सुदृढ समाज निर्मितीसाठी भाषा व साहित्याकडे गांभीर्याने पहावे
कुरुंदवाड ता.२५ भाषा, साहित्य, समाज आणि संस्कृती यांचे परस्पर संबंध दृढ असतात. सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर भाषेची निर्मिती झाली.भाषा हे संवादाचे सर्वोत्तम माध्यम असते,साहित्य हे जगण्याचे भान आणि बळ देत असते तसेच साहित्याचा समाज परिवर्तन अशी निकटचा संबंध असतो. स-हित नेते ते साहित्य.वाचन, लेखन आणि श्रवण या तीन कलांनी मानवी जीवन समृद्ध झालेले आहे. भाषा साहित्य आणि समाज यांच्या सुदृढ निर्मितीसाठी वाचन लेखन संस्कृती विकसित करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,
असे प्रतिपादन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी केले. ते कुरुंदवाडच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी नगर वाचनालयाच्या पद्मश्री पा.वा.गाडगीळ व स.रा.गाडगीळ स्मृती शरद व्याख्यानमालेत बाराव्या वर्षातील पहिले पुष्प गुंफताना ” भाषा साहित्य आणि समाज” या विषयावर बोलत होते. स्वागत व पाहुण्यांचा परिचय उपकार्याध्यक्ष प्रा. बी. डी. सावगावे यांनी केले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष अ.शा.दानवाडे यांनी प्रास्ताविक केले.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा एक तपाच्या संघर्षानंतर मिळाला आहे ही आपणा सर्वांसाठी मोठी आनंददायी बाब आहे. आपल्या भाषेचे आपण जतन करणं फार महत्त्वाचे आहे. भाषेचे योग्य पद्धतीने जतन झाले नाही तर जग जगाची रंजकता कमी वाटू शकते.निरनिराळ्या पद्धतीने विचार करण्याची आपली शक्ती कमी होऊ शकते.तसेच आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेली वैविध्यताही कमी होऊ शकते. ते होऊ द्यायचं नसेल तर आपल्या भाषेत दर्जेदार साहित्याची निर्मिती सतत होत राहिली पाहिजे. मराठी संत साहित्याचा अस्सल आणि अव्वल दर्जाचा वारसा ही आपली मोठी भाषिक, साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक श्रीमंती आहे. संतांनी दिलेला विचार घेऊन पुढे वाटचाल केली तर सुदृढ समाजाची निर्मिती निश्चितपणे होऊ शकेल.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले,साहित्य निर्माण करणारा लेखक आत्मजीवनाचा त्याचप्रमाणे आपल्या काळाचा आणि युगाचाही भाष्यकार असतो. साहित्यिकाचे मन हे नेहमी असमाधानी आणि अतृप्त असते. अगदी स्वतःच्या जीवनाकडे तिऱ्हाईताच्या दृष्टिकोनातून तो पाहत असतो. माणूस अपराजित नसतो, मृत्यूकडून त्याचा पराभव निश्चित असतो. म्हणूनच अनेकदा लेखक पराभवाच्या गाण्यातही विजयाचे संगीत शोधताना दिसतो. साहित्य ही अन्य कलांप्रमाणेचे एक कला असली तरी त्याचे म्हणून एक वेगळेपण आहे. त्याचा इतिहास, तत्त्वज्ञान, समाजकारण ,राजकारण, अर्थकारण अशा साऱ्याशी निकटचा संबंध असतो. भाषा, साहित्य,समाज आणि संस्कृती यांच्यात विविधता असली तरी अखिल मानवजात एक आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात भाषा ,साहित्य आणि समाज यांचे परस्पर संबंध उलगडून दाखवले. यावेळी के.एस. दानवाडे,शशिकांत पाटील ,जयपाल बलवान ,सदाशिव सुभेदार , मोनाप्पा चौगुले , द.बा.भोसले,ऍड .पुष्पा कोळी, मेघा पाटील यांच्यासह अनेक साहित्य रसिक उपस्थित होते.