माजी विद्यार्थ्याच्या सहकार्यातून शाळा सुशोभिकरण
कोल्हापूर, दि. १३ (प्रतिनिधी) कोडोली येथील हॉवर्ड मेमोरियल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून शाळा व शाळेच्या ऑफिस इमारतीचे रंगकाम करुन देण्यात आले. बरेच जण शाळेतून शिकून गेल्यानंतर त्यांना शाळेचा विसर पडतो. परंतु येथील काही विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल ओढ व आत्मियता आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. येथील हॉवर्ड मेमोरियल हायस्कूल ही शाळा सुमारे १२६ वर्षापूर्वीची जुनी शाळा असून या शाळेने अनेक शिक्षक, वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते घडवून एक सुजान नागरिक निर्माण केले आहेत. शाळेतून आतापर्यंत जवळ जवळ १७ हजार विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. ते आज देशात व परदेशात चांगल्या पदावर कार्यरत आहेत.
मे २०२४ मध्ये सन १९८७ – १९८८ च्या दहावीच्या बॅचचे स्नेह संमेलन आयोजित केले होते. यावेळी मुख्याध्यापक सचिन बिडकर सर यांनी शाळा सुशोभिकरणासंदर्भात विद्यार्थ्यांसमोर अपेक्षा व्यक्त केली, त्याला प्रतिसाद देत या बॅचचे जवळ जवळ सत्तर ऐंशी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेची रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला. यानुसार अनंत वॉल्टर चोपडे यांनी पुढाकार घेऊन माजी विद्यार्थी व देणगीदार यांच्या कडून देणगी गोळा करून जवळ जवळ एक लाख रुपये खर्च करून शाळा व ऑफिस इमारत रंगवून दिली आहे. हे काम करण्यासाठी आपला वेळ व पैसा खर्च करणारे अमोल चोपडे, जॉन जगताप, विजय पाटील, उदयसिंग अशोक गायकवाड यांचे सहकार्य लाभले. शाळा रंगवून दिल्याबद्दल संस्था पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक व स्टाफ यांनी आभार व्यक्त केले. शाळेचे रंगकाम ब-याच वर्षापूर्वी केले असल्यामुळे ते खराब झालेले होते. आज शाळा रंगविल्यामुळे आसपासच्या परिसरातून या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.