित करण्यात आला होता. याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (कोल्हापूर) श्रीमती कविता अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी एफ सय्यद, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त के मंजूलक्ष्मी, इचलकरंजी मनपा आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) निकेश खाटमोडे -पाटील, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड सर्जेराव खोत, महाराष्ट्र – गोवा बार असोशिएशनचे सदस्य ॲड विवेकानंद घाडगे, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे आदी उपस्थित होते.
श्री चांडक पुढे म्हणाले, शासकीय योजना ह्या खऱ्या व गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल म्हणाल्या, न्यायालयाकडे दाद मागणाऱ्या नागरिकाला न्याय मिळावा, कोणीही न्यायापासून वंचित राहू नये, प्रत्येकाने आपल्या न्याय हक्काबद्दल जागृत राहावे तसेच या महामेळाव्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा व्यक्त करून, या शिबिराचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक के मंजूलक्ष्मी, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे व अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे – पाटील यांनीही यावेळी आपले समयोचित विचार व्यक्त केले.
याप्रसंगी कैवल्य ढेरे, रमा कांबळे, प्रणव शिंदे, सईद शेख, मीना चौगुले यांना रोटरी क्लब कोल्हापूरच्या वतीने व्हीलचेअर, आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान म्हणून चंद्रकांत गाडीवड्ड व स्नेहल सुतार, कमल पाटील व पांडुरंग कांबळे यांना घरकुल योजनेचा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कळंबा येथील अर्धनारी स्वंयसहायता समूहाला त्याचबरोबर सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अजिंक्य चव्हाण, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांतर्गत विजयालक्ष्मी तिलगंजी यांना विविध रकमांचे धनादेश तसेच हातकणंगले तालुक्यातील मौजे ग्रामपंचायत किणीला कचरा वाहतुकीसाठी घंटागाडी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
न्यायिक प्रक्रियेचे महत्त्व सांगणारे निर्भया व वाटणी अशा दोन पथनाट्याचे सादरीकरण स्थानिक कलावंताच्या मदतीने यावेळी करण्यात आले. विविध शासकीय योजनांची माहिती सांगणारे सुमारे 32 स्टॉल यावेळी संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आले होते. या सर्व स्टॉलला मान्यवरांनी भेट देत समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस एस इंगळे तर आभार प्रदर्शन कनिष्ठ न्यायाधीश श्रीमती मोनाली गावडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रमुख प्राचार्य अभयसिंह साळुंखे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *