शाहीर विजय जगताप यांना शोकसभेत आदरांजली
इचलकरंजी ता.२ शाहीर विजय जगताप यांनी शाहिरी कला विकसित करण्याकरता विद्यापीठ आणि संस्थात्मक पातळीवर केलेले काम अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच पद्धतीने राजकीय, सामाजिक,साहित्य शिक्षण, इत्यादी क्षेत्रात त्यांनी अर्धशतकाहून अधिक काळ सातत्यपूर्ण काम केले. इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक व पाणीपुरवठा समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केले. समाजाच्या प्रबोधनासाठी त्यांनी शाहिरी कला व लेखन कौशल्य यांचा वापर केला. तसेच आपली कला देशातील विविध राज्यातील महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सादर केली.ते कालवश होण्याच्या दोन दिवसापूर्वी इचलकरंजी सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनात
त्यांनी पोवाडा सादर केला होता. तोच त्यांचा अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. त्यांच्या निधनाने इचलकरंजी व परिसराची फार मोठी संस्कृतीक हानी झालेली आहे. त्यांचे शाहिरी प्रशिक्षणाचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल ,असे मत समाजवादी प्रबोधिनी येथे शाहीर विजय जगताप यांना आदरांजली वाहणाऱ्या शोकसभेत विविध मान्यवरांनी व्यक्त केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते जयकुमार कोले होते.प्रारंभी चंद्रकांत जगताप यांच्या हस्ते शाहीर विजय जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच या इचलकरंजी चा नाव की देशाच्या कानाकोपऱ्यात येणाऱ्या शाहीर विजय जगताप यांच्या निधनानिमित्त घेत असलेल्या शोकसभेच्या आयोजना मागील भूमिका प्रसाद कुलकर्णी यांनी मांडली.