चोकाक येथे करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न
विद्यार्थ्यांना १० वी नंतरच्या करिअर निवडीसाठी उपयुक्त माहिती
हातकणंगले तालुक्यातील चोकाक गावात ग्रामपंचायत व के.के.जी. ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने “१० वी नंतर काय?” या विषयावर करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात श्री. एस. बी. समुद्रे (सेवानिवृत्त शासकीय अध्यापक) यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले.
सदर शिबिर शाहू सभागृह येथे सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत पार पडले. कार्यक्रमात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्या शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश घ्यावा, याबाबत माहिती देण्यात आली. आजही अनेक विद्यार्थी आणि पालक “१० वी नंतर काय?” या संभ्रमात असतात. या संभ्रमातून मार्ग काढण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार योग्य करिअर निवडता यावे, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सुतार यांनी केले तर आभार प्रितम देशिंगे यांनी मानले. सरपंच सुनील चोकाककर, विनायक शेटे, प्रीतम देशिंगे, महेश सुतार यांच्यासह परिसरातील अनेक विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.