महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यकर्ते कधी बघितले नाहीत! — शरद पवार

महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यकर्ते कधी बघितले नाहीत! — शरद पवार

महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यकर्ते कधी बघितले नाहीत! — शरद पवार

एखादा निर्णय घ्यायचा, योजना जाहीर करायची, खर्च कशासाठी करतो याचे उत्तर त्यांना देता येत नाही. राज्यातील कॉन्ट्रॅक्टरचे 48 हजार कोटी थकवले आहेत, ते आता आंदोलन करणार आहेत. यापूर्वी देशांमध्ये प्रगतशील राज्य म्हणून आपली ख्याती होती. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांनी राज्याच्या अर्थकारणाला गती दिली. सध्याचे सरकार मात्र चुकीच्या रस्त्याने चालले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यकर्ते कधी बघितले नाहीत, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मल्हार नाट्यगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.*

यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, राष्ट्रवादीचे नेते सुदाम इंगळे, तालुकाध्यक्ष माणिक झेंडे-पाटील, विजय कोलते, प्रवीण गायकवाड, माजी नगराध्यक्ष वीणा सोनवणे, संभाजीराव झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. खंडोबाच्या जेजुरी नगरीमध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने येतात, कलावंतांची नगरी म्हणूनही जेजुरी प्रसिद्ध आहे. मल्हार नाट्यगृहामुळे जेजुरीच्या वैभवात भर पडली आहे. अनेक कलाकार येथे आयुष्यात तयार होतील, असे शरद पवार म्हणाले.

सुप्रिया सुळे यांनी बापदेव घाटातील महिला अत्याचार प्रकरणातील नराधमांचा अजून तपास लागला नाही. सरकार या विषयाकडे गांभीर्याने बघत नाही. महायुतीचे सरकार हे टक्केवारीचे सरकार आहे. त्यांनी महाराष्ट्राला खूप मागे नेले. सुदाम इंगळे, दिलीप बारभाई, प्रवीण गायकवाड यांची यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक हेमंत सोनवणे यांनी केले.

शरद पवार कार्यक्रमात रमले

मल्हार नाट्यगृहाचे उद्घाटन झाल्यानंतर आतील व्यासपीठावर स्थानिक कलाकारांनी सेक्सोफोन, तबला, ढोलकी आधी वाद्यांची जुगलबंदी सादर केली. खंडोबाचे गाणेही झाले. साहेबांच्या प्रवासाची एवढी धावपळ सुरू असतानाही साहेब अर्धा तास या कलावंतांचे कार्यक्रम पाहण्यात रमून गेले. खुर्चीवर हाताची बोटे वाजवीत त्यांनी ठेका धरला होता.

कलावंतांचे कौतुक करण्यासाठी ते स्वतः स्टेजवर गेले, त्यांच्या समवेत कलाकारांनी छायाचित्र काढून घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *