पुणे, विमाननगर ( प्रतिनिधी)
तारा मोबाईल क्रेशेस, विद्यार्थ्यांचा वार्षिक कौतुक सोहळा दिमाखात संपन्न
तारा मोबाईल क्रेशेस, पुणे हि संस्था बांधकाम साईटवर गेली ४५ वर्षे स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी डे केअर सेंटर चालवीत आहे. या संस्थेचा दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांचा वार्षिक कौतुक सोहळा दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती डॉक्टर जयश्री फिरोदिया, कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती प्राजक्ता शेवाळे, शिक्षण अधिकारी कोल्हापूर यांच्या हस्ते इयत्ता १० वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी – विद्यार्थीनिंना ‘श्रीमती सिंधुताई सावर्डेकर पुरस्कार’ व १२ वी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी – विद्यार्थीनिंना ‘श्री. राम कुमार राठी’ पुरस्कार देण्यात आला. यावेळी संस्थेच्या संस्थापक अधिकारी अध्यक्षा मधुरा गोखले, संचालिक – फ्रेनी तारापोर , शर्मिला ब्रह्मे , निर्मला मेहेता, समीर मेहेता, कार्यकारी अधिकारी मंजुषा दोशी उपस्थित होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी योग सादरीकरण, प्लास्टिक मुक्त भारत यावरती नृत्य सादर करत सर्वांचेच लक्ष वेधले. माजी विद्यार्थ्यानी डे केअर सेंटर मुळे त्यांच्या आयुष्यातील झालेल्या प्रगतीचा उल्लेख करत संस्थेचे आभार मानले. माजी विद्यार्थी पूजा कांबळे (सध्या डिप्लोमा इनजिनीयरिंग) , नारायण (Boutique owner), शरणप्पा (बी टेक इन कॉम्पुटर), राघु स्वामी (ट्रॅव्हल अँड टुरिझम) अशा आयुष्य घडविलेल्या आणि घडविणाऱ्या मुलांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाचे कथन केले. मुलांशी संवाद साधताना शिक्षणातील अडथळे पार करण्याची प्रत्येकाची जिद्द आणि आलेल्या अडचणीवर त्यांनी कशी मात केली याबाबत सांगितले.
प्रमुख पाहुण्या श्री जयश्री फिरोदिया यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना बांधकाम साईटवरील वंचित मुलासाठी संस्था ज्या प्रकारे सर्वांगीण विकासासाठी पोषक आहार, आरोग्य, शिक्षण, करमणूक व इतर कलागुणांना वाव मिळावा यासाठी कार्य करते त्या बाबत संस्थेचे कौतुक केले. मुलांनी पर्यावरणाबाबत दिलेल्या संदेशाचे देखील कौतुक केले. प्रतिकूल परिस्थितीही शैक्षणिक यश मिळविलेल्या सन्मानित मुलांचे कौतुक करून शिक्षणाने जीवन सुधारते असे उपस्थित मुले, पालक या सर्वांना उद्देशून सांगितले. संस्थेतील लहान मुलांनी संस्थेमधून मोठ्या झालेल्या, शिक्षण पूर्ण केलेल्या मुलांचा आदर्श ठेवून आपले शिक्षण पूर्ण करा असा त्यांनी सल्ला दिला. संगणक (कॉम्पुटर) या व्यतिरिक्त इतर अनेक क्षेत्रातील संधी उदाहरणार्थ – लॅब टेक्निशियन, नर्सिंग, मूर्ती बनविणे, जिम योग इंस्ट्रक्टर इत्यादी सारखे वेगळे क्षेत्र आवडीप्रमाणे निवडून त्यात प्राविण्य मिळवा असे मार्गदर्शन करीत पुरेसा आहार, व्यायाम – खेळ, आरोग्याच्या चांगल्या सवयी आत्मसात करणे व्यायाम यावर भर देणे, वेळेवर झोपणे – उठणे, मोकळ्या हवेत खेळणे, मोबाईल कमी वापरणे, सुयोग्य नागरिक बनण्यासाठी चांगले वाचन करणे, आपली भाषा मधुर ठेवणे, एकमेकांनां मदत करणे, सभ्यतेने वागणे – या सर्व गोष्टीसाठी मुलांवर संस्था संस्कार करीत आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच तारा मोबाईल क्रेशेस सारख्या आदर्श संस्थेचे कार्य बिल्डर्स, देणगीदार यांच्या मदतीशिवाय पुढे जाणे शक्य नाही हे सांगत त्या असेही म्हणाल्या की, जे दुसऱ्यांची मदत करतात , परमेश्वरही त्यांची मदत करतो. असे व्यक्त करून देणगीदारांना त्यांनी प्रोत्साहित केले.
श्रीमती प्राजक्ता शेवाळे , कोल्हापूर येथे शिक्षण अधिकारी असून त्यांनीही बांधकाम मजुरांचा कठीण परिस्थितीत राहूनही शिकण्याचा प्रश्न कसा गंभीर असतो यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि संस्था अशा मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करते यासाठी संस्थेबाबत त्यांना अभिमान वाटतो असे प्रेक्षकांना सांगितले. ‘इयत्ता १० वी, १२ वी मध्ये चांगले गुण मिळाले’ याचे फक्त कौतुक नसून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करायला हवे. असे करून शिकणे यासाठी खूप कष्ट लागतात. तसेच वेगवेगळ्या क्षेत्राची मुलांकडून निवड केली जाते याचेही त्यांनी कौतुक केले. मुलांच्या मध्ये व्यवसायाची निवड करताना जाणविलेली स्पष्टता, लागणारे स्किल्स यासाठी संस्थेकडून मिळणारे मार्गदर्शन आणि सहाय्य्य याचा आपल्या ध्येय गाठण्यासाठी साठी लाभ घ्या असा सल्ला त्यांनी मुलांना दिला. ‘छोटी स्वप्ने कधीच पाहू नका, मोठी स्वप्ने पहा, छोटी स्वप्ने पहिली तर तुम्ही तुमच्या क्षमतेवर अन्याय करता’ असे व्यक्त होऊन मुलांना प्रेरित केले. मुलांनी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे सांगून पालकांना त्यांची भूमिका पार पाडण्याचे आवाहन केले.
संस्थेचे संचालक श्री समीर मेहेता यांनी मोबाईल फोन हा कसा मित्र आणि कसा शत्रू दोन्ही बनू शकतो आणि त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो हे सांगून मुलांना सावधान केले. ‘खेलोगे तो बढोगे, पढाई और काम में और मन लगेगा’ असे आपल्या सवांदातून सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा मधुरा गोखले यांनी मुलांच्या यशोगाथा ऐकताना मन भरून येत होते असे व्यक्त होत त्यांनी मुलांना आपण सांगितले की आई वडिलांकडून आपल्याला दोन महत्वाचे गिफ्ट मिळतात ते म्हणजे मूळ ( पाया) आणि उडण्यासाठी पंख . मुळांनी ते घट्ट किंवा मजबूत होतात आणि पंखानी ते उडू शकतात. यासाठी संस्थेमधून आर्थिक व इतर साहाय्य – मार्गदर्शन दिले जाते. ते घेऊन असेच मोठे होत राहा. ‘शिकलेली आई घरदारा पुढे नेई’. आयुष्यात पुढे जाणारी मुले आपल्याला हवी आहेत. असे मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन करीत त्यांनी मुलांचे व पालकांनचे अभिनंदन केले आणि त्यांना असेच यश मिळवे म्हणून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास संस्थेचे आजी विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ३५ माजी विद्यार्थी आणि संस्थेचे संचालक मंडळ, सर्व कार्यकर्ते, सहाय्यक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. संसाधक व्यक्ती, अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, संस्थेशी कार्यातून जोडलेले डॉक्टर्स, शाळेमध्ये मुलांना सुरक्षित ने आण करणारे स्कूल बस चालक, शाळेचे मुख्याध्यापक, देणगीदार, हितचिंतक मुलांच्या या कौतुक सोहळ्यास उपस्थित होते .
संस्थेतर्फे 4 दशकांहून अधिक वर्षे पुणे आणि आसपासच्या भागात १९ डे केअर सेंटर मार्फत बांधकाम साईटवर स्थलांतरित कुटुंबामधील जन्म ते १८ वर्षांच्या मुलांचे संगोपन, सर्वांगिण विकासासाठी, सुरक्षित वातावरण , पोषक आहार, शिक्षण यासाठी उपक्रम राबविले जातात आणि खेळ तसेच सर्वांगिण विकासाच्या संधी दिल्या जातात. मुलांच्या वयोगटाप्रमाणे विकासात्मक कृती प्रशिक्षित कार्यकर्त्यांकडून राबविल्या जातात कुपोषित मुलांकडे विशेष लक्ष देऊन दर महिन्याला आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले जातात. मुलांची वयोगटानुसार विभागणी करून खेळ आणि अनुभवाद्वारे मुलांमध्ये विकास घडवून आणला जातो. कुपोषणासारख्या प्रश्नांना हाताळताना पोषक पुरेसा आहार, अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मुलांसोबत मुलांच्या पालकांबरोबरही कार्य केले जाते. बांधकाम मजुरांच्या स्थलांतरित मुलांचे संरक्षण, वाढ आणि विकास, शिक्षण, बालहक्क अशा एकात्मिक कार्यक्रम मधून संस्थेचे कार्य निरंतर चालू आहे.