दादासाहेबांच्या नेतृत्वालाकडकडीत सॅल्युट!

दादासाहेबांच्या नेतृत्वालाकडकडीत सॅल्युट!

दादासाहेबांच्या नेतृत्वाला
कडकडीत सॅल्युट!


■ दिवाकर शेजवळ ■
divakarshejwal1@gmail.com

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी, रिपब्लिकन सेनानी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू आणि समर्पित सहकारी. टाय- कोटवाल्या उच्च शिक्षित रिपब्लिकन नेत्यांच्या तुलनेत ते कमी शिकलेले आणि गावरान पेहेरावातील अस्सल ‘मास लीडर’ होते. त्यांनी बाबासाहेबांच्या पश्चात रिपब्लिकन पक्षाला समर्थ नेतृत्व तर दिलेच. पण त्याचबरोबर ऐतिहासिक जन आंदोलनाद्वारे रिपब्लिकन पक्षाच्या राजकीय धाक – दरारा निर्माण केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पक्षाला अग्रभागी ठेवून दादासाहेबांनी आरपीआयला मुख्य राजकीय प्रवाहातील अविभाज्य घटक बनवले.

१९५६ च्या धर्म परिवर्तना नंतर बाबासाहेबांच्यापाठी बौद्ध समाजाला अनुसूचित जातीच्या सवलतींना मुकावे लागले… ( त्यांनतर तब्बल ३४ वर्षांनी म्हणजे १९९० सालात माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी घटना दुरुस्ती करून बौद्धांना त्या सवलतींना पात्र ठरवले खरे. पण महाराष्ट्रातील नोकरशाहीने मात्र त्या सवलती गेली ३० वर्षे बौद्धांच्या पदरात काही पडू दिल्या नाहीत, हे जळजळीत वास्तव आहे.)

दादासाहेब गायकवाड यांनी काँग्रेसशी त्याकाळी केलेल्या युतीची काही लोक खिल्ली उडवत आले आहेत. पण त्या युतीमागे सत्तेच्या आत्मकेंद्री राजकारणापेक्षा व्यापक समाज हिताला त्यांनी प्राधान्य दिले होते, हे कोण नाकारू शकेल?

दादासाहेबांनी १९६० च्या दशकाच्या प्रारंभीच चाणाक्षपणे राजकीय युती आणि काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी जुळलेल्या मैत्रीचा खुबीने वापर करत बौद्धांच्या सवलती राज्यापूरत्या का होईना वाचवल्या होत्या.आंबेडकरी समाज केंद्रातील सवलतींना सहा दशके मुकलेला असताना राज्य सरकारच्या सेवेत बौद्धांच्या तीन पिढ्या कर्मचारी/ अधिकारी म्हणून शिरकाव करू शकल्या, त्याचे पूर्ण श्रेय दादासाहेब गायकवाड यांनाच जाते.

वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज आणि सिद्धार्थ हॉस्टेलचा भूखंड, नाशिक जिल्ह्यातील ओझरचा मिग विमान कारखाना ही त्यांचीच ‘ कमाई’ आहे.

त्यांनी एच ए एल चा विमान कारखाना यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री असतांना नासिकसाठी मिळवला. आजही रोजगाराच्या संधीचा दुष्काळ असलेल्या नासिक जिल्ह्यावरील त्यांचे ते मोठेच उपकार ठरले आहेत.

सध्या महाराष्ट्रात आंबेडकरवादी पक्ष बेदखल करण्यात आल्याचे दिसत असून रिपब्लिकन गटांच्या युत्या आघाड्याना तर एकतर्फी राजकीय प्रेमाचे स्वरूप आले आहे.अशा काळात दादासाहेबांचे राजकारण हटकून आठवतेय. राजकीय युती, मैत्रीचा वापर स्वतःच्या राजकीय अभ्युदयासाठी न करता आंबेडकरी समाजाच्या उन्नतीसाठी करून घेण्याची दृष्टी आणि दातृत्व दादासाहेब गायकवाड यांच्या ठायी होते. आजच्या जयंतीनिम्मित त्यांना विनम्र अभिवादन. 💐💐💐💐
त्यांच्या नेतृत्वाला कडकडीत सॅल्युट!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *