पाचगणीत ‘ शांती सद्भावाचे वर्तमान ‘ चर्चासत्र संपन्न
पाचगणी ता.३ पाचगणी येथे महात्मा गांधींनी स्मारक समितीच्या वतीने गांधी जयंतीच्या निमित्ताने” शांती सद्भावाचे वर्तमान:राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संदर्भ ” या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले .या चर्चासत्राचे बीजभाषण जेष्ठ पत्रकार जतिन देसाई यांनी केले.तर परिसंवादामध्ये समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार समीर मणियार आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते सुबोध मोरे हे वक्ते होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॅप्रो उद्योग समूहाचे संस्थापक मयूर वोरा होते. स्मारक समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत यांनी स्वागत केले. समितीचे सचिव अस्लम तडसरकर यांनी प्रास्तविक केले. पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ पत्रकार रवी बेलोसे यांनी करून दिला .
या चर्चासत्रात सर्वच वक्त्यांनी शांती,सलोखा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिस्थिती, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाने व राज्यघटनेने दिलेली मूल्ये,
अलिप्ततावादी धोरण, संयुक्त राष्ट्र संघ,युद्धजन्य परिस्थिती, अण्वस्त्र मुक्ती धोरणाची गरज आदी मुद्यांच्या आधारे विविध अंगाने विषयाची सखोल मांडणी केली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात स्मारक समितीचा ‘महात्मा गांधी शांती संभावना पुरस्कार ‘ जतीन देसाई यांना मयूर वोरा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पाचगणी गिरीस्थान नगरपालिका, सह्याद्री पत्रकार संघ ,ज्येष्ठ नागरिक संघ यांचे सहकार्य लाभले. यावेळी पार्थ पांगारे या विद्यार्थ्याने गांधीजींच्या जीवनावर उत्तम मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी पाचगणी शहरातून महात्मा गांधींच्या विचारांचा जागर करणारी दिंडी काढण्यात आली. तसेच महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या स्थळाला भेट देण्यात आली व त्यांच्या प्रतिमाना अभिवादन करण्यात आले.
वीस वर्षांपूर्वी म्हणजे२००४ साली पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कालवश हुसेन जमादार यांच्या पुढाकाराने पाचगणीतील महात्मा गांधी वास्तव्य परिसराला अभिवादन करून सातारा ,सांगली व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून शांती सद्भावना यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेच्या द्विदशकपूर्ती निमित्त अशी यात्रा गांधीजींच्या पुढील जयंती पूर्वी पुन्हा काढण्याचा आणि त्याद्वारे शांती सद्भावनेचा संदेश देण्याचा संकल्प यावेळी महात्मा गांधी स्मारक समितीच्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमास भारत पुरोहित,विक्रांत पवार, सचिन भिलारे ,गणेश गोळे ,गणेश कदम ,अरुण शेळके जालिंदर पाटील, सईद कुरेशी ,राजेंद्र भिलारे, सचिन ननावरे यांच्यासह अनेकांचे मोठे सहकार्य लाभले.