लाडक्या बहिणींप्रमाणेच लाडके ज्येष्ठ नागरिक महायुतीच्या पाठीशी -शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास

लाडक्या बहिणींप्रमाणेच लाडके ज्येष्ठ नागरिक महायुतीच्या पाठीशी -शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास

लाडक्या बहिणींप्रमाणेच लाडके ज्येष्ठ नागरिक महायुतीच्या पाठीशी

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास

ज्येष्ठ नागरिकांना मिळतोय विविध योजनांमधून लाभ

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबरोबरच महायुती सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा लाखो ज्येष्ठ नागरिकांना फायदा झाला. त्यामुळे लाडक्या बहिणींप्रमाणेच लाडके ज्येष्ठ नागरिक निवडणुकीत महायुतीच्या बाजूने उभे राहतील, असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांविषयीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

त्या म्हणाल्या की राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवास लागू केला. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्यात ३००० रुपये थेट डीबीटीमधून दिले जातात. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत आतापर्यंत राज्यभरातून ६ लाख अर्ज सरकारला प्राप्त झाले, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीने ज्येष्ठ नागरिकांचा महिन्याचा औषधांचा खर्च भरुन निघाला. ग्रामीण भागातील ज्येष्ठांना या योजनेचा मोठ लाभ झाला.

उतारवयात देवदर्शन करण्याची ज्येष्ठांची इच्छा असते पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. त्यासाठी राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करण्यात आली. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या, ऋषीकेश, काशी मथुरा,पंढरपूर, अशा तिर्थक्षेत्रांना नेले जाते. मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगरमधून तिर्थयात्रा सुरु होते. आतापर्यंत राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला, असे त्या म्हणाल्या. ज्येष्ठ नागरिकांवर होणारा अन्याय, त्यांची सायबर फसवणूक, त्यांच्यासंदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष कार्यान्वित केल्याचेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून दोन वर्षात ४० हजार रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली. यासाठी ३५० कोटींची मदत देण्यात आली. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील आरोग्य विम्याचे संरक्षण १.५ लाखांवरुन ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आले. राज्यात ९ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली. बार्टी आणि महाज्योतीमधून लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने राज्यातील महिलांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सरकारने पाच महिन्यांचे ७५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात पाठवले. शिवसेनेने प्रत्येक मतदार संघातील २५ हजार लाडक्या बहिणींशी संवाद साधला. त्यामुळे लाडक्या बहिणी विरोधी पक्षांना मतदानातून धडा शिकवतील, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *