प्रतिभावंत कवि ग्रेस हे शब्दप्रभु होते -दिलीप शेंडे

प्रतिभावंत कवि ग्रेस हे शब्दप्रभु होते -दिलीप शेंडे

इचलकरंजी ता. २७ ‘ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निदादत होता’ पासून ‘ भय इथले संपत नाही ‘ सारखी आशयघन रचना करणारे कवी ग्रेस ऊर्फ माणिक सीताराम गोडघाटे कवी म्हणून दुर्बोध नव्हते.तर ते काळजातून लिहिणारे अस्सल व अव्वल कलावंत होते. स्वतःच्या जगण्यातून बोध शोधणारे ते सुबोध कवी होते.ज्यांना ग्रेस समजून घेता आले नाहीत किंवा पचले नाहीत पांढरपेशा वर्गाने त्यांच्यावर दुर्बोधतेचा शिक्का मारला.आणि ग्रेस त्या शिक्क्यासहित मृत झाले. मात्र ‘खिळ्याना कळेना कूठे क्रुस न्यावा, प्रभूने पापण्या अशा झाकल्या ‘असे म्हणणारे ग्रेस शतकातून एखाद्या जन्मणाऱ्या प्रतिभावंतासारखे होते असे मत ग्रेस यांचा प्रदीर्घकाळ सहवास लाभलेले दिलीप शेंडे यांनी” दुःखाचा महाकवी ग्रेस : कवितेमागील कथा आणि व्यथा ” या विषयावर रसिकांशी संवाद साधताना व्यक्त केले. ते सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्मृती जागर सोहळा मालिकेतील तिसऱ्या कार्यक्रमात माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांच्या तेराव्या स्मृतिदिनी ” दुःखाचा महाकवी ग्रेस : कवितेमागील कथा आणि व्यथा ” या विषयावर रसिकांशी संवाद साधताना बोलत होते. प्रारंभी ग्रेस यांच्या प्रतिमेला अशोक सौंदत्तीकर व डॉ. एस. पी. मर्दा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा.रोहित शिंगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

दिलीप शेंडे म्हणाले, ग्रेस यांना शास्त्रीय संगीत व रागदारी याचीही माहिती होती.झोपडपट्टीत दारिद्र्यात बालपण गेलेले, चरितार्थासाठी वृत्तपत्र वाटणारे ग्रेस यांना बालपणापासूनच कवितेचे वरदान लाभलेले होते. अनुभवाला आलेले दुःख , दैन्य आणि दारिद्र्य त्यांना माणूस म्हणून संपन्न करत गेले. त्यामुळे त्यांची कविता अस्सल बनली.आई स्वतःच्या मुलांचे रक्षण करते तर माऊली जगाचे कल्याण करते ,आकाश विस्तीर्ण असते पण त्याला सावली नाही, रामाला आज्ञाच होती पण खरा वनवास सीतेला भोगावा लागला,लिव्हरला द्राक्षाचे घोस लटकावे तसा माझा कॅन्सर माझा मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो आहे, मी मोकळा आहे पण रिकामा नाही, माझे घर विकणे आहे पण सज्जनांनी चौकशी करू नये , घराच्या खिडक्यांचे सारे पडदे उघडण्याचे काहीही कारण नाही एवढ्या प्रकाशाचे मी करू काय ? यासारखी असंख्य मूलभूत विधाने करणारे ग्रेस शब्दप्रभू होते. दिलीप शेंडे यांनी ग्रेस यांचा त्यांच्या निवासस्थानी तब्बल एक तपभर असलेला मुक्त वावर , दिलीप व दीपश्री शेंडे या दांपत्याशी त्यांचे असलेले ऋणानुबंध, भेट दिलेल्या पुस्तकांवर स्वतःची कृतज्ञता तपासण्यासाठी तसेच या पुस्तकाचा विश्वस्त म्हणून केलेली नियुक्ती असे लिहिणारे लेखक ग्रेस, मृत्यूच्या आदल्या दिवशी पुण्यातील दवाखान्यातून चक्क पळून येऊन इचलकरंजीत घरी येऊन दिलेली भेट, भारतरत्न लतादीदी ते हृदयनाथ या मंगेशकर कुटुंबीयांशी ग्रेस यांचे असलेले नाते, इनग्रीड बर्गमन या अभिनेत्रीच्या एका चित्रपटातील एका संवादातून तिच्या संमतीने घेतलेले ‘ ग्रेस ‘हे नाव अशा अनेक बाबींचा उलगडा केला. तसेच ग्रेस यांच्या अनेक कवितांचा अन्वयार्थ उलगडून दाखवला. ग्रेस यांच्या काही रचनाही सादर केल्या. या कार्यक्रमास डॉ.राजकुमार पाटील, डॉ. विजया पोतदार , ऍड.माधुरी काजवे, उल्हास लेले ,प्रवीण होगाडे, वैशाली नायकवडी ,संजय सातपुते, रेखा पाटील, डॉ. नंदा शहाणे, काशिनाथ जगदाळे, डॉ. मगदूम ,संजय रंगाटे, दयानंद लिपारे,अरुण काशीद, ए.बी.कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस डीवायएसपी समिरसिंग साळवे यांनी ‘आभाळ कुणाला कळले का? ‘ ही कविता सादर केली. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले. या मालिकेतील चौथा कार्यक्रम थोर साहित्यिक चिं.त्र्य.खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या स्मृतीदिनी शनिवार ता. २६ एप्रिल २५ रोजी आयोजित केला जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *