भारताचे खरेखुरे नाव खैरलांजी आहे काय ?
आज 29 सप्टेंबर म्हणजे आजच्या दिवसापासून 18 वर्षांपूर्वी देशाला हादरवून टाकणारी भारतीय संविधानातील समता, बंधुता, न्याय या तत्वांना तिलांजली देणारी घटना घडली ती भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी या गावात.
२९ सप्टेंबर २००६ मध्ये खैरलांजीत माणूसकीला काळीमा फासणारे हत्याकांड घडले होते. घटनेच्या दिवशी गावातील दलितेतर समूहाने भोतमांगे यांच्या झोपडीला वेढा घातला आणि शिविगाळ केली. तसेच झोपडीत असलेल्यांवर हल्ला केला होता. जमावाने भैयालालची पत्नी सुरेखा, मुले प्रियंका, सुधीर आणि रोशन यांची अमानुषपणे हत्या केली होती. भोतमांगे यांचे कुटुंबच एका गटाने अमानुषपणे हत्या करून संपवून टाकले. तर भैयालाल शेतावर गेल्याने ते या हल्ल्यातून बचावले होते.
ही घटना समोर येताच दलितांच्या भावनांचा उद्रेक केवळ राज्यातच नव्हे तर देशभर झाला आणि देशभरातील राष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले होते.
या नंतर भंडारा जलद गती न्यायालयाने या प्रकरणातील आठ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्याला आव्हान देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच या घटनेचे साक्षीदार भैय्यालाल भोतमांगे यांचे निधन झाले. त्यामुळे न्यायाविनाच भोतमांगे कुटुंबाने जगाचा निरोप घेतला. जातीय द्वेष आणि जातीय वर्चस्व यातून ही अमानुष घटना घडली होती.