इचलकरंजी ता. ३० राम गणेश गडकरी म्हणत उदरनिर्वाहासाठी कोणते धंदे केले हे सांगण्यापेक्षा कोणते केले नाहीत हे सांगणे सोपे आहे. गोविंदा हा सात वर्षाचा भाऊ कालवश झाल्यानंतर त्यांनी गोविंदाग्रज हे नाव घेतले. शिवाय त्याच्या स्मरणार्थ आयुष्यभर आंबा हे फळ वर्ज्य केले. गडकरी हे कमालीचे हृदयस्त व्यक्तिमत्व होते. काव्य, नाट्य आणि विनोदी लेखनामध्ये विशिष्ट कालखंडाच्या विभाजक रेषा त्यांच्याबाबत मारता येत नाहीत. त्यांची प्रेम कविता अतिशय उत्कट तीव्र भावावेगी आहे. केशवसुताना ते गुरु मानत असले तरी केशवसुतांच्या कवितेतील वीरश्री, निर्भिकता, नवस्वीकार्यता गडकरींच्या कवितेत दिसून येत नाही. मात्र अवघ्या चौतीस वर्षाचे आयुष्य लाभलेल्या गडकरींनी मराठी साहित्याच्या विस्तीर्ण पटलावर आपली अमिट मुद्रा उमटवलेली आहे.असे मत नामवंत कवयित्री वैशाली नायकवडी यांनी व्यक्त केले. त्या सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनाचा स्मृती जागर कार्यक्रमात “राम गणेश गडकरी : व्यक्ती आणि वांग्मय ” या विषयावर बोलत होत्या. स्वागत व प्रास्ताविक दिलीप शेंडे यांनी केले.महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली १९७४ साली झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्मृती जागर सोहळा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा करण्यात येतो त्यापैकी हा पाचवा कार्यक्रम होता. यावेळी डॉ.नंदा शहाणे यांनी ‘ राजहंस माझा निजला ‘ ही कविता सादर केली.
वैशाली नायकवडी पुढे म्हणाल्या, राम गणेश गडकरी हे प्रेमसंन्यास ,पुण्यप्रभाव ,राज संन्यास ,एकच प्याला, भावबंधन यासारखी नाटके, वेड्यांचा बाजार, गर्वनिर्वाण ही अपूर्ण लिहीलेली नाटके, तसेच संपूर्ण बाळकराम सारखा विनोदी लेखसंग्रह व वागवैजयंती सारखा काव्यसंग्रह अशा अनेक पुस्तकातून आणि त्यांच्यावर इतरांनी लिहिलेल्या समीक्षेतून भेटतात. गडकरी
तल्लख बुद्धिमत्तेमुळे कोट्या करण्यामध्ये तरबेज होते. उस्फूर्तता आणि हजरजबाबीपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातूनही दिसून येतात. गडकरींना वाचनाचे प्रचंड वेड होते. त्यांच्या विडीच्या व्यसनापेक्षा हे वेड अनेकपटींनी जास्त होते. त्यांचे इंग्रजी वाचनही उत्तम होते. वैशाली नायकवडी यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने राम गणेश गडकरी यांचे व्यक्तित्व व साहित्य , वाद – प्रवाद यांची सूत्रबद्ध मांडणी केली.या कार्यक्रमास दिपश्री शेंडे,ॲड. माधुरी काजवे, प्रा. मिलिंद दांडेकर, रामचंद्र ढेरे, सुनिता ढेरे , सुवर्णा पवार , पुष्पा मोरे , शंकर उडपी , सी.पी.कोरे, सविता काटकर, अभिजीत काटकर,प्रसाद कुलकर्णी यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते.अरुण दळवी यांनी आभार मानले.