बनावट नोटा प्रकरणात गुंतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई; सेवेतून बडतर्फ
कोल्हापूर (नारायण कांबळे, ):
बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणे, विक्री करणे आणि वापरात सहभागी असलेल्या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी तात्काळ सेवेतून बडतर्फ केले आहे. या कर्मचाऱ्याचे कृत्य पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे आणि देशविघातक कृत्यांशी संबंधित असल्याच्या संशयावरून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
▪️काय आहे प्रकरण?
कोल्हापूर जिल्ह्यातील मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेला पोलीस नाईक क्रमांक १२७५ इब्रार सय्यद आदम इनामदार याच्याविरुद्ध मिरज (सांगली) येथे दिनांक ०८/१०/२०२५ रोजी भारतीय न्याय संहिता २०१३ चे कलम १७८, १७९, १८० प्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता.
बनावट नोटांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग उघड झाला होता. पोलीस नाईक इनामदार याने ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) १९७९’ मधील तरतुदींचा भंग करून, संशयास्पद सचोटी, संशयास्पद वर्तन करत पोलीस दलाची प्रतिमा मलिन केली. कायद्याचे पूर्ण ज्ञान असतानाही त्याने बनावट नोटा तयार करणे, विक्री करणे आणि वापरणे यांसारखे गंभीर गैरकृत्य केल्याचे निष्पन्न झाले.
▪️पोलीस अधीक्षकांनी घेतला कठोर निर्णय:
या घटनेची गंभीर दखल घेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी तातडीने कठोर निर्णय घेतला. इनामदार याचे कृत्य ‘देशविघातक’ असून त्याचा संबंध कोणत्याही देशद्रोही शक्तींशी असू शकतो, अशी शंका पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना त्यांची प्राथमिक किंवा विभागीय चौकशी न करता थेट बडतर्फ (Dismissal from service) करण्याची शिक्षा सुनावली गेली.
बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक झाल्याने पोलीस नाईक इब्रार सय्यद आदम इनामदार यास ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम’ आणि ‘महाराष्ट्र नागरी सेवा नियम २४ आणि २६’ तसेच ‘भारतीय संविधान’ मधील अनुच्छेद क्रमांक ३११ (२) (ब) आणि (३) अन्वये शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
या कठोर कारवाईमुळे पोलीस दलातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना एक स्पष्ट संदेश मिळाला आहे.
संघर्षनायक मीडिया
Posted inक्राइम
बनावट नोटा प्रकरणात गुंतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई;
