दो कदम आप चलो… दो कदम हम चलेंगे
८ मार्च या ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’ला फेमिनिझम म्हणजेच ‘स्त्री वाद’ या दृष्टीकोनातून पहिले जाते . सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रांत स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारी प्रणाली किंवा तत्व किंवा दर्शन म्हणजे ‘स्त्रीवाद’ होय. समानता हा शब्द जरी छोटा असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. अजूनही आपल्याकडे हि समानता आलेली दिसून येत नाही. अजूनही केवळ भारतातच नव्हे संपूर्ण जगात हा विषय आणि याचे गांभीर्य आपल्याला दिसून येते, याचाच उहापोह करणारा हा लेख.
मानवी समाजाच्या हितासाठीं आणि रक्षणासाठी स्त्री च्या दृष्टीकोनातून जगाकडे पाहणे आणि जगातील आजहि मानवी समाजावर पुरुषी दृष्टिकोनाचा असलेला प्रभाव कमी करणे हे परिवर्तन स्त्रीवादाला हवे आहे. या चळवळीला खरी सुरुवात झाली ती ‘स्त्री मुक्ती ‘ या विचार सरणीतून. १९७५ या ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्षांत’ स्त्रीमुक्ती हा शब्द भल्याबुऱ्या अर्थाने भारत आणि महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. सुरुवातीला पाश्चात्त्य देशांतून आलेले फॅड म्हणून या विचाराकडे पाहिले गेले. त्या आरंभकाळात या विचारप्रणालीचे अधिष्ठान भारताबाहेर आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती होती. ८ मार्च १९०५ या दिवशी कपडे व्यवसायातील मजूर स्त्रिया त्यांच्या मागण्यांसाठी संघटितपणे प्रथम रस्त्यावर आल्या आणि त्यांच्यावर गोळीबार झाला. तो दिवस १९१७ च्या राज्यक्रांतीनंतर कम्युनिस्टांनी ‘महिला दिन’ म्हणून साजरा करायचा असे ठरविले. युनोने १९७५ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले तेव्हापासून ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणुन जगभर साजरा केला जातो.
दरवर्षी हा दिवस येतो आणि मोठया उत्साहाने साजरा केला जातो. पण ज्या उद्देशासाठी हा दिवस साजरा केला गेला पाहिजे तो उद्देश बाजूलाच राहतो किंवा कुणीही या वर बोलत नाही. आजकाल आपण समानतेबद्दल अधिक बोलतो. परंतु हि समानता आपल्याला दिसते का? स्त्रीवादी विचारधारेचे विविध प्रवाह आहेत. त्यातील
उदारमतवादी स्त्रीवाद : उदारमतवादी स्त्रीवाद्यांनी स्त्री-पुरुष समानतेवर भर दिला आहे. त्यांना कुठल्याही स्वरूपातील भेदभाव अमान्य आहे. स्त्रिया पुरुषांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात, हा युक्तिवाद त्यांना मान्य नाही. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या निर्णयप्रक्रियेत, संघटनांमध्ये, तसेच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. या क्षेत्रांत स्त्रियांची भूमिका मर्यादित आहे, अशी टीका उदारमतवादी स्त्रीवाद्यांनी केली आहे.
अलगतावादी स्त्रीवाद : अलगतावादी स्त्रीवाद्यांनी स्त्री-पुरुषांमधील फरक अधोरेखित केला आहे. त्यांच्या मते, हा फरक फक्त जैविक नाही, तर सामाजिक-सांस्कृतिक देखील आहे. त्याच बरोबर स्त्रियांचे सामाजीकरणही विशिष्ट पद्धतीने केले जाते. स्त्रीने नेहमी मवाळ, सौम्य, शांतताप्रिय व आज्ञाधारक असावे तिने इतरांची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा केली जाते. जी अलगतावादी स्त्रीवाद्यांना मान्य नाही.
मार्क्सवादी/समाजवादी स्त्रीवाद : मार्क्सवादी/समाजवादी प्रवाहातील स्त्रीवादी चळवळी संपूर्ण व्यवस्थेला वर्गसंघर्षाच्या परिप्रेक्ष्यातून पाहतात. त्यांच्या मते, राष्ट्र-राज्य ही मुळात एक भांडवलशाही संकल्पना आहे. स्त्री हा एक स्वतंत्र वर्ग असून पुरुषसत्ताक पद्धतीत त्यांना नेहमी भेदभाव व शोषण यांचा सामना करावा लागतो, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा परिघदेखील त्यास अपवाद नाही. याचबरोबर हा प्रवाह भांडवलशाहीवर व त्यातून निर्माण होणाऱ्या असमान सामाजिक आणि राजकीय व्यवस्थांवरही टीका करतो. तसेच पुरुषप्रधानता व भांडवलशाही यांमुळे स्त्रियांचे जे दुहेरी शोषण होते त्यास वाचा फोडतो.
उत्तर आधुनिक आणि उत्तर वासाहतिक स्त्रीवाद : उत्तर आधुनिकतावाद जगात घडलेल्या सगळ्या घटनांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतो. स्वातंत्र्य, आधुनिकतावाद या मूल्यांची जोपासना करताना ‘लिंगभाव’आणि लैंगिक समानता या संकल्पनेचाही पुनर्विचार व्हायला हवा, असे ते मानतात. त्यांच्या मते, लिंगभाव फक्त अस्मितेशी निगडित अथवा सामाजिक घटकांवर अवलंबून असतो, असे नाही. ती एक प्रक्रिया आहे, जी वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा परीघही त्याच प्रक्रियेमार्फत पुरुषी झालेला आहे. हा परीघ पुरुषास घडवतो आणि पुरुष या परिघाला आकार देतात, ज्यात आपोआपच स्त्रियांच्या दृष्टीकोनाकडे कानाडोळा केला जातो. हे सगळे अगदी यशस्वी रीत्या रुजवले जाते व नैसर्गिक मानले जाते.
उत्तर आधुनिक स्त्रीवादानुसार, स्त्रिया आणि मुली जगाच्या निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात आणि म्हणूनच, त्यांच्यात तेवढी क्षमता देखील आहे. लैंगिक समानता हा मूलभूत मानवी हक्क असण्यासोबतच, संपूर्ण मानवी क्षमता आणि शाश्वत विकासासह शांततामय समाज साध्य करण्यासाठी आवश्यक आहे. शिवाय, हे दर्शविले गेले आहे की महिला सक्षमीकरणामुळे उत्पादकता आणि आर्थिक वाढ होते. आजही विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांचा प्रभाव दिसून येतो. जगातील बहुतांश देशांचे राष्ट्रप्रमुख पुरुष आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील अनेक घडामोडींवर पुरुषी प्रभाव दिसून येतो. स्त्रियांची भूमिका बऱ्याचदा अराज्य घटकांमार्फत असते. या घटकांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीय संघटना, बिगर–शासकीय/अशासकीय संघटना, स्वयंसेवी संघटना इत्यादींचा समावेश केला जातो. या संघटना आंतरराष्ट्रीय संबंधांवर प्रभाव पाडत असतात. उदा., ‘‘महिलांच्या तस्करी विरुद्ध युती’ ही अशासकीय संघटना निर्वासित स्त्रियांचे प्रश्न, युद्धाला बळी पडलेल्या स्त्रियांचे प्रश्न, तस्करी संबंधीचे प्रश्न इत्यादी विषयांवर प्रकाश टाकत असते. नुकतेच डब्ल्यूटीओ च्या सरचिटणीस आयविला ओकोन्जो अबुदाबी येथे झालेल्या महिला व्यापार परिषदेत म्हणाल्या कि, महिलांचे सशक्तीकरण करणे हे सामाजिक व्यवस्थेसाठीच चांगले आहे असे नाही, तर अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचाही तो एक योग्य मार्ग आहे. समाज आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या महिला आर्थिक विकासातही मोलाची भूमिका बजावतात.
दुर्दैवाने, पुरूष आणि स्त्रिया यांच्यात हक्क आणि संधींची पूर्ण समानता मिळवण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पुढे विचार करणारी स्त्री कुटुंबालाच नाही तर समाजालाही पुढे नेऊ शकते. त्यासाठी तुम्हाला स्त्री असल्याचा अभिमान असायला हवा. पण परमेश्वराने दिलेले स्त्रीत्व जपता आले पाहिजे. समाजाला पुढे जाण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही महत्त्वाचे चाके आहेत. एकटी स्त्री किंवा एकटा पुरुष समाजाचा विकास करण्यास असमर्थ आहे. त्यामुळे आधी तुम्हाला कोणापासून मुक्त व्हायचे आहे हे ठरवावे लागेल. तुम्हाला पुरुषांपासून स्वातंत्र्य हवे आहे का? तर नाही. आम्हाला परंपरेच्या जोखडातून, जाचक रूढींपासून, रोजच्या अत्याचाराच्या टांगलेल्या तलवारीपासून स्वातंत्र्य हवे आहे. स्त्रियांना दुय्यम वागणूक देण्याची मानसिकता मग ती स्त्री असो वा पुरुष, बदलली पाहिजे. तिला तिचे आयुष्य तिच्या पद्धतीने जगू दिले पाहिजे. आजही अनेक कमावत्या स्त्रिया त्यांच्या पगाराचा हवा तसा वापर करू शकत नाहीत. एक स्त्री मुळात काटकसरी असते आणि न्याय्य देवाणघेवाणीची वकिली करते. त्यामुळे ती जास्त पैसे खर्च करत नाही. पण तरीही तिला पगार मिळत नाही. बदल मोठ्या प्रमाणावर होत आहेत. स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. पण आजही अनेक मध्यमवर्गीय कुटुंबात मुलींना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण आणि नोकरी करण्याचा अधिकार नाही. पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील समानता, याचा अर्थ स्त्री आणि पुरुष एकमेकांना समजून घेतात आणि विकसित होत असतात. कायद्याने स्त्रीला सहन करण्यायोग्य केले याचा अर्थ तिने सहन करणे आणि पुरुषांनीच नव्हे तर स्रियांनी देखील स्त्रीयांवर अन्याय करावा असा होत नाही. तसेच स्त्रीमुक्तीच्या नावाखाली महिलांनी मनमानी करू नये. समानता म्हणजे समजून घेणे आणि सुधारणे होय.
दोघांनी एकमेकांना समजून घेणे म्हणजे विकास होय. मग ते कामावर असो किंवा घरात, एकमेकांना आधार देणे खूप महत्वाचे आहे. पडणारी बाजू कोण घेते याने काही फरक पडत नाही. हे समजून घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे आहे. महिलांनीही केवळ समानतेच्या गप्पा न मारता स्वतंत्रपणे काम करण्याची गरज आहे. स्त्रीलिंग म्हणजे प्रकृती आणि पुरुषलिंग म्हणजे पुरुष. निसर्गानेही या दोघांना समान महत्त्व दिले आहे. मग भेदभाव का करायचा? स्त्री-पुरुष भेदाच्या पलीकडे जाऊन एकमेकांना माणूस म्हणून समजून घेतले पाहिजे. एक स्त्री म्हणून तिच्याकडे असलेले प्लस पॉईंट आणि पुरुष म्हणून त्याच्याकडे असलेले प्लस पॉइंट्स यांची सांगड घालून एक चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एकच सांगायचे आहे; उंच उंच जाण्याच्या स्वप्नात आम्हाला आधार हवा आहे. तुमच्या पाठीमागे कोणीतरी विश्वासाने उभे आहे या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे. ही गरज फक्त महिलांची नाही तर सर्वांची आहे. कोणीही स्त्री-पुरुष श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो हे समजून घेऊन प्रवास केल्यास, आपण इच्छित साध्यापर्यंत सहज पोहोचू शकतो. याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. अन्याय, अत्याचार आणि असमानता संपवायची असेल तर स्त्री आणि पुरुष दोघांनीही विचारांची उच्च पातळी गाठली पाहिजे आणि समजून घेतली पाहिजे.
“चलो फिर, दो कदम आप चलो… दो कदम हम चलेंगे…”
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा !
डॉ. रिता मदनलाल शेटीया
लेखिका : रिता इंडिया फॉउंडेशनच्या संस्थपिका आहेत.
Posted inBlog
दो कदम आप चलो… दो कदम हम चलेंगे
