भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
- अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर
जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंध समितीची बैठक संपन्न
धुळे, दिनांक 26 मार्च, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : दुध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा असून या पदार्थ्यांत भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंध समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी दिल्यात.
जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंध समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस डॉ. गिरीश पाटील, उपायुक्त पशुसंवर्धन, डॉ. अमित पाटील, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, मिलींद नवगिरे, पोलीस उपनिरीक्षक, संतोष दलाल, निरीक्षक, वैध मापनशास्त्र, कृष्णा नेरकर, क्षेत्र सहाय्यक, वैध मापनशास्त्र व जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाचे प्रितेश गोंधळी, मुकेश तमायचेकर आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अपर जिल्हाधिकारी श्री. बोरकर म्हणाले की गुढीपाडवा व रमजान ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर दूधाचा पुरवठा व वापर अधिक प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता जिल्हास्तरीय समितीमार्फत धडक मोहिम राबवून दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करावी. या पदार्थ्यांत भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी. धुळे शहर व जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांनी भेसळयुक्त पदार्थांची विक्री करु नये. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
00000