कोल्हापूर,दि.२ (प्रतिनिधी) गांधीनगर सावधानता, सुरक्षिततेला प्राधान्य देणारी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा गावागावात प्रभावीपणे अंमल करावा, असे आवाहन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोर्डे-पाटील यांनी येथे केले.
जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांचे प्रयत्न व संयुक्त विद्यमाने गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने येथील सिंधी सेंट्रल पंचायत सभागृहात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमात गोरडे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव होते.
चोरी, दरोड्यातील चोर तात्काळ जेरबंद होण्यासाठी व ग्रामसभा, सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी ठरत असून प्रत्येक ग्रामपंचायतीनी या यंत्रणेचा प्रभावीपणे अंमल करावा, असे आवाहन दीपक जाधव यांनी अध्यक्षस्थानावरून केले.
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600 / 9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार असल्याचे सांगून ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री.डी.के.गोर्डे-पाटील यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. ही यंत्रणा
संबंधित पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी 50 रुपये प्रति कुटुंब, प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे. या खर्चाची 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करणेबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत, असेही यावी स्पष्ट करण्यात आले.
गेल्या 14 वर्षांत पुणे,सोलापूर, अहमदनगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत.ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 / 9822112281 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे शक्य होते व सुरक्षिततेमध्ये भर पडते.
ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे, जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे, नोडल अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनायक झिंजुर्के, नोडल अंमलदार सतीश माने यांनी प्रशिक्षण व प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला. गांधीनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य,पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तलाठी कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका,आरोग्य अधिकारी-कर्मचारी, व्यापारी,पोलीस मित्र व सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी….
गांधीनगर येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्गदर्शन, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना ग्रामसुरक्षा यंत्रणा संचालक डी के गोर्डे पाटील शेजारी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव व पोलीस उपनिरिक्षक विनायक झिंजुर्के