▪️जो #गांधींना मानतो तो #आंबेडकरवादी असतो का?
डॉ. आंबेडकरांनी ६७ वर्षांपूर्वी गांधींवर केलेली टीका ही त्यांची मतं, ऐतिहासिक दावे आणि त्यांनी केलेल्या मीमांसेवर आधारित आहेत. ही मुलाखत तब्बल सहा दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर तिच्यातील सर्व कडवटपणा आणि तिरस्कृत दृष्टिकोनासह पुन्हा वाचली गेली पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या मते, 'गांधी भारताच्या इतिहासातील एक प्रकरण आहे, ते युग-प्रवर्तक नव्हते.' काँग्रेस जो अधिकृत उत्सव साजरा करतो, त्या कृत्रिम श्वासोच्छावास नसता तर गांधींचा फार पूर्वीच विसर पडला असता, असं ते म्हणतात.
गांधी युगप्रवर्तक होते की नाही, हा खुला प्रश्न आहे. ज्याचं सर्वमान्य होईल, असं उत्तर मिळणं कठीण आहे. विशेषतः जेव्हा गांधीजींना जाऊन केवळ सात दशकांचा काळ लोटला आहे. मात्र तो ‘कृत्रिम श्वासोच्छ्वास’ कधीच मागे पडला आहे. गांधी अजूनही जिवंत आहेत आणि दूरच्या भविष्यातही ते राहतील, अशीच खात्रीशीर अपेक्षा आपण ठेवू शकतो. (इथे गांधी एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणून आपण बोलतोय, त्यांच्या विचारधारेविषयी नाही.)
डॉ. आंबेडकर म्हणतात, ते गांधींना नेहमी ‘विरोधक’ म्हणूनच भेटले. त्यामुळे ते त्यांना ‘बऱ्याचशा इतर लोकांपेक्षा जास्त चांगलं ओळखतात.’ इतरांना ते महात्मा वाटले. मात्र डॉ. आंबेडकर म्हणतात, त्यांनी गांधींना ‘एक मनुष्य म्हणून बघितलं, त्यांचातला केवळ माणूस बघितला.’
डॉ. आंबेडकर यांच्या दृष्टीने हा दावा खरा असू शकतो, मात्र डॉ. आंबेडकरांनी गांधींना केवळ एका कोनातून, एका दृष्टिकोनातून बघितलं हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं. यातून त्यांचं गांधींविषयी एक मत तयार झालं, जे अतिशय टोकदार होतं. त्यांच्या (आंबेडकरांमध्ये) मतांत कधीकधी थोडा मवाळपणा किंवा राजकीय गरजही दिसली. उदाहरणार्थ ६ सप्टेंबर १९५४ रोजी डॉ. आंबेडकरांनी ‘गांधी निधी’ नावाने मीठ कर लावून तो निधी दलितांच्या कल्याणासाठी वापरला जावा, असा सल्ला दिला. ते म्हणाले, “मेरे मन में गांधीजी के प्रति आदर है. आप जानते हैं कि चाहे कुछ भी हो जाए, गांधीजी को पीछडी जाति के लोग अपनी जान से भी ज्यादा प्यारे थे. इस लिए वह स्वर्ग में से भी आशीर्वाद देंगे.”
गांधी ‘नेहमी दुटप्पी वागायचे,’ असा जोरदार आरोप डॉ. आंबेडकर यांनी आपल्या मुलाखतीत केला आहे. त्यांच्या मते गांधी आपल्या इंग्रजी वर्तमानपत्रात ‘स्वतःला जातिव्यवस्था आणि अस्पृश्यतेचे विरोधक म्हणून दाखवायचे’ मात्र त्यांच्या गुजराती मासिकात ‘ते वर्णाश्रम धर्म म्हणजेच जातिव्यवस्थेचं समर्थन करायचे.’ कुणीतरी गांधींच्या गुजराती आणि इंग्रजी वर्तमानपत्रातल्या वक्तव्यांची तुलना करून त्यांचं चरित्र लिहावं, असा सल्ला त्यांनी दिला होता. (ज्यामुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड होईल.)
गांधी यांचं लिखाण मूळ किंवा अनुवादित स्वरूपात ‘द कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी (CWMG)’ या शंभर खंडात उपलब्ध आहे. CWMGचे प्रमाणित हिंदी आणि गुजराती अनुवादही उपलब्ध आहेत. गांधींच्या गुजराती लेखाचे इंग्रजी अनुवाद मिळवणं कुणालाही सहज शक्य आहे. ‘हरिजन’ (इंग्रजी) ‘हरिजन सेवक’ (हिंदी) आणि ‘हरिजन बंधू’ (गुजराती) या सर्वांच्या जवळपास सर्वच प्रती गांधी हेरिटेज पोर्टलवर (gandhiheritageportal.com) मिळतील. कुणीही त्यांची तुलना करू शकतं आणि गांधींच्या गुजराती आणि इंग्रजी लेखांविषयी पसवरण्यात आलेले गैरसमज दूर करता येतो. गांधींजीनी इंग्रजी लेखांमध्ये वर्णाश्रम म्हणजेच जातिव्यवस्थेचं समर्थन आणि गुजराती लेखांमध्ये अस्पृश्यतेचा कडाडून विरोध केल्याचं अभ्यासातून दिसून येतं.
डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्यतेच्या उच्चाटनासह समान संधी आणि सामाजिक प्रतिष्ठेवर भर दिला आणि याला गांधींचा विरोध होता, असा दावा केला होता. त्यांच्या मते ‘अस्पृशांना काँग्रेसकडे वळवणं,’ हा गांधींचा हेतू होता आणि ‘अस्पृशांनी त्यांच्या स्वराज चळवळीला विरोध करू नये’ हा गांधींचा दुसरा उद्देश होता.
गांधी पुरोगामी सुधारणावादी नव्हते आणि ज्योतिबा फुले किंवा डॉ. आंबेडकर ज्याप्रकारे जातिव्यवस्थेला भिडले, तसं गांधींनी केलं नाही. तरीदेखील काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणात येण्याआधीच १९१५ साली गांधींनी आपल्या आश्रमात एका दलित कुटुंबाला आसरा दिला होता. त्यावेळी मोठा विरोध झाला आणि नव्याने स्थापन झालेलं आश्रम बंद होतं की काय अशी शक्यता निर्माण झाली मात्र गांधींनी त्याचा निकराने सामना केला. ते झुकले नाहीत. अशा अनेक घटना आहेत. राहता राहिला प्रश्न दलितांनी उच्च पदं भूषवण्याचा, तर जगजीवनराम आणि स्वतः डॉ. आंबेडकर केंद्रीय मंत्रिमंडळात होते.
इंग्रज भारताला स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी राजी झाले ते गांधींच्या चळवळीमुळे नाही तर तत्कालीन कारणांमुळे हे डॉ. आंबेडकरांनी अगदी योग्य म्हटलं आहे.
दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि पुणे करार हे दोन गांधी आणि आंबेडकर यांच्यातल्या वादाचे कळीचे मुद्दे होते.
डॉ. आंबेडकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत, राजकीय कारकिर्दीच्या अखेरीस दिलेली ही मुलाखत वास्तव, कडवटपणा आणि संतापातून केलेल्या आरोपांचं मिश्रण आहे. हे अगदी मानवी स्वभावाला आणि आंबेडकर यांनाही अनुसरून आहे अखेरीस उल्लेख करायला हरकत नाही की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गांधी हे सनातन हिंदू होते ही एक अंतर्मुख करणारी बाब आहे याचा दुसरा अर्थ असा की ते धर्म निरपेक्ष नव्हते.
✍️……
◾प्रा.शाहिद शेख◾
कोल्हापूर.
shahidsafwan05@gmail.com