५६ वर्षांनी सैनिकाच्या मृतदेहाचे अवशेष अंतिम संस्कारासाठी कुटुंबियांच्या ताब्यात, खिशातल्या ‘त्या’ कागदामुळे ओळख पटली!*
उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यामधील थराली तालुक्यातील कोलमुडी गावावर शोककळा पसरली आहे.
या गावातील एका शहीद जवानाचं पार्थिव तब्बल ५६ वर्षांनी आज (३ ऑक्टोबर) गावात पोहोचलं. त्यानंतर गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला. नारायण सिंह असं या शहीद जवानाचं नाव असून त्यांचं कुटुंब गेल्या ५६ वर्षांपासून पार्थिवाच्या प्रतीक्षेत होतं. नारायण सिंह यांचं पार्थिव गावात पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी ‘नारायण सिंह अमर रहे!’ अशा घोषणा दिल्या. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिक्स्थ बटालियन ग्रेनेडियरने नारायण सिंह यांना सलामी दिली.*
१९६८ मध्ये हिमाचल प्रदेशमधील रोहतांग खिंडीजवळ भारतीय वायूदलाचं विमान एएन-१२ कोसलळलं होतं. या विमानातील काही जवानांचे मृतदेह त्यावेळी सापडले. तर, काही जवान बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं.
मात्र, तब्बल ५६ वर्षांनंतर या विमानातील चार सैनिकांचे मृतदेह सापडले आहेत. यापैकी एक मृतदेह कोलपुडी गावातील नारायण सिंह यांचा होता. भारतीय लष्कराने चारही मृतदेहांची ओळख पटवल्यानंतर ते मृतदेह त्यांच्या गावी पाठवले. आज चारही मृतदेह त्यांच्या मूळ गावी दाखल झाले. त्यानंतर भारतीय लष्करातील जवानांच्या तुकड्यांनी त्यांना सलामी दिली. त्यानंतर या जवानांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
खिशातील ‘त्या’ चिठ्ठीमुळे मृतदेहाची ओळख पटली
शहीद नारायण सिंह यांचे पुतणे जयवीर सिंह हे कोलमुडी गावचे सरपंच आहेत. भारतीय लष्कराचे जवान नारायण सिंह यांच्या मृतदेहाचे अवशेष घेऊन आज जयवीर सिंह यांच्या घरी पोहोचले. लष्कराने सांगितलं की नारायण सिंह यांच्या खिशातील पाकिटात एक कागद सापडला. ज्यावर ‘नारायण सिंह, गाव कोलमुडी आणि बसंती देवी’ असा मजकूर लिहिलेला होता. तसेच त्यांच्या गणवेशावरील नेम प्लेटवरही त्यांचं नाव होतं.
चार जवानांचे मृतदेह सापडले
लष्कराने सांगितलं की बर्फामुळे नारायण सिंह यांचा मृतदेह सुरक्षित होता. तसेच मृतदेह सापडल्यानंतर डीएनए तपासणी देखील करण्यात आली. नारायण सिंह यांचे सहकारी सुभेदार गोविंद सिंह, सुभेदार हिरा सिंह बिष्ट, भवान सिंह यांनी सांगितलं की “ते खूप सौम्य आणि साधे होते”. नारायण सिंह यांनी लहान असतानाच भारतीय सैन्यात जायचं स्वप्न पाहिलं होतं.
१९६५ च्या भारत-पाक युद्धात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. दरम्यान, नारायण सिंह यांच्यासह मलखान सिंह, थॉमस कॅरियन व मुन्शी या तीन जवानांचे मृतदेह देखील बर्फातून बाहेर काढण्यात आले आहेत.